Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसंस्कृतीबंध

संस्कृतीबंध

अनुराधा परब

संस्कृती हा शब्द सर्वसमावेशक आणि तितकाच लवचिक आहे. कोणत्याही एका गोष्टीकडे निर्देश करून संस्कृती शब्दाचे वर्णन, विश्लेषण करणे शक्य नाही. माणूस हाच एक चालता-बोलता संस्कृतीचा वाहक आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच्या मानवी जीवनाच्या वाटचालीतील प्रत्येक टप्प्यावर होत गेलेल्या उत्क्रांतीतून मानवाची संस्कृती घडत गेली. देहिक बदलांपासून विविध पातळ्यांवर उन्नयन होत गेलेल्या संस्कृती या व्यापक, बहुआयामी संकल्पनेअंतर्गत एकाचवेळी अनेक घटक समाविष्ट होतात.

ग्रामीण, नागरी याशिवाय प्रांत, प्रदेश, भाषा, धर्म-वंश-जात आदी संस्कृतीचे कंगोरे आहेत. या आणि अशा परस्पर रंगीबेरंगी धाग्यांनी विणलेलं संस्कृती नावाचं भरजरी महावस्त्रं हे देशकालपरत्वे भिन्न-भिन्न आहे. याच संस्कृतीला जेव्हा प्रादेशिकता किंवा एखाद्या व्यावसायिक क्षेत्रातील कार्यपद्धतीला संबोधण्याच्या उद्देशाने आपण सीमित करीत असतो त्यावेळी केवळ आणि केवळ आपण आपल्या सोयीपुरता तो विषय अभ्यासाकरिता, विचाराकरिता किंवा अन्य काही कारणांसाठी मर्यादित करीत असतो. पण म्हणून संस्कृती या शब्दाचा अर्थ तेवढाच मर्यादित ठरत नाही. त्यामुळे संस्कृती आणि संस्कृतीबंधाची व्याख्या ही एका वाक्यात बांधता येणं अवघड आहे.

या सदरातील संस्कृतीबंध शब्दाचा विचार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरताच मर्यादित ठेवण्यात येणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोकण म्हटलं की, डहाणूपासून ते थेट गोव्यापर्यंतचा भूभाग समजला जातो. यात मुंबईदेखील येते. पुरातत्त्वविद्या तसेच भारतविद्येचा अभ्यास करत असताना असे लक्षात आले की, आजवर या भागांसंदर्भात बऱ्यापैकी संशोधन-अभ्यास हा झालेला आहे. पुरातत्त्वीय बाबींपासून ते अगदी सोळा ते अठराव्या शतकापर्यंतच्या वास्तूंपर्यंत हा विषय शब्दबद्ध होत आलेला आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण अशी जी वर्गवारी केली जाते, त्यांपैकी दक्षिण कोकणाविषयीचा बराच अभ्यास होणं आवश्यक आहे. कोकण ही ओळख सामायिक असली तरीही दोन्ही ठिकाणची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत.

ही वैशिष्ट्ये संस्कृतीचा कणा समजल्या जाणाऱ्या अर्थकारणापासून ते बोली, चालीरिती, प्रथा-परंपरा, अन्नसंस्कृती अशा अनेकदृष्ट्या समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या संस्कृतीबंधाचा स्वतःचा असा आकृतीबंध किंवा डीएनए असतो. तो जसा कालपरत्वे समाजाला दृश्य-अदृश्यपणे घडवतो तसाच तिथल्या माणसांमध्येही झिरपत त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये निर्मित असतो. त्याला स्वतःची अशी भौगोलिकतेचीही विशेष बाजू असते. त्यानुसार तिथली पिके, खाणे-पिणे, वेशभूषा, परंपरादी मांडणीची घट्ट वीण असते. संस्कृतीला नेहमीच विशिष्ट अशा प्रदेशाचं कोंदण असतं. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही नेहमीच त्या त्या प्रदेशात जन्माला येते. संस्कृती निर्माणामध्ये भौगोलिकतेचा वाटा मोठा असतो. वातावरण, हवा, पाणी आणि जमीन माणसाच्या संस्कृतीमध्ये मोलाची भूमिका बजावते. म्हणूनच कोकणची संस्कृती इतरत्र कुठेही जन्माला येऊ शकत नाही.

त्यासाठी तसे वातावरण, जमीन तिला लाभावी लागेल. या वातावरणाचा पहिला परिणाम हा आपल्या राहणीमान आणि खानपानावर होतो. म्हणून कोकणाच्या खाद्यसंस्कृतीत नारळाचा मुबलक वापर पाहायला मिळतो. मत्स्यसंस्कृती हेदेखील याच वातावरणामुळे कोकणाचं खास वैशिष्ट्य राहिलंय. म्हणूनच कोकणातल्या माणसाला काटेरी फणसाची किंवा कठीण कवच असलेल्या नारळाची उपमा दिली जाते. अशा प्रकारची उपमा ही संपूर्ण देशात सर्वच प्रदेशातल्या व्यक्तींना दिली जात नाही. यांसारख्या उदाहरणांतून त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये ही बोलींतून प्रतिबिंबित होत असतात. हाच तो संस्कृतीबंध.

मानवी जीवनाला असलेला ऐहिकतेचा सोस आणि आध्यात्मिकतेची आस या सगळ्याच्या मुळाशी असते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळेच संस्कृती कधीही एकसाची राहात नाही. माणूस आपापल्या बुद्धी, ज्ञान, भावभावना, अनुभव यांच्या आधारे जगणं अधिकाधिक सुसह्य होण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी भर घालत असतो. दुसरीकडे माणसाने निसर्गावर कितीही मात केली असली तरीही आपल्या आवाक्यापल्याड असलेल्या अनामिक नैसर्गिक शक्तींविषयी त्याच्या मनात आदरयुक्त भीती दडलेली असते. या भीतीपासून दूर नेत मनाला स्थिरता, शांतता, निःशंकता देणाऱ्या आध्यात्मिक वाटणाऱ्या प्रथा, परंपरांचे, नीतीमूल्यांचे अवलंबन करत असतो. भौगोलिक वैशिष्ट्यांनुरूप तिथल्या मानवी संस्कृतीबंधाचं अवलोकन होणं किंवा करणं आवश्यक ठरतं.

संस्कृतीबंध हा परंपरागत प्रवाहित होताना त्यातील प्रचलित आचार-विचारांवर नवनवीन अनुभवांचे, श्रद्धा-समजांचे, अनुकरणांचे संस्कार होत राहतात. हे संस्कार कधी तात्कालिक, तर कधी सखोल परिणाम करणारे असतात. सर्वसमावेशकता या लवचिक वैशिष्ट्यांमुळे हे बदलही संस्कृतीमध्ये सहजी सामावून घेतले जातात. तिथल्या संस्कृतीचा भाग नसूनही स्वीकारली गेलेली अनेक अंगे हादेखील आज संस्कृतीबंधाचा एक धागाच ठरतो. त्यामुळे संस्कृतीबंधाचा विचार करताना तो होताहोईतो डोळस आणि साधकबाधक व्हायला हवा.

दिसण्यापलीकडेही जाऊन त्यामागच्या कार्यकारणभावाची मांडणी समजून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्कृतीबंधाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. गुणवैशिष्ट्यांच्या जोडीनेच लोकाचारांचे, स्थानिक कथा-आख्यायिकांचे स्थान हेदेखील यात तेवढेच महत्त्वाचे आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, विश्व, वैश्विक शक्ती यांना आंतरिक सूत्राने बांधतो तो संस्कृतीबंध. नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारा तरीही अनाकलनीय असा – संस्कृतीबंध.
anuradhaparab@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -