Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगुपचूप गुपचूप

गुपचूप गुपचूप

डॉ. विजया वाड

भामा इतकं मोठं प्रचलित नाम. भामिनी हे खरं खरं नाव. भामा लोकप्रिय होण्याइतकं नाव झालं; कारण ती सगळ्यांबद्दल छान बोलायची. जे डाचतं, मनाला त्रास देतं असं ‘गुपचूप’ मनातल्या मनात बोलायची. ‘तुझं तोंड ओबडधोबड दिसतं’ असं बोलणं कोणाला आवडेल. “मला तुझं गोड बोलणं फाssर आवडतं. बुटक बैंगण व्यक्तीला ‘ए तोकडी’ असं कुठलं बोलणं, एखादी – एखादा मनी चिडेल. पण उंची तिच्यासाठी गौण असे. बौद्धिक किंवा वाक उंचीवर ती लक्ष ठेवी. बुटके लोक, ही उणीव, ‘उंचीच्या’ बाबतीतली हो, बुद्धिचातुर्याने भरून काढीत. तेव्हा मनापासून कोण करी? भामा! भामाच सर्वांत पुढे असे. त्यामुळे ती लोकांना हवीहवीशी वाटे. साहजिकच होतं ना ते. ‘ढब्बू’ पैसा लोकांना आवडावं; म्हणून हवंहवंस बोलावं लागतं. ‘ढब्बू पैसा’ लोकांबद्दल कितीही चांगलं बोलला, ‘ढब्बू पैसा बरं बोलला’ ढब्बूचं मन लख्ख आहे, “ढब्बू पैसा स्वच्छ मनाचा आहे” असं ‘ढब्बू’बद्दल, ढब्बूपैसा हे नामाभिधान वापरूनच, बोलत लोक! त्यात त्यांना काहीच गैर वाटत नसे.

“तुमचं वागणं किती गोड आहे.” असं साधं वाक्य बोलायचं ना!
“ढब्बू पैसा बोलतो, वागतो गोड!” ढब्बू पैसा लागेलसं बोलावं, ते आपल्या गावी सुद्धा नव्हतं. नसतं. लक्षातच येत नाही नं!

लोकांची उणीव हे बलस्थान असल्यागत लोक बोलत – वागत. भामाला ते आवडत नसे. मनाला लागत असे. ढब्बू पैसा, जाड्या ढोल, बुटका बैंगण असे शब्द चुकूनही वापरत नसे. भामाला आवडत नसे, दुसऱ्यांवर दोषारोप करायला. पण एक दिवस असा उजाडला की, भामाचं नशीब उलटं पालटं झालं. नशिबाचा फासा उलटा पडला. भामाचा अपघात झाला. ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर आली तेव्हा इस्पितळात होती. आई-बाप शेजारी उशाशी चिंतित बसलेले होते; तिने पाहिले “आई, बाबा, मी कुठे आहे?”
“इस्पितळात बाळ.”
“का?”
“कसं सांगू? अपघात झाला. ओळखीत असलेल्या माणसाने दवाखान्यात ठेवले. आम्हाला कळवले. देव जागा आहे याची प्रचिती दिली.”
“बाळ, योग्य ते उपचार चालू आहेत. लवकर बरे वाटेल हो तुला.” आई-वडील आपापल्या परी समजूत काढीत होते. वडिलांनी बँकेतून पैसे काढले होते. पैशांचीच काय, कसलीही चिंता नव्हती. भामाला आर्थिक चणचण नव्हती. एकुलती कन्या होती ती घराची.

“डायरी, माझी डायरी.” भामाने चिंतेने म्हटलं.
“डायरी घरी आहे.”
“कुठे आहे?”
“उशीखाली आहे.”
“एक करशील आई?”
“ती डायरी हवी का तुला? बबडीला ?”
“बबडी?”
“लाडाने म्हणाले गं.”
“खरंच तू आमची लाडाची बबडीयस. अतिशय लाडाची! एकुलती कन्यका!” आई म्हणाली. तिचा हात भामाच्या केसात होता. केशकलाप कुरवाळत होता.
“ती डायरी…”
“गुपचूप गुपचूप ना? आणलीय मी. पर्समध्ये आहे. देऊ का तुला?”
आईने विचारले. नावच होते ‘गुपचूप गुपचूप’ म्हणून आईने वाचलीसुद्धा नव्हती. मन की बात उघड कशी करावी; इतकी काही ती ‘हलक्या’ मनाची नव्हती.
“वाचली नाही बरं मी.”
“वाचायची होती ना?” भामाने विचारले.
“वर होतं ‘गुपचूप… गुपचूप’ असं नाव. म्हणून नाही वाचली. म्हटलं सांगण्याएवढं आहे की नाही, असं वाटलं असेल लेकीला माझ्या. ते ‘गुपचूप’च असू दे. ‘ब्र’सुद्धा बाहेर पडू नये त्यातला! होय ना हो?”
“हो हो…” नवऱ्याने होकार भरला. शहाण्या नवऱ्याने भरवसा वाटावा वाद नकोतच. शहाणे नवरे सुखी संसार कसा करतात? तोंड न वाजवून. खरं ना? तोही शहाणा नवराच होता!
“खूप शहाणे आहात. भरवसा वाटावे असे आहातं.”
तिने नवऱ्याचे खूप खूप कौतुक केले.
पण तिला पुळका आला. ती म्हणाली, “बाबा, एक सांगू?
‘गुपचूप – गुपचूप’ असं नाव डायरीला कसं दिलं? सांगू?”
“सांग.” तो आज्ञाधारकपणे म्हणाला. शहाणा बाबा “जे मनात येतं ते सारंच आपण बोलून दाखवीत नाही. आता माझी सासू, कितीही आढ्यतेखोर असली, तरी मी ते बोलून दाखवीत नाही. डायरीत लिहिते. आता तुम्ही… कितीही…”
“बास… बास… समजलो.” बाबाला स्वत:बद्दल काही ऐकायचेच नव्हते. तो एक आदर्श, सालस, अजातशत्रू माणूस होता असा त्याचा गोड गैरसमज. “सांगूनच टाकते, ‘गुपचूप… गुपचूप’ मधे मी लिहिलंय, तुम्ही एक अत्यंत ‘पझेसिव्ह फादर’ आहात. गुपचूपचा दरवाजा उघडला, नि बापाचे तोंड ‘गुपचूप’ झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -