सुवर्ण गणेश

नाना चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ

विनायक नार्वेकर, विष्णू कुडाळकर, विणू दामले, मधुकर आजगावकर यांनी १९४२ मध्ये नाना चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. भक्तांकडून मिळणा-या आर्थिक मदतीतून मंडळातील कार्यकर्त्यांसाठी रक्तदान शिबिर, वैद्यकीय शिबिर, तसेच गरजू रुग्णांना विनामूल्य औषधांचे वाटप केले होते. चौकासमोरील पालिका शाळेतील पाच मुलेही मंडळाच्या वतीने दत्तक घेण्यात आली होती. मात्र, तेथील जुन्या चाळींची जागा मोठया गगनचुंबी इमारतींनी घेतल्याने इतरत्र विखुरलेल्या रहिवाशांनी गणपतीसाठी पुन्हा एकत्र येऊन, आपला चाळीतला सण अगदी धूमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले. तेव्हापासून आजतागायत जुने रहिवासी आणि तरुण कार्यकर्त्यांचा अनोखा मिलाप येथे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही पिढी आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मंडळाची सर्व माहिती मंडळाच्या वेबसाइटवर टाकते. कारभाराची सूत्रे पेलायला आम्ही तयार आहोत, असा विश्वास नव्या पिढीने मंडळाला दिला आहे. यंदा या मंडळाचे ७१वे वर्ष आहे.

यंदाचे विशेष आकर्षण

आजच्या पिढीला आपल्या आईवडिलांचा विसर पडला आहे. आपले वेगळे बस्तान बसवून, वृद्धापकाळात त्यांची सेवा करणे टाळणा-या स्वार्थी पिढीला मातापित्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांकडून सात मिनिटांचे पथनाटय सादर केले जाणार आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे पथनाटय़ सादर करण्यात येईल.

कार्यकारिणी मंडळ

अध्यक्ष – रवीकांत बावकर

उपाध्यक्ष – हेमंत शेळके

सचिव – नारायण आव्हाड, प्रसाद आर्गेकर

पाटील इस्टेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रॅँट रोड

मलबार हिल तालुक्यामधील पाटील इस्टेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांच्या देखाव्यासाठी आणि सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. १९६० मध्ये पाटील इस्टेटचे मालक भीमगोंडा पाटील यांनी येथील स्थानिकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार येथील स्थानिक दरवर्षी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे या गणेश मंडळाची खासियत म्हणजे मंडळातील कार्यकर्ते स्वत:हून सजावटीचे कामकाज करतात. अत्यंत कमी खर्चात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे उभारले जातात. या मंडळाच्या गणेशमूर्तीचीही आगळीवेगळी ओळख आहे. मोठी मूर्ती केवळ साडेपाच फुटांची असते. गुलाल न उधळता, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाची मिरवणूक काढली जाते, हे या मंडळाचे आणखी एक वैशिष्टय आहे. यंदा मंडळाचे ५२ वे वर्ष आहे. मंडळाच्यावतीने येथील नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.

यंदाचे विशेष आकर्षण

यंदा गणपती उत्सवात काहीतरी वेगळे करण्याचे कार्यकर्त्यांचे प्रयोजन आहे. त्यामुळे यंदाचा देखावा नेहमीप्रमाणे मंदिराचा असला तरी काहीतरी खास असेल. हे ‘सरप्राईज’ गुलदस्त्यात ठेवण्यात आले असल्याचे अध्यक्ष कमलाकर दळवी यांनी सांगितले.

कार्यकारिणी मंडळ : अध्यक्ष – कमलाकर दळवी

कार्याध्यक्ष – गणेश सावंत, दिलीप साळसकर

सचिव: पुरुषोत्तम चोपडेकर

खजिनदार – गोपाळ चोपडे

जुनी प्रभादेवीचा गणराज

जुनी प्रभादेवीचा गणराजा म्हणून ओळखल्या जाणा-या या गणपतीची स्थापना १९५७ मध्ये झाली. आज जुन्या प्रभादेवीचं रूपडं पालटलेलं असलं, तरी पूर्वी या ठिकाणी हातिसकर वाडी, मोतीवाला बंगला, नरिमन वाडी, सत्यवाडी, वायंगणकर वाडी, तोडणकर अशा वाडया होत्या. या वाडयांमधील बहुतांशी रहिवासी हे गिरणी कामगार होते. या सर्व गिरणी कामगारांना एकत्र आणण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून अनंत नागवेकर यांनी १९५७ मध्ये या गणराजाची स्थापना केली. आज हाच गणपती जुनी प्रभादेवीचा गणराज म्हणून ओळखला जातो. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ५६ वर्ष हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या काळात मंडळाच्या वतीने शारीरिक व बौद्धिक स्पर्धाचे आयोजन, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा, दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच गरजू विद्यार्थ्यांना अर्थिक मदत अशा प्रकारचे सामाजिक कार्यही केले जाते.

यंदाचे विशेष आकर्षण

चित्रपट अभिनेता आमिर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन ‘स्त्रीभ्रूणहत्ये’वर आधारित देखावा सादर करून मुलींचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मंडळाने मागील वर्षी केला होता. या वर्षी ‘मी मराठी’ या संकल्पनेवर आधारित, मराठी संस्कृतीत आतापर्यंत झालेला बदल देखाव्याच्या स्वरूपात दाखवणार आहेत. यात गिरणगावच्या चाळीत राहणारा मराठी माणूस ते गिरणीच्याच जागेवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीत राहणारा मराठी माणूस याचे सादरीकरण करून मराठी माणसांची बदलती स्थिती दाखवण्याचा यामागचा उद्देश असल्याचे मंडळाचे सदस्य अजय पोळेकर सांगतात.

कार्यकारिणी मंडळ : अध्यक्ष – डॉ. व्ही.आर. देसाई

उपाध्यक्ष – सुरेश जितरे, समीर भिडू, आनंद घरत, सुरेश जगताप, सागर नार्वेकर, चंद्रकांत नागवेकर

अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळअभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ५६ वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. या मंडळाचे वैशिष्टय म्हणजे, हे मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रम राबवते. परिसरातील नागरिकांसाठी तसेच दुर्गम भागातील आदिवासीपाडयांमध्ये वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. आदिवासीपाडयांमध्ये जेथे औषधांचा व वैद्यकीय सेवेचा अभाव आहे अशा ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने विनामूल्य उपचार व औषधे पुरवली जातात.
या वर्षी मंडळाने शहापूरमधील निसनपाडा या दुर्गम आदिवासीपाडयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने तेथील आदिवासी रुग्णांवर विनामूल्य उपचार केले व औषधेही दिली. मागील वर्षी दिवाळीमध्ये अनाथ मुलांच्या आश्रमाला भेट देऊन फराळ व खेळणी दिली. महिलाश्रमाला भेट देऊन तेथील महिलांच्या व्यथा जाणून घेऊन आíथक मदतही केली. मागील वर्षी मंडळाने श्री. श्री. मंगेशदा फाउंडेशनच्या सहकार्याने नेत्रदानासाठी इच्छुक असणा-या एक हजार लोकांचे अर्ज भरून घेतले. मंडळाच्या वतीनेराष्ट्रीय स्तरावर एकांकिका स्पर्धेचे आयोजनही केले जाते. उत्कृष्ट देखावा, सामाजिक जनजागृती आणि स्त्री-भ्रूण हत्या यांसारख्या विषयांवर चित्र देखावा सादर केल्यामुळे मंडळाला प्रथम पारितोषिकही मिळालेले आहे. या वर्षीही मंडळाचा विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. यंदा अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ५७व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाचे विशेष आकर्षण : या वर्षीची श्रींची देखणी मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार राजू शिंदे यांनी साकारलेली आहे. यंदा मंडळाने ‘राजाचा शामियाना’ साकारलेला आहे.

सजावटीचे काम कलादिग्दर्शक चंद्रशेखर परब यांनी केले आहे.

कार्यकारिणी मंडळ : अध्यक्ष – दिलीप बने, सचिव – अनिल साटले, खजिनदार – विनय भोजने, स्वागताध्यक्ष – निशांत बर्वे, कार्याध्यक्ष – संतोष रसाळ, अं. हि. तपासनीस – राजेश खिलारी.