Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरवस्था

डहाणू-नाशिक राज्यमार्गाची दुरवस्था

खड्डे न बुजवल्यास वाहनचालकांचा आंदोलनाचा इशारा

डहाणू (वार्ताहर) : डहाणू-नाशिक राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत असून याकडे बांधकाम प्रशासन डोळेझाक करत आहे. यावर्षी तर खूप मोठा पाऊस पडल्याने खड्ड्यांची संख्याही वाढली असून या राज्यमार्गावर वाहतूकही वाढली आहे. परिणामी, या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

डहाणू, नाशिक, मुंबई, ठाणे, गुजरातकडे मोठी वाहन वाहतूक होत असते. डहाणू येथे असणारे अदानी कंपनी, आशागड येथील युनिव्हर्सल कॅप्सूल कंपनी, डहाणू, वाणगाव येथील भाजी, चिकू, मासे यांचे मोठी बाजारपेठ असल्याने वाहतुकीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्याचप्रमाणे वाढवण येथे नवीन बंदर निर्माण प्रकल्प सुरू असून त्याच्या कामानिमित्त अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच, नवीन रेल्वे रुळांची अनेक कामे सुरू असल्याने अवजड वाहनेही ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत डहाणू बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा रस्त्याची डागडुजी होत नाही. मागे दोन चार वेळा तात्पुरता खड्डे बुजवण्यात आले होते, पण पडलेल्या मोठ्या पावसाने पुन्हा पूर्ववत खड्डे निर्माण झाले आहेत.

गंजाड, रानशेत, वधना, चारोटी, कासा या भागात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, कासा गायकवाड पाडा, नर्सरी, ठाणा बँक, बाजारपेठ येथील पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून राहत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणारे गटार दोन्ही बाजूंना व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावर साठून रस्ता खड्डेमय होत आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

मोठा अपघात होण्याची वाट बघताय का?

पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त झाली असून अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. यावर्षीचे गणपती, नवरात्र हे दोन्ही सण या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्याने नागरिकांना खूप त्रास करत हा प्रवास करावा लागला. बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. बांधकाम विभाग अजून मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का, असा उद्विग्न प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -