Tuesday, March 19, 2024
Homeताज्या घडामोडीNarayan Rane : भाजप नेत्यांवर टीका सहन करणार नाही

Narayan Rane : भाजप नेत्यांवर टीका सहन करणार नाही

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचा इशारा

कणकवली (वार्ताहर) : महाराष्ट्र ते दिल्ली पर्यंतच्या भाजप नेत्यांवर कुणीही इथे येऊन टीका करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला. हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कणकवली व सावंतवाडी येथे केलेली विधाने जशीच्या तशी काही वृत्तपत्रातून छापून आल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे नाव न घेता राणे म्हणाले की, त्या बाईंचं जिल्ह्याच्या विकासात योगदान काय आहे? त्यांच्याकडे कसली वैचारिकता आहे? सिंधुदुर्गात गाव आणि वाडीनिहाय रस्ते नव्हते. वीज, पाणी, शिक्षण आदी अनेक समस्या होत्या. माझ्या कारकिर्दीत निधी आणून वाडीवार रस्ते तयार केले. दरवर्षी अनेकांना वैद्यकीय मदत करतोय. अनेकांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करत आहे. अनेक मुलांच्या परदेशातील शिक्षणासाठीही निधी देत असतो. यातील एक तरी काम विरोधकांनी केलं आहे का? राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षातील मंडळींनी एक तरी बालवाडी काढली का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

राणे यांनी उद्धव ठाकरे आणि पक्ष संघटनेवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गट आता मातोश्री पुरताच मर्यादीत राहिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यात कुठेही दौरे केले तरी त्यांचा पक्ष वाढणार नाही. शिवसेनेतील बहुतांश मंडळी ही शिंदे गटात सामील झाली आहेत. तर उरली सुरला ठाकरे गट देखील लवकरच संपणार आहे. दरम्यान आदित्य ठाकरे हे देखील दिशा सालिया केस मधून सुटणार नाहीत असा इशाराही राणे यांनी दिला. राज्यातील शिंदे गट आमच्या सोबत आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासोबत युती करण्याबाबतचा निर्णय पक्ष पातळीवर होणार असल्याची माहिती राणे यांनी केली.

सिंधुदुर्गातील टोल वसुलीच्या मुद्दयावर बोलताना राणे म्हणाले की, आपल्याला विकास हवा असेल चांगले रस्ते, पूल आदी हवे असतील तर टोल देणे गरजेचे आहे. राहुल गांधी हे आत्ता भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. मात्र एवढी वर्षे देशात काँग्रेस सत्तेवर होती. त्या कालावधीत त्यांना भारत जोडो का शक्य झाले नाही असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. काँग्रसचे नेते यात्रेपुरतेच दिसतात इतर वेळी कुठे असतात असेही राणे म्हणाले. तर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची भाषा आणि रंग बदलला आहे. तर सीमा प्रश्नी अजित पवार आता आंदोलनाची भाषा करत आहेत. मागचे अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता, त्यावेळी सीमा भागातील नागरिकांचे पाणी, वीज आदी प्रश्न का सोडवले नाहीत असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

रिफायनरी प्रकल्प असो अथवा सीवर्ल्ड किंवा कोकणात येणारे अन्य उद्योग, या सर्व उद्योगांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जातो. नंतर प्रकल्प सुरू करण्यासाठी तोडपाणी केली जाते. एन्रॉन बाबत शिवसेनेने तोडपाणी केली होती. खा. विनायक राऊत हे स्वत: उद्योजकांकडून पैसे घेतात. त्यामुळे संपूर्ण शिवसेना उध्दव ठाकरेंचा पक्ष म्हणजे तोडपाणी पक्ष आहे अशीही टीका राणे यांनी केली. तर यावेळी सेनेचे आ. राजन साळवी देखील आमच्या सोबत आहेत असा दावाही राणे यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -