Friday, March 29, 2024
HomeकोकणरायगडRaigad Elections : सरपंचपदासाठी आर्थिक, राजकीयदृष्ट्या सक्षम उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Raigad Elections : सरपंचपदासाठी आर्थिक, राजकीयदृष्ट्या सक्षम उमेदवारांमध्ये रस्सीखेच

थेट सरपंच निवडीने सरपंचांना गावगाड्यात महत्व प्राप्त होणार

सुभाष म्हात्रे

अलिबाग : रायगड जिल्ह्यात ८२१ ग्रामपंचायतींपैकी २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Raigad Elections) होत असल्याने या निवडणुकीला व्यापक स्वरूप आले आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला स्वतःला निवडून आणण्याबरोबरच आपल्या पॅनलमधील इतर सदस्यांनाही निवडून आणण्याची कसरत करावी लागणार आहे, त्यामुळे आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सरपंचपदावर वर्णी लावण्यासाठी गावपुढाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडायला सुरुवात झाल्याने या निवडणुकीत थेट मतदारांमधून सरपंच निवडले जाणार असल्याने पुन्हा एकदा सरपंचांना ग्रामपंचायतीच्या गावगाड्यात महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने तो कोणत्या कामासाठी खर्च करण्याचे बहुतांश अधिकार हे सरपंच आपल्या मर्जीनुसार वापरत असतात. मिळालेले अधिकार आणि ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या निधीमुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा रुबाब आमदारापेक्षाही भारी असतो, त्यामुळे सरपंचपदावर निवडून येण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली ताकदपणाला लावायला सुरुवात केली आहे.

रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये होणाऱ्या २४० ग्रामपंचायतींसाठी ९०१ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. सर्वच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी चुरस असल्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न ताकदवर इच्छुक उमेदवारांचा आहे. बुधवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून या मुदतीपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज काढून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु झाला आहे. बुधवारी त्याचदिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.

सरपंचपदासाठी उमेदवारी- तालुका/ सरपंच संख्या/ उमेदवार

  • अलिबाग/६/३८;  
  • मुरुड/५/२५;
  • पेण/२६/११०;
  • पनवेल/१०/४५;
  • उरण/१८/१०५;
  • कर्जत/७/४१;
  • खालापूर/१४/५५;
  • रोहा/५/२८;
  • सुधागड/१४/४८;
  • माणगाव/१९/७०;
  • तळा/१/३;
  • महाड/७२/२१६;
  • पोलादपुर/१६/५३;
  • म्हसळा/१३/३१;
  • श्रीवर्धन/१३/३३;
  • एकूण/२४०/९०१.

गावकी-भावकीला प्राधान्य

आर्थिक स्थिती भक्कम असण्याबरोबरच इच्छुक उमेदवाराकडे एकगट्टा मतदार असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांचा कारभार गावकीच्या माध्यमातून चालविला जातो. गावकी जो उमेदवार देईल, त्याला एकगठ्ठा मतदान करण्याची जबाबदारी ही गावातील लोकांची असते. गावकीबरोबरच मुंबईकर मंडळाचा सल्लाही तितकाच महत्वाचा असतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी हे मुंबईकर हमखास गावाकडे येतात आणि ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवून आणू शकतात.

गावकीबरोबर ज्याचा कुटुंब मोठा आहे, त्या कुटुंबातील एक गठ्ठा मतांचा विचारही सरपंचपदासाठी करण्यात आला आहे. तसेच, आगामी निवडणुकांसाठी मतदारांच्या कल चाचणीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर यावर्षी समाधानकारक पाऊस पडला असल्याने पीक चांगले असले, तरी कोरोना महामारी, रोगराई, महापूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशी कोणतीच संकटे जिल्ह्यावर ओढवलेली नाहीत. दु:खाचे सावट नसल्याने राजकीय वातावरणातही कमालीचा उत्साह दिसून येत आहे. याचा फायदा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरलेले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -