Friday, March 29, 2024
Homeमहत्वाची बातमीज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

सामाजिक, राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,माजी मंत्री आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे पीडित, शोषितांसह सर्वसामान्यांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना संसर्ग देखील झाला होता. पण या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन – चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारांनाही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आले नाही. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवले जाईल. कोरोनाचे निर्बंध पाळून लोकांना अंत्यदर्शन घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे जन्मलेल्या एन. डी. पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राला ते एन. डी. पाटील याच नावाने परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. त्यानंतर ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व रयत शिक्षण संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली. तब्बल १८ वर्षे ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. राज्य विधानसभेत त्यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले होते. राज्यात १९९९ साली आलेल्या लोकशाही आघाडी सरकारचे ते निमंत्रक होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडिकीने मांडले. लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. सीमाभागातील मराठी भाषिकांविषयी एन. डी. पाटील यांना प्रचंड आस्था होती. त्या चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्यांचा मोठा आधार वाटे. एन. डी. पाटील देखील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत. त्याशिवाय, लोकांसाठी झालेल्या अनेक लढ्यांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

ते महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्वं हरपले आहे. 

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी (नागाव), जि. सांगली

शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.(१९६२) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४ – १९५७ – छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी. लीट. पदवी, २०००

विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद- २००१

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी. लीट. पदवी

शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी – उपाध्यक्ष

अंधश्रद्धा निमूर्लन समिती, महाराष्ट्र – अध्यक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा – अध्यक्ष

जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर – अध्यक्ष

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) १९६२

काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) १९६३

वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) १९६६

महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक)१९७०

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) १९९२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)

नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक, दुर्बल शाखा विकास निधी, म. वि. रा. शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना, कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -