Thursday, March 28, 2024
Homeताज्या घडामोडीपोलीस ठाण्यात गटारी साजरी न करण्याचे पोलिसांना आदेश

पोलीस ठाण्यात गटारी साजरी न करण्याचे पोलिसांना आदेश

बंदी असूनही दरवर्षी पोलीस ठाण्यात प्राण्यांचे बळी देऊन होते गटारी साजरी

मुंबई : पोलीस ठाण्यात गटारी साजरी करु नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल न करण्याच्या सूचना मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. ही प्रथा बंद करावी अशा सूचना पोलीस दलाच्या वतीने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जुलै २०१२ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी असेच आदेश काढले होते. त्यानंतरही दरवर्षी असे आदेश दिले जातात. मात्र, काही पोलीस ठाण्यांमध्ये गटारी साजरी करण्यात येते.

यावर्षी मुंबई पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकात पोलीस ठाण्याच्या आवारात गटारी साजरी करु नये, असे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले असून याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच सर्व पोलीस उपायुक्तांना आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करुन गटारी साजरी होणार नाही याकडे लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

पुढील आठवड्यातील शुक्रवार म्हणजेच २९ जुलै पासून श्रावण महिना सुरु होत आहे. तत्पूर्वी गुरुवारी २८ जुलै रोजी आषाढी अमावास्या आहे. आषाढी अमावास्येला राज्यात ‘दिप अमावास्या’ म्हणून दिप पूजन केले जाते. मात्र काही विकृत लोकांकडून या दिवसाला ‘गटारी’ म्हणून संबोधण्यात येते. त्याचे अनुकरण करत मुंबईतील पोलीस ठाणे/ शाखा/ कार्यालये इत्यादी ठिकाणी श्रावण महिना सुरु होण्याअगोदर साधारणतः २ ते ३ दिवस ‘गटारी’ साजरी करण्यात येते.

याआधी ‘गटारी’च्या दिवशी पोलीस ठाण्यातच कोबडी किंवा बोकडाचा बळी दिला जायचा. नंतर ते जेवणात प्रसाद म्हणून वाटले जायचे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्या झालेली व्यक्ती, आत्महत्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळावी आणि पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत चालावे, अशी त्या मागची धारणा होती. मात्र, अशा अंधश्रद्धेला खतपाणी न घालता ही प्रथाच बंद करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

या प्रथेला प्राणी संरक्षण संघटनांकडूनही विरोध आहे. पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असल्याने पोलिसांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस ठाणे हे ‘सार्वजनिक जागा’ या संज्ञेखाली येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राणीमात्रांची कत्तल करणे हे बेकायदेशीर असून अशी कृत्ये करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरते, असे या पत्रकात म्हटले आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात बोकड किंवा कोंबडीची कत्तल केल्यास मुंबई महानगरपालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुॲल्टी टू ॲनिमल ॲक्ट १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -