Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीआदिस्ते महिला सरपंच हत्याकांडाने तालुका हादरला

आदिस्ते महिला सरपंच हत्याकांडाने तालुका हादरला

२४ तासांत ७ संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

संजय भुवड

महाड : महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामधील आदिस्ते ग्राम पंचायतीच्या सरपंच मिनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्यावर भरदिवसा जंगल भागातील निर्जन परिसरात लैंगिक अत्याचार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण तालुका हादरला असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या हत्याकांडाचे पार्श्वभूमीवर पोलिसांनी ७ संशयितांना ताब्यात घेतले.

खाडीपट्ट्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या काल दुपारी झालेल्या अज्ञातांकडून क्रूर हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने केलेल्या कडक कारवाईमध्ये सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. महाड माणगांव रोहा श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १२ पोलिसांची पथके तपास करत असून कोणत्याही क्षणी या हत्याकांडातील प्रमुख आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक दुधे यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच हिवाळी अधिवेशनात व्यस्त असलेल्या रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी रात्री उशीरा महाडला भेट देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, स्थानिक कार्यकर्त्यांकडून झाल्या प्रकाराची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीचे व आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले आहेत. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनीही रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन मृत महिला सरपंचाच्या नातलगांचे सांत्वन केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मीनाक्षी खिडबिडे यांचा मृतदेह शवविच्छेदन व पुढील तपासणीसाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे सोमवारी दुपारी पाठवण्यात आला.

महाड तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २७ डिसेंबर रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सरपंच मीनाक्षी खिडबिडे या आदिस्ते उभटआळी येथील आपल्या घरालगत असलेल्या जंगलामध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या एकट्या असल्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने अथवा इतर कोणत्या तरी हत्याराने उपट मारून त्यांना जखमी केले व त्या ठिकाणाहून त्यांना खेचत बाजूलाच असलेल्या बांबूच्या बेटातील मोकळ्या जागेत नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बाजूला असणाऱ्या दगडाने अथवा अन्य हत्याराने त्यांच्या डोक्यावर उपट मारून जीवे ठार मारले. सायंकाळी त्या परिसरातून येणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पाटीलांकरवी तालुका पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली. हत्येची माहिती प्राप्त होताच तालुका पोलिसानी तातडीने कार्यवाही करून डीवायएस नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला.

रात्री उशीरा रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनीही घटनास्थळी भेट देऊन या संदर्भात सुरू असलेल्या तपासात अधिक मूल्यवान सूचना देत १२ पथकांची विविध ठिकाणांसाठी नेमणूक करून या घडलेल्या घटनेचा तपास अल्पावधीत पूर्ण करण्याचे संकेत दिले. मंगळवारी सकाळीसुद्धा झालेल्या दुर्दैवी प्रसंगाच्या परिसरात स्थानिक ग्रामस्थांना अथवा पत्रकारांना जाण्यास परवानगी मिळू शकली नाही.

१५ वर्षांपूर्वीच्या हत्येची आठवण

या गावाच्या परिसरात भेलोशी गावचे हद्दीत सुमारे १४ ते १५ वर्षांपूर्वी दोन युवकांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. याची आठवण सोमवारी झालेल्या सरपंचांच्या निर्घृण हत्येनंतर खाडी पट्ट्यासह तालुक्यातील नागरिकांना स्मरण देऊन गेली. या हत्येचा तपास आजपावेतो लागला नसल्याची चर्चा खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा सुरू झाली आहे.

महाडच्या सौहार्द वातावरणाला डाग

महाड तालुक्यात अशा क्रूर पध्दतीने झालेल्या घटनेने वीर गावांमधील झालेल्या शालेय मुलीच्या हत्येचीदेखील नागरिक आठवण करत असून महाडची असलेली परंपरा व सौहार्द वातावरणाला ही हत्या डाग लागणारी ठरल्याची प्रतिक्रिया जनसामान्य व्यक्त करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -