Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यप्रत्यक्ष बैठकांशिवाय समस्या संपेना

प्रत्यक्ष बैठकांशिवाय समस्या संपेना

@ महानगर : सीमा दाते

मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी. मात्र या आर्थिक राजधानीतील जनतेच्या समस्या काही संपेना झाल्या आहेत. पावसाळ्यापासून सुरू असलेली खड्ड्यांची समस्या कायम असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र समस्या निवारण दूरच पण पालिकेतला गोंधळ जास्तच पाहायला मिळत आहे.

सातत्याने भाजपकडून अनेक पत्रकार परिषदा घेऊन पालिकेतील महत्त्वाचे विषय मांडले जात आहेत; मात्र या विषयाबाबत पालिकेत चर्चा तर दूरच, पण भाष्य देखील केले जात नाही. मग या समस्या सोडवणार कोण? असा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या समोर उभा राहिला आहे. केवळ येणारी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रस्ताव मंजूर केले जातात का, असा सवालही मुंबईकर विचारत आहेत.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील ज्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून बैठका घेतल्या जातात, पण त्या बैठका प्रत्यक्ष घेण्यावरच सत्ताधाऱ्यांचा विरोध दिसतोय. मग नक्की समस्या दूर होणार कशा? पालिकेतील सगळ्याच बैठका प्रत्यक्षपणे व्हाव्यात म्हणून भाजप पाठपुरावा करत आहे. केवळ पाठपुरवाच नाही, तर भाजप सदस्यांकडून आंदोलन देखील केले गेले. इतके सगळं करूनही प्रत्यक्ष बैठका झाल्याच नाहीत आणि त्यानंतर भाजपने न्यायालयात देखील धाव घेतली आहे. मात्र अजूनही प्रत्यक्ष बैठका होतच नाहीत. यामुळे भाजपसह
मुंबईकर देखील विचारात पडला आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रत्यक्ष बैठकांना एवढा विरोध का? नक्की मुंबईकरांच्या समस्यांवर चर्चा हवी की नको?

सध्या महापालिकेतील अनेक घोटाळे भाजपच नाही, तर मनसे देखील समोर आणत आहे. कधी रस्ते, कधी कोस्टल रोड, तर कधी सफाई कामगारांच्या घरांबाबत, असे अनेक आरोप झाल्यानंतरही मुंबईची परिस्थिती काही बदललेली दिसत नाही. रस्त्यांची वाईट अवस्था, मुंबईतील तुंबलेले नाले, त्यामुळे परिसराची झालेली दुरवस्था भाजपकडून सातत्याने मांडली जात आहे. असे असतानाही या समस्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत पावसाळा संपला असला तरी, रस्ते काही पालिकेला बनवता आलेले नाहीत. मुंबईत अजूनही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. पाऊस गेल्यानंतर खरं तर, खड्डे बुजवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू व्हायला हवी होती, मात्र अजूनही तसे पाहायला मिळत नाही. केवळ निविदा काढल्या जातात, त्या मंजूर होतात; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला उशीरच होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबईकरांची खड्ड्यांची समस्या सुटणार की नाही, ही चिंता कायम आहे.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने यशस्वीपणे पहिली आणि दुसरी लाट थोपवली. मुंबईकरांच्या मदतीसाठी पालिका उभी राहिली, याबाबत पालिकेचे कौतुकच आहे. पण आता अजूनही मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणेही तितकेच गरजेचे आहे. केवळ निवडणूक नजरे सामोरे ठेवून नाही, तर मुंबईकरांच्या हितासाठी कामे होणं गरजेचं आहे.

सध्या पालिकेत केवळ गोंधळ सुरू असल्याचंच पाहायला मिळतंय. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांत काही कामांचे उद्घाटन पालिकेने केले. त्यानंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बस असतील किंवा इतर काही कामं असतील याचं उद्घाटन वरळीमध्ये झाले; पण केवळ वरळीच नाही, तर मुंबईत अनेक ठिकाणी मुंबईकरांना समाजोपयोगी कामं हवी आहेत. त्यामुळे केवळ वरळीच नाही, तर इतर ठिकाणीही लवकरत लवकर प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मुंबईकरांचे प्रश्न सुटले म्हणजे इतर पक्ष टीका सुद्धा करणार नाहीत, पण हे प्रश्नच सुटत नाहीत. म्हणूनच भाजपसारख्या पक्षाला सातत्याने पालिका प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची समस्या दाखवून द्यावी लागते. म्हणूनच प्रत्यक्ष बैठकांसाठी भाजप आग्रही आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष बैठक होत नाहीत, तोपर्यंत मुंबईच्या हितासाठी येणाऱ्या प्रस्तावावर चर्चा होणार नाही. जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत लवकर विकासकामेही होणार नाहीत. सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची विकासकामं लवकर करायची असतील, तर प्रत्यक्ष बैठका घेणं आवश्यक असणार आहे.

seemadatte12@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -