Friday, March 29, 2024
Homeक्रीडाश्रीलंकेला विजयी हॅटट्रिकची संधी

श्रीलंकेला विजयी हॅटट्रिकची संधी

आयर्लंड, नामिबियामध्ये दुसरे स्थान मिळवण्यासाठी चुरस

अल अमिरात (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या अ गटातून सुपर १२ फेरी गाठणाऱ्या दुसऱ्या संघावर शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) शिक्कामोर्तब होईल. साखळीतील शेवटच्या लढतींमधील पहिल्या सामन्यांत आमनेसामने असलेल्या आयर्लंड आणि नामिबियामध्ये बाद फेरी गाठण्यासाठी चुरस आहे. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेची गाठ नेदरलँडशी पडेल. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाने आगेकूच निश्चित केली तरी कमकुवत प्रतिस्पर्धी पाहता सलग तिसऱ्या विजयाची संधी आहे.

श्रीलंकेने नामिबिया आणि आयर्लंडला हरवून चार गुणांनिशी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावताना बाद फेरीत दिमाखात स्थान मिळवले. साखळीतील तिसऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर नेदरलँडच्या रूपाने तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी आहे. श्रीलंकेकडून फलंदाजीत वहिंदु हसरंगा, प्रथुम निसंका, भनुका राजपक्षे आणि अविष्का फर्नांडोने चांगले योगदान दिले आहे. ऑफस्पिनर महीश तीक्षणासह आणि मध्यमगती लहिरू कुमाराने गोलंदाजीत छाप पाडली आहे. सांघिक कामगिरी उंचावल्याने लंकेच्या मुख्य फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या आहेत. नेदरलँडला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. नेदरलँडविरुद्ध श्रीलंकेचे पारडे निश्चितच जड आहे. मात्र, टी-ट्वेन्टी प्रकारात प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालत नाही.

आयर्लंड आणि नामिबिया संघांना दोन सामन्यांत प्रत्येकी एक विजय मिळवता आला आहे. मात्र, दोन्ही संघांना श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले आहे. त्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण आहेत. शुक्रवारच्या लढतीतील विजेता संघ श्रीलंकेसह अंतिम १२ संघांमध्ये स्थान मिळवेल. पॉल स्टर्लिंग, अँडी बॅलबिर्नी, केव्हिन ओब्रायन, डेलानी असे चांगले फलंदाज असूनही आयर्लंडची फलंदाजी बहरलेली नाही. पहिल्या दोन सामन्यांत त्यांच्याकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही. दोन फलंदाजांना चाळीशी पार करता आली आहे. त्यात डेलानी आणि स्टर्लिंगचा समावेश आहे. जोश लिटल, कॅम्फर, मार्क अदेर तसेच ख्रिस कॅम्फरने बऱ्यापैकी अचूक मारा केला तरी सातत्य नाही. नेदरलँडविरुद्ध चार चेंडूंत चार विकेट घेणाऱ्या (फोरट्रिक) कॅम्फरला श्रीलंकेविरुद्ध एकही विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे प्रमुख गोलंदाजांना लयीमध्ये यावे लागेल.

नामिबियाकडून डेव्हिड विस या एकमेव फलंदाजाला हाफ सेंच्युरी मारता आली आहे. गेरहार्ड इरॅस्मस तसेच क्रेग विल्यम्सने थोडी चमक दाखवली आहे. नामिबियाची गोलंदाजी मात्र, पुरती निष्प्रभ ठरली आहे. डावखुरा मध्यमगती जॅम फ्रीलिंकच्या २ सामन्यांत २ विकेट ही त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम गोलंदाजी आहे. दोन्ही संघांची कामगिरी पाहता नामिबियाच्या तुलनेत आयर्लंडला विजयाची अधिक आहे. परंतु, टीट्वेन्टी प्रकारात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावल्यास सामन्याचे चित्र बदलू शकते. नामिबियाच्या चाहत्यांना त्यांच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.

आजचे सामने

आयर्लंड वि. नामिबिया
वेळ : दु. ३.३० वा.
श्रीलंका वि. नेदरलँड
वेळ : सायं. ७.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -