Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, आपण सर्वांनीच हे नाव ऐकलेले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेला एक तरी तरुण-तरुणी पाहायला मिळतोच. देशातील तरुण-तरुणींना समाजकारण, राजकारण, देशभक्तीचे धडे देणारी प्रबोधिनी अजूनही आपले कार्य अविरतपणे करत आहे. १९८२ साली रामभाऊ म्हाळगी यांनी सुरू केलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी नंतर अनेकांनी सांभाळली. स्वर्गीय प्रमोद महाजनांनी खरे तर या प्रबोधिनीचे वटवृक्षच केले आणि आजही या वटवृक्षच्या सावलीत अनेक तरुण धडे घेत आहेत. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या प्रबोधिनीचा वृक्ष फुलत आहे.

१९८२ साली राजकीय आणि सामाजिक वसा घेत आणि नवीन तरुणांना राजकीय, सामाजिक प्रशिक्षण देण्याची कास धरत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सुरू केले. मात्र त्याचा वटवृक्ष प्रमोद महाजनांनी केला. महाजन कधीच दैनंदिन कामात लक्ष घालायचे नाही आणि त्यांच्या याच भूमिकेमुळे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा वटवृक्ष अजूनही सगळ्यांना सावली देत उभा आहे. आजपर्यंत प्रबोधिनीने ९५० प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. यात तरुणांना राजकारण, समाजकारण याच प्रत्यक्षपणे प्रशिक्षण दिले जाते आणि याचमुळे आज अनेक प्रशासकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तरुण आपलं भविष्य घडवून उभे आहेत.

तरुणांना घडविण्यासाठी प्रबोधिनी अनेक नवीन नवीन प्रशिक्षण वर्ग घेत असते. अनेक वक्ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात, सध्या ९ महिन्यांचा पदव्युत्तर कोर्स प्रबोधिनीत सुरू आहे. भारतीय लोकशाही प्रशिक्षण संस्थान उपक्रमाच्या अंतर्गत हा कोर्स सुरू असून नेतृत्व राजकारण आणि प्रशासक असे नाव आहे. या कोर्ससाठी देशातून नाही, तर जगभरातून तरुण वर्ग येत असतात, ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेत असतात. मात्र यासाठी काही परीक्षा पास करून तरुणांना प्रवेश मिळवता येतो. पण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तरुणांचे भविष्य या प्रबोधिनीत घडते हे नक्की.

महिलांसाठी देखील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अनेक कार्यशाळा राबविण्यात येतात. गेल्याच वर्षी राष्ट्रीय महिला आयोग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात कायदा, सामाजिक सक्रियता, मानवाधिकार या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतातील ओरिसा, त्रिपुरा, माणिपूर, गुजरात, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा एकूण ८ राज्यांतील राज्य महिला आयोगाच्या २५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

बरं केवळ राज्य महिला आयोगाच्या सहकाऱ्यांसाठीच नाही, तर महिला नगरसेवकांसाठी देखील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. राजकारणातील महिलांसाठी नेतृत्व व क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. हे प्रशिक्षण शिबीर महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेविकांसाठी आयोजित केले होते. यात एकूण ४ महापालिकांमधील ४४ नगरसेविकांनी सहभाग नोंदवला होता. या शिबिरात महापालिकेचे कायदे, व्यक्तिमत्त्व विकास, राजकारणी आणि अधिकारी यांच्यातील समन्वय कसा साधावा? महापालिकेचे कामकाज, महिलांविषयक कायदे, भाषणकला, महापालिकेचे अर्थशास्त्र, महिला सशक्तीकरणासाठी असलेल्या सरकारी योजना, नगरसेवकांचे कार्यालयीन व्यवस्थापन, जनसंपर्क आणि सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

तरुणांसाठी वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये याचेदेखील प्रशिक्षण दिले जाते. अनेक तज्ज्ञ वक्ते, निवेदक यावेळी प्रशिक्षण देतात. इतकेच नाही तर ‘नगरसेवक व्हायचंय?’ या उपक्रमाअंतर्गत देखील कार्यशाळा राबवण्यात आली आहे. होणाऱ्या महापालिका, नगर परिषदांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. समाजाला एक चांगला, उच्चशिक्षित आणि संवेदनशील राजकारणी, लोकप्रतिनिधी मिळावा या दृष्टीने तरुणांसाठी अशा विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी नेमके कोणते गुण, नेतृत्व असावे? याबाबत या शिबिरात मार्गदर्शन केले गेले. निवडून येण्यासाठी मुळात अभ्यास असला पाहिजे, जनसंपर्क, लोकसहभाग वाढवला पाहिजे, या सगळ्या उद्देशाने ही कार्यशाळा सुरू करण्यात आली होती. यात महापालिका निवडणूक प्रक्रिया, निवडून येण्याची क्षमता विकसित कशी करावी, निवडणूक व्यवस्थापन, प्रभागातील लोकसहभाग, मतदारांची मानसिकता, कायदेशीर बाबी अशा अनेक विषयांवर शिबिरात मार्गदर्शन केले गेले.

१९८२ पासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सुरू असलेले कार्य अद्यापही अविरतपणे सुरू आहे. या समाजातील तरुण शिक्षित असावा, त्याला उच्च ज्ञान असावे आणि असा तरुण राजकारणात असावा यासाठी प्रबोधिनी तरुणांचा सर्वांगीण विकास करते. हे कार्य प्रबोधिनीचे अजूनही सुरू आहे आणि सुरू राहील, यात शंका नाही. पण भविष्यात नवीन भारत घडविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक राजकारण्यांनी येथून धडे घेतलेले असतील, हे नक्की.

-सीमा दाते

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -