Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजनमन दौडने लगता हैं...

मन दौडने लगता हैं…

श्रीनिवास बेलसरे

प्रसिद्ध हिंदी कथालेखिका, कादंबरीकार, नाटककार श्रीमती महेंद्रकुमारी भंडारी (मन्नू भंडारी) यांची ‘आपका बंटी’ ही कादंबरी ‘धर्मयुग’ मासिकात क्रमश: प्रकाशित झाली आणि त्या प्रकाशझोतात आल्या!

या लेखिकेने नेहमी नवे विषय हाताळले. अलीकडे अमेरिकी संस्कृतीचे आपल्या समाजावरील प्रत्यारोपण पूर्ण होत आले असताना आपल्याला घटस्फोटाचे फार काही वाटेनासे झाले आहे. मात्र ५० वर्षांपूर्वी विवाहविच्छेद हा विषय भारतीय समाजमनाला शवविच्छेदनाइतकाच अभद्र आणि दु:खद वाटत असे. भंडारी यांनी त्यांच्या ‘आपका बंटी’ या कादंबरीत तो हळुवारपणे हाताळला होता. लहान मुलांच्या संवेदनशील मनावर घटस्फोटाचे किती घातक परिणाम होतात, हे त्यांनी कादंबरीतून समाजासमोर आणले.

बासू चटर्जींना भांडारींची ‘यही सच हैं’ ही कादंबरी खूप आवडली. त्यांनी तिच्यावरच ‘रजनीगंधा’(१९७४) हा मनोविश्लेषणात्मक चित्रपट काढला. अमोल पालेकर (सिनेमात संजय) आणि विद्या सिंहाचा (दीपा) हा पहिलाच चित्रपट! एक हळुवार रोमँटिक सिनेमा म्हणून तो खूप यशस्वी ठरला. मात्र त्याच्या अजून एका वैशिष्ट्यावर फारसा विचार झाला नाही. पुरुषाच्या जीवनात आलेल्या दुसऱ्या स्त्रीबद्दल अनेक कथा येऊन गेल्या. पण स्त्रीच्या जीवनात एकाच वेळी आलेल्या दोन पुरुषांबद्दल मात्र फारसे सिनेमे आले नाहीत. बासू चटर्जी यांनी ‘रजनीगंधा’मध्ये हा नाजूक विषय अतिशय हळुवारपणे हाताळला.

हृषीकेश मुखर्जी काय, बासूदा काय हे मुळात कलासक्त दिग्दर्शक! त्यांच्या प्रत्येक सिनेमाने निखळ आनंदच दिला. त्याशिवाय उच्च जीवनमूल्यांचे संवर्धन केले, पण ते कुठेही प्रबोधनाचा किंवा प्रचाराचा सूर न लागू देता! हलकेफुलके मनोरंजन देतानाच या अवघड गोष्टी हे दोघे दिग्दर्शक लीलया साधत असत.

रजनीगंधाला त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. सिनेमात केवळ दोन गाणी होती. राजेश खन्नाच्या ‘आनंद’सारख्या सिनेमाची गाणी लिहिलेल्या योगेश गौड या मनस्वी कवीच्या या दोन्ही गाण्यांना सलीलदांच्या संगीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. मुकेशला तर १९७४चा सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कारही मिळाला. पुरस्कार मिळालेले हे मुकेशच्या आवाजातले गाणे होते –

‘कई बार युही देखा हैं,
ये जो मनकी सीमारेखा हैं,
मन तोडने लगता हैं…’

दीपा (विद्या सिन्हा) ही दिल्लीत राहणारी कला शाखेची एक पदवीधर! तिचे संजयवर (अमोल पालेकर) बऱ्याच वर्षांपासून प्रेम आहे आणि त्यांचे लग्न करण्याचे ठरले आहे. संजय खूप बोलका, आनंदी असा सज्जन मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्याला शिस्त नाही, शिवाय तो विसराळू आहे आणि तो कोणतीच वेळ पाळू शकत नाही!

एक दिवस दीपाला मुंबईच्या कॉलेजातून नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावणे येते आणि अचानक तिच्या जीवनात ‘नवीन’चा प्रवेश होतो. नवीन (दिनेश ठाकूर) हा तिचा कॉलेज जीवनातील प्रियकर आहे. त्याच्या भेटीमुळे सगळ्या पूर्वस्मृती जाग्या होऊन तिच्या मनात एक द्वंद्व निर्माण करतात. दीपाला नोकरी मिळते आणि तिच्यासमोर एक पेच उभा राहतो, नव्या परिस्थितीत आता कोणाला जीवनसाथी बनवू? कुणाला विसरून जाऊ?

सिनेमात ही समस्या दीपाची असली तरी गाणे असे लिहिले होते की, त्याचा आशय असंख्य प्रेक्षकांना आपलासा वाटणारा झाला होता. गीतकारांनी एका मुग्ध, संकोची मात्र स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या, स्त्रीच्या मनात शिरून गीताची हळुवार रचना केली होती.

‘रजनीगंधा’ हे त्यावेळच्या संकोची, मुग्ध, सुसंस्कारित, संयमी स्त्रीच्या मनातील एका कठीण समस्येचे चित्रण होते. आपली लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही, अगदी मनातही नाही, हा स्त्रीमनातील आग्रह एकीकडे आणि जीवनाने समोर ठेवलेले आकर्षक पर्याय दुसरीकडे! यात स्त्री बहुधा लक्ष्मणरेषा पाळायचीच निवड करत असे. तरीही मनात विचारांच्या लहरी तर उठणारच ना? त्या इतक्या सूक्ष्म, हळव्या, सुप्त असत की त्यांना टिपायला बासूदांसारखाच दिग्दर्शक हवा!

सीमा एकदा ओलांडावीच असे दीपाला वाटते, तर दुसरीकडे तिच्या मनाचा लाजराबुजरा निशिगंध फक्त रात्रीच्या, अगदी ओळखीच्या, एकांतातच फुलू शकतो, हेही तिच्या लक्षात येत राहते. त्यामुळे नव्या जीवनाची निवड करून नवीनला आपलेसे करण्याचे धाडस तिला होत नाही! संजयचे साधेपणही तिला बांधून ठेवते. ही मुग्ध मन:स्थिती सुंदर शब्दांत मांडणारे गाणे म्हणूनच प्रेक्षकांना आपल्याच मनाचे प्रतिबिंब वाटले होते.

कई बार युँही देखा हैं, ये जो मनकी सीमारेखा हैं,
मन तोड़ने लगता हैं…
अनजानी प्यासके पीछे, अनजानी आसके पीछे,
मन दौड़ने लगता हैं…

दीपाला तिच्या मनात उमलू लागलेल्या प्रेमाच्या अंकुराला फुलू द्यायची इच्छा आहे. पण मनच मागे खेचते आहे. काय करावे कळत नाही. दीपासारखेच अनेकदा असे अनेकांचे होत असते –

राहोंमें, राहोंमें, जीवनकी राहोंमें,
जो खिले हैं फूल, फूल मुस्कुराके,
कौनसा फूल चुराके, रख लूँ मनमें सज़ाके,
कई बार यूँ भी…

ती निर्णय घेऊच शकत नसते म्हणूनच कदाचित, हे गाणे पार्श्वसंगीतासारखे वारंवार वाजत राहते. ते दीपाच्या मनातील विचारलहरींचे प्रतीक आहे –

जानूँ ना जानूँ ना, उलझन ये जानूँ ना.
सुलझाऊ कैसे कुछ समझ न पाऊँ.
किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूही देखा हैं…

त्यातच ती दिल्लीला परतते आणि तिला संजय दारातच तिला आवडणारी निशीगंधाची फुले घेऊन प्रसन्न मुद्रेने उभा दिसतो. क्षणात सगळा गोंधळ संपतो. आपले खरे प्रेम संजयाच्या साधेपणावरच आहे, हे लक्षात येऊन दीपाच्या मनाचे आभाळ निरभ्र होते! सगळा गुंता सुटतो आणि ती स्वत:शीच पुटपुटते ‘यही सच हैं, बस यही सच हैं.’ एक सुंदर सिनेमा! नॉस्टॅल्जिया आणि वर्तमान यात येरझारा घालणारा. पुन्हा एकदा पाहायलाच हवा ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -