Wednesday, April 24, 2024
Homeमहत्वाची बातमीसेवा विवेक, ग्रामीण विकास केंद्र

सेवा विवेक, ग्रामीण विकास केंद्र

शिबानी जोशी

पालघर जिल्ह्यातील महिला बांबूपासून विविध वस्तू तयार करत आहेत, उत्पादन घेत आहेत आणि या उत्पादनांची विक्री करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या बांबू सेवकांचा नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, अशी बातमी वाचली आणि या कार्याविषयी कुतूहल निर्माण झाले. अशा प्रकारे महिलांना रोजगाराची संधी देणाऱ्या या प्रकल्पाविषयी जाणून घ्यावं तसंच सहज ही उत्पादनं विकत घेण्यासाठी प्रकल्पाच्या विकास आणि प्रशिक्षण अधिकारी शिल्पा भोईर यांना फोन केला आणि शिल्पा भोईर यांच्याकडून संस्थेची माहिती मिळाली. दोन-तीन महिन्यांतच राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येत आहे त्यानिमित्तानं बांबूच्या पर्यावरणपूरक, पर्यावरण पोषक राख्या बनवण्याचं काम आता मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलं आहे, असं भोईर यांनी सांगितलं. आणि या राख्या जास्तीत जास्त लोकांनी घेऊन आदिवासी महिलांना मदत करावी आणि त्याबरोबरच पर्यावरण राखण्यासाठी छोटासा हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून ही महिती पोहोचवावी असं वाटलं. या राख्यांचे वैशिष्ट्य सांगताना भोईर म्हणाल्या की, या राख्या पूर्णपणे बांबूपासून बनवल्या जात आहेत, त्यात वापरले जाणारे लाकडी मणी, नैसर्गिक रंग त्याशिवाय जंगली किंवा देशी झाडांची बी सुद्धा या राखीमध्ये घातली जात आहे. ज्यामुळे जेव्हा ही राखी टाकून दिली जाईल तेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद रोपही उगवू शकेल. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या, कचकड्याच्या, महागड्या राख्या आपल्या भावांना बांधतो; परंतु अशा प्रकारची पर्यावरणपूरक राखी भावाला बांधली तर एका आदिवासी महिलेला आर्थिक हातभार मिळेल आणि तिला कोणा भावाकडून आनंदाची भेट मिळेल. या विविध प्रकारच्या राख्यांना महाराष्ट्रातील नद्यांची नावे दिली गेली आहेत. या सर्व राख्या अतिशय वाजवी दरात असून पन्नास रुपयांच्या आतच त्याचं मूल्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

विवेक ग्रामीण विकास केंद्र या संस्थेमार्फत आदिवासी महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलंय, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यांनी निर्मिलेल्या वस्तूंसाठी विपणन व्यवस्था ही संस्थेकडून पुरवली गेली आहे. या भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावला जावा या हेतूने हा प्रकल्प सुरू झाला. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला संस्थेतर्फे आरोग्यविषयक काम केलं जात होतं. अगदी गावोगावी फिरता दवाखाना जावून सेवा दिली जायची; परंतु केवळ वैद्यकीय सेवा पुरवून भागणार नाही, तर त्यांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला रोजगार मिळेल याची सोय करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर म्हणजेच विवेक ग्रामीण विकास केंद्राची २०१० दरम्यान स्थापना झाली. २०१५ पासून बांबू हस्तकलेपासून महिलांना रोजगार निर्मिती द्यावी या संकल्पनेला सुरुवात झाली. सुरुवातीला बांबूच्या केवळ चार उत्पादनांपासून सुरुवात झालेल्या या केंद्रांमधून आता ३४ विविध प्रकारच्या बांबूच्या वस्तूंची निर्मिती होत आहे. शेकडो महिलांना त्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं आहे आणि या शेकडो महिला आज प्रशिक्षित होऊन बांबूपासून विविध उत्पादनांची निर्मिती करत आहेत. आज भालिवलीसारख्या ग्रामीण भागात अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी हा प्रकल्प विस्तारला आहे.

विवेक ग्रामीण विकास केंद्राचं काम मुख्यतः तीन गोष्टींवर चालतं. प्रशिक्षण आणि रोजगार, शिक्षण आणि तिसरं पर्यावरण. सध्या त्यातल्या प्रशिक्षण आणि रोजगार या आयामावर विशेष लक्ष देऊन काम केलं जात आहे. कोणत्याही वस्तूचं व्यावसायिक विक्री करता उत्पादन करायचं असेल तर ती वस्तू व्यवस्तीत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे सुरुवातीला बाहेरून प्रशिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी बोलावले गेले त्यातून काही महिला खूपच चांगल्या प्रशिक्षित झाल्या. बाहेरून प्रशिक्षक बोलण्यापेक्षा याच महिलांना प्रशिक्षक म्हणून नेमून त्यांच्याकडूनच इतर महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम नंतर सुरू झालं. त्यातून दोन फायदे झाले, एक तर या महिलांना रोजगार मिळाला तसेच इतर आदिवासी महिलांनाही आपल्याच भगिनी इतक्या चांगल्या वस्तू बनवू शकतात, तर आपणही का बनवू शकणार नाही? असा आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली. त्यामुळे आज तिथल्या स्थानिक महिला इतर महिलांना प्रशिक्षण देत आहेत असंही भोईर यांनी सांगितले.

राख्यांप्रमाणेच बांबूचे कंदील हेदेखील इथल्या उत्पादनामधील एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. आज देश-विदेशात हजारो कंदील विविध घरांमध्ये दिवाळीची शोभा वाढवत आहेत. त्या कंदिलांना प्रचंड मागणी आहे. कंदिलांना ग्रहांची नावे दिली गेली असल्याचंही भोईर यांनी सांगितलं. कच्च्या मालाची स्थानिक पातळीवरून गरज भागते. त्याशिवाय बांबूची लागवड केंद्रातर्फे करण्यात आली आहे. काही महिलांच्या घरी पण लागवडीला प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बांबू मिळू शकतो. या बांबूपासूनच राख्या किंवा कंदिलांचे उत्पादन घेतलं जातं. मागणी अधिक आली तर पनवेल सारख्या ठिकाणाहून बांबू मागवला जातो, असे भोईर यांनी सांगितलं. अगदी कोरोना काळामध्येसुद्धा. त्यामुळे संस्थेचे उत्पादन थांबलं नव्हतं. कंदील, राख्यांप्रमाणेच बांबूचे ट्रे, बांबूचे मोबाइल स्टॅन्ड, पेपर वेट, पेन स्टँड, बास्केट, हॉट पॉट स्टँड अशा वस्तू बनवल्या जातात. या सर्व वस्तू हे प्लास्टिकला एक चांगला पर्याय आहे. पालघर जिल्ह्यात आज सेवा विवेक हा ब्रँड ग्रामीण महिलांना चांगलाच माहितीचा झाला आहे. “एक कदम ग्रामीण रोजगार ओर” या घोषवाक्यानुसार संस्थेचे काम सुरू आहे आणि म्हणूनच आदिवासी, ग्रामीण महिलांना आर्थिक उन्नत करण्यासाठी बांबू उत्पादन प्रकल्पाचा विस्तार होण्याची गरज आहे, असं हे सर्व जाणून घेतल्यावर जाणवलं.

joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -