Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणनगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे पडघम

नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे पडघम

नरेंद्र मोहिते

रत्नागिरी : कोरोना संसर्ग कमी झाल्याने व नियमांमध्ये शिथिलता आल्याने आता राज्यात सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि दोन नगर पंचायती यांच्याही निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, खेड व चिपळूण या चार नगर परिषदा असून दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, देवरूख या पाच नगर पंचायती आहेत. आता यातील चार नगर परिषदा आणि दोन नगर पंचायती यांच्या निवडणूका होणार आहेत. गतवेळी झालेल्या प्रभाग रचनेप्रमाणेच यावेळीही या निवडणूका होणार असल्याने या निवडणूकांची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्ष करत असल्याचे दिसते. यावेळी नगराध्यक्ष निवड ही थेट जनतेतून होणार नसून निवडून आलेल्या सदस्यांतून नगराध्यक्ष निवड होणार आहे.

गतवेळी झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत रत्नागिरी, राजापूर, खेड व चिपळूण या चार नगर परिषदांमधील तीन नगर परिषदांमध्ये शिवसेनेला मतदारांनी चांगलाच दणका दिला होता. रत्नागिरी वगळता अन्य तीन ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले होते. यामध्ये राजापूरात काँग्रेसने, चिपळूणमध्ये भाजपने तर खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने बाजी मारली होती. तर रत्नागिरीचा गड शिवसेनेने राखला होता. राजापूरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नगराध्यक्षपदासह पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली होती. तर खेडमध्येही मनसे आणि महाविकास आघाडीनेही नगराध्यक्षपदासह सभागृहातही बहुमत मिळविले होते. चिपळूणमध्ये सभागृहात भाजपने बहुमत मिळविले नव्हते तरी नगराध्यक्षपद भाजपकडे आले होते. तर रत्नागिरीत शिवसेना सत्ताधारी राहिली होती. तर दापोली नगर पंचायतीत काँग्रेस व शिवसेना आघाडीची व मंडणगडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे.

गतवेळी झालेल्या निवडणूकीत १७ सदस्य संख्या असलेल्या राजापूर नगर परिषदेच्या सभागृहात काँग्रेसचे सात, राष्ट्रवादी एक, शिवसेना आठ व भाजप एक असे पक्षीय बलाबल होते. खेड नगर परिषेद मनसे व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे दहा तर शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले होते. तर २४ सदस्य संख्या असलेल्या चिपळूण नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद भाजपकडे तर सभागृहात भाजप ४, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ५, शिवसेना ११ तर अपक्ष दोन असे संख्याबळ होते. तर रत्नागिरी नगर परिषदेत एकूण ३० नगरसेवक असून यामध्ये शिवसेना १७, भाजप ६, राष्ट्रवादी ५ व दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या पाच पैकी चार नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. या ठिकाणी काँग्रेसला गेल्यावेळी भोपळाही फोडता आलेला नाही. मात्र दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपने माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे आगामी निवडणूकीत समीकरणे बदलू शकतात असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत रत्नागिरीत झालेला विकासाचा बट्ट्याबोळ, रस्त्यांची दुरवस्था हा या निवडणूकीत महत्वपूर्ण आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे.

दापोली नगर पंचायतीत भाजप २, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४ व शिवसेना ७ असे संख्याबळ आहे. तर मंडणगड नगर पंचायतीमध्ये १७ ही सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत. मंडणगड नगर पंचायतीची मुदत एक वर्षापूर्वीच संपली असून कोरोनामुळे निवडणूक न झाल्याने या ठिकाणी प्रशासन नेमण्यात आले आहे.

जिल्ह्यात सहा ठिकाणी पुढील दोन महिन्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच नगरसेवकांतून नगराध्यक्षांची निवड होणार असल्याने या पदासाठीही कमालीची चुरस रंगण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र आता प्रभाग रचना निश्चितीकरणानंतर साऱ्यांच्या नजरा या प्रभागांतील आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. त्यानंतर मग इच्छुकांना धुमारे फुटणार आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यात आणि जिल्ह्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे आणि घडामोडी घडल्या आहेत. तर प्रत्यक्षात निवडणूक जाहीर होईल त्यावेळी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात जरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी स्थानिक पातळीवरील निवडणूकांमध्ये या तिन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी वा चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. भाजपने देखील सर्वच ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राजकीय घमासान पहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -