Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस स्टेशनचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनी घ्यावा -...

रायगड जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस स्टेशनचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांनी घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत

दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण(देवा पेरवी)- रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे स्मार्ट पोलीस स्टेशन झाले असून त्याचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर पेणचे आमदार रविंद्र पाटील, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, उप विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, दादर सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागेश कदम यांच्यासह पोलीस अधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी. सागरी सुरक्षा ही अतिशय महत्वाची असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हे स्मार्ट पोलीस स्टेशन झाले असून त्याचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यानीही घ्यावा असेही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील प्रकल्पासाठी भूसंपदान करताना स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही शेवटी उदय सामंत यांनी सांगितले.आमदार रवींद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, हमरापूर, दादर,रावे विभाग हा पाहिले अतिसंवेदनशील होता, मात्र जोहे येथे दादर सागरी पोलीस स्टेशन झाल्यानंतर वादविवाद खूप कमी झाले. दादर सागरी पोलीस स्टेशनची नवीन इमारत होत आहे ही खूप महत्वाची बाब असून याचा फायदा महामार्गासह परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तर विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन इमारतीसाठी तसेच अत्यावश्यक साधन सामुग्री साठी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगून सागरी सुरक्षेसाठी रायगड पोलीस दल कटीबद्ध आहे असे ही सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे देवदूत म्हणून कार्य करत असलेले कल्पेश शरद ठाकूर, गोविर्ले महिला पोलीस पाटील वृषाली संजय ठाकूर, भाकरवड पोलीस पाटील संजय विष्णू पाटील, पिंपळगाव पोलीस पाटील अनिल कानेकर, गडब गावचे रोशन पाटील यांचाही विशेष सन्मान पालकमंत्री उदय सामंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -