Tuesday, April 16, 2024
Homeकोकणरायगडgarbage : वाढत्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रायगडकरांचा श्वास गुदमरतोय

garbage : वाढत्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रायगडकरांचा श्वास गुदमरतोय

कचऱ्यात वाढतेय प्लास्टिक, स्वच्छतेत नागरिकांचे योगदान महत्वाचे

सुभाष म्हात्रे

अलिबाग : भारत देश स्वच्छ राहिल्यास देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, ही बाब नजरेसमोर ठेवत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात स्वचछतेचा नारा दिला आहे. मात्र हा स्वच्छतेचा नारा अनेकजण विसरल्याचे दिसत असून, रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या घरातून मोठ्या प्रमाणात निघणारा कचरा (garbage), परिणामी जिल्ह्यात जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, या ढिगामंध्ये अधिकतेने दिसणाऱ्या प्लास्टीकच्या पिशव्या, झाडांचा पालापाचोळा, शिळे अन्न, झाडाच्या फांद्यांमुळे वाढता कचऱ्याचे प्रमाण कमी न होता, तो दिवसेंदिवस वाढतच चालल्याने कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निवासी घरे, उपहारगृहे, मोठाली हॉटेल्स, कंपन्या, कारखाने, चिकन, मटणची दुकाने बांधकामे आदींतून दररोज रायगड जिल्ह्यात लाखो टन कचरा तयार होतो. या कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी सध्यातरी जिल्ह्यात कोठलीच यंत्रणा नसल्याने आणि काही ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यास जागाच उपलब्ध नसल्याने बिनबोभाटपणे वाहनांतून हा कचरा राजरोसपणे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गालगत, गावांची वेस, मोकळ्या जागा, नदी किनाऱ्याचा आणि खाडी किनाऱ्याच्या भागात टाकला जात आहे. त्यामुळे हा कचरा कुजून त्यापासून दुर्गंधी निर्माण होत असते.

कोरोनापाठोपाठ आता गोवर आजाराचा काळ सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार, जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन, गावस्तरावर ग्रामपंचायती सतर्क झाल्या असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील वाढत्या कचऱ्याच्या निर्मूलनाकडे दुर्लक्ष होत असल्य़ाने अन्य साथींचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका असो किंवा ग्रामपंचायती असोत. त्यांच्या अखत्यारीतील कचऱ्याची त्यांनीच विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाच त्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिवसोंदिवस वाढ होताना दिसते आहे. काहीठिकाणी कचऱ्यांच्या जागा आणि कचऱ्यांचे डबेही ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत.

थोर निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पद्मश्री. डॉ. आप्पासाहेब ध्रर्माधिकारी यांनी जिल्ह्यात अनेकवेळा ठिकठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घेतल्याने प्रतिष्ठानचे योगदान मोठे आहे. मात्र काहीजण परत त्याच ठिकाणी अस्वच्छता करीत असून, हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रायगड जिल्हा स्वच्छ राहण्यापेक्षा कचऱ्याचे आगार बनायला वेळ लागणार नाही हेही तेवढेच खरे.!

प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

प्लास्टिकला बंदी असतानाही ठिकठिकाणचे दुकानदार, मासळी मार्केट, भाजी मार्केटमध्ये सर्रासपणे विक्रेत्यांकडे प्लास्टीकच्या पिशव्या दिसत आहेत. त्याच पिशव्यांमधून सामान ग्राहकांना दिल्यानंतर ग्राहक त्याच पिशव्या कचऱ्यात टाकत असल्याने पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात प्लास्टिक विरोधात काही नगरपालिकांसह नगरपंचायती, ग्रामपंचायती कारवाई करताना दिसतात. मात्र काही दिवसानंतर जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे प्लास्टिकला आळा घालायचा असल्यास प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या लहान मोठ्या कारखान्यांविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करायला हवी. मात्र अशी कारवाई होत नसल्याने कारखानावाल्यांचे फावत असते.

सुंदर व स्वच्छ रायगडसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे

साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीमहाराजांनी रायगडावर शौचालयांसह उत्तम पाणी व्यवस्थापन केले होते. त्यातून सर्वांनीच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ उभी करायला पाहिजे; परंतु तसे न होताच जिल्ह्यातील अनेकजण रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी कचरा टाकून जिल्ह्याला प्रदूषणाकडे नेताना दिसत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा सुंदर तसेच स्वच्छ हवा असल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्यापासून स्वच्छता अंगिकारायला हवी. स्थानिक स्वराज्य संस्थेने कचरा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याबरोबरच जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी संघटीत होऊन स्वच्छता कार्यक्रम चळवळ गतिमान करायला हवी, तरच रायगड जिल्हा स्वच्छतेकडे वाटचाल करून `रायगड स्वच्छ व सुंदर’ होऊ शकेल असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -