Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीनिळू फुले यांची लेक गार्गी फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

निळू फुले यांची लेक गार्गी फुलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माझ्या वडिलांच्या विचारांना हा पक्ष न्याय देईल : गार्गी फुले

पुणे : मराठी नटनट्यांची राजकीय पक्षांमध्ये एंट्री ही काही आता नवी बाब राहिलेली नाही. मालिकांमधून काम करत अभिनेत्री अशी ओळख मिळवलेल्या गार्गी फुले या निळू फुलेंच्या कन्येनेदेखील आता राजकारणात प्रवेश केला आहे. खूप दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती त्यामुळे मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी होकार कळवला असं म्हणत गार्गी फुलेंनी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गार्गी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रवेशादरम्यान त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत, त्याच विचारसरणीचे माझे बाबा होते. त्यामुळे माझ्या वडिलांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस न्याय देईल”.

अनेक तरुणांना राजकारणात येऊन बदल करावेसे वाटतात, त्याच दृष्टीने किना-यावर बसून न राहता मुख्य प्रवाहात येऊन काम करण्याची इच्छा गार्गी फुलेंनी व्यक्त केली. पुढे त्या म्हणाल्या,”राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा मला आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत वडिलांचे चांगले संबंध आहेत. आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येऊन प्रवाहात येईन”. तसंच भविष्यात राष्ट्रवादीने तिकीट दिलं तर त्या नक्की लढतील, असं त्या म्हणाल्या.

गार्गी फुले या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवी घेतली आहे. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं आहे. १९९८ पासून गार्गी नाट्य चळवळीत सातत्याने सहभाग घेत आलेल्या आहेत. सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. समन्वय या नाट्यसंस्थेच्या अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी काम केलं आहे. मराठी अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतर आता त्या राजकारणातही नशीब आजमावणार आहेत.

गार्गी फुले यांनी मराठी मालिका, सिनेमे, नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. मळभ, कोवळी उन्हे, श्रीमंत, वासंती जीर्णनी, सुदामा के चावल, सोनाटा या नाटकांमध्ये तर राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी या लोकप्रिय मालिकांमध्ये गार्गी फुले यांनी काम केलं आहे. तसेच भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरिजमध्येही त्या झळकल्या आहेत. आता राजकारणात त्या कशा काम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -