Thursday, April 18, 2024
Homeताज्या घडामोडीRasana : 'रसना' कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन

Rasana : ‘रसना’ कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन

मुंबई : ‘रसना’ (Rasana) कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. (Areez Pirojshaw Khambatta passes away) कंपनीने याबाबतची अधिकृत माहिती दिली.

‘रसना’ शीतपेयाने मागील अनेक दशके भारतीयांचा उन्हाळा सुसह्य केलाच शिवाय घरगुती कार्यक्रमात पाहुण्यांची तहान भागवली. भारतासह इतर देशांमधील बाजारपेठेत आजही रसनाला मागणी आहे. अरीज खंबाटा हे अरीज खंबाटा बेनेवॉलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने उद्योग आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

रसना ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अरीज खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्याशिवाय पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्ष होते. खंबाटा हे रसना या लोकप्रिय घरगुती शीतपेयासाठी ओळखले जातात. सध्या देशात १८ लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री होते.

रसना ग्रुपने शोक व्यक्त करताना म्हटले की, खंबाटा यांनी केलेल्या मेहनत आणि प्रयत्नांमुळे, देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. फळांवर आधारित उत्पादने विकसित केल्यामुळे लाखो शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला. देशभरातील शेतकऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली, शिवाय शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला, असे कंपनीने म्हटले. रसना कंपनीकडून विविध उत्पादने तयार केली जात असून देशात आणि परदेशात त्याला चांगली मागणी आहे.

खंबाटा यांनी १९७० दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून रसना या प्रोडक्टची सुरुवात केली. ‘स्वस्तात मस्त’ शीतपेय म्हणून रसना अल्पावधीतच देशभरात लोकप्रिय झाला. कधीकाळी अवघ्या पाच रुपयांच्या पॅकेटमध्ये रसनाचे ३२ ग्लास तयार होत असे. सध्या रसना या ब्रॅण्डचे शीतपेय जगभरातील ६० देशांमध्ये विकले जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेय बाजारपेठेतील मक्तेदारीला रसनाने आव्हान दिले. ‘मेड इन इंडिया’ उत्पादन असलेल्या रसना या शीतपेयाला समाजातील सर्वच स्तरातील लोकांकडून भरभरून प्रतिसाद लाभला. अनेकांच्या बालपणीच्या आठवणीदेखील रसनाशी जोडल्या गेल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -