पुणे (हिं.स.) : राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठांच्या क्रमवारीत बाराव्या स्थानावर आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे गेली काही वर्षे सातत्याने वरच्या क्रमांकावर असून राज्यातून देशपातळीवर आघाडीवर असणारे राज्यातील पाहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण गुण ५९.४८ असून मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी ५८.३४ होती. महाराष्ट्रात २०२० व २०२१ मध्ये कोविड १९ ची दुसरी लाट असतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपली संशोधनातील गुणवत्ता, उद्योग आणि शिक्षण सहकार्य, विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे.