बीजिंग (वृत्तसंस्था) : उत्सवांमधल्या दिव्यांच्या रोषणाईचे चाहते अनेक आहेत; पण ते मधुमेहाच्या (Diabetes) आजारालाही जन्म देत आहेत. सर्व प्रकारचे कृत्रिम दिवे, मोबाईल-लॅपटॉपसारखे गॅजेटस्, शोरूमच्या बाहेरचे एलईडी, कारचे हेडलाइट्स किंवा होर्डिंग्ज यामुळेही मधुमेह होतो, यावर विश्वास बसत नाही. परंतु संशोधनात ते सिद्ध झाले आहे.

कृत्रिम प्रकाशामुळे मधुमेहाचा धोका २५ टक्क्यांनी वाढतो. चीनमधल्या एक लाख लोकांवर केलेल्या संशोधनात दिसून आले आहे की, स्ट्रीट लाइट आणि स्मार्टफोनसारखे कृत्रिम दिवे किंवा डिस्प्ले मधुमेहाचा धोका २५ टक्क्यांनी वाढवू शकतात. रात्रीच्या वेळीही आपल्याला दिवसाचा अनुभव देणारे हे दिवे माणसाच्या शरीराचे घड्याळ बदलू लागतात. त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्याची शरीराची क्षमता कमी होते.

शांघायच्या रुजिन हॉस्पिटलचे डॉक्टर युजू म्हणतात, की जगातल्या ८० टक्के लोकसंख्येला रात्रीच्या अंधारात प्रकाश प्रदूषणाचा सामना करावा लागतो. चीनमध्ये प्रकाश प्रदूषणामुळे मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत. प्रकाश प्रदूषण म्हणजे अतिरिक्त प्रकाश होय. केवळ चीनमध्ये प्रकाश प्रदूषणामुळे ९० लाख लोक मधुमेहाला बळी पडले आहेत. हे लोक चीनच्या १६२ शहरांमध्ये राहतात.

चीनच्या ‘नॉन-कम्युनिकेबल डिसीज सर्व्हिलन्स स्टडी’मध्ये त्यांची ओळख पटली. त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा तपशील त्यात नोंदवला आहे. अगदी त्यांचे उत्पन्न, शिक्षण आणि कौटुंबिक इतिहासही नमूद करण्यात आला आहे. संशोधनादरम्यान, कृत्रिम प्रकाशात दीर्घकाळ अंधारात राहिलेल्या २८ टक्के लोकांना अन्न पचण्यास त्रास होऊ लागला. कारण प्रकाशामुळे शरीरातले ‘मेलाटोनिन हार्मोन’चे उत्पादन कमी झाले.

हा हार्मोन आपली चयापचय प्रणाली योग्य ठेवतो. प्रकाशामुळे शरीरातली ग्लुकोजची पातळी वाढते. वास्तविक, सतत कृत्रिम दिव्यांच्या संपर्कात असणाऱ्यांच्या शरीरातली ग्लुकोजची पातळी काहीही न खाता वाढू लागते. यामुळे आपल्या शरीरातल्या बिटा पेशींची क्रिया कमी होते. या पेशीच्या सक्रियतेमुळे स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन बाहेर पडतो. डॉ. युजू म्हणतात की कृत्रिम प्रकाशाच्या जास्त संपर्कात येणे ही जगभरातल्या आधुनिक समाजाची समस्या आहे आणि ते मधुमेहाचे आणखी एक प्रमुख कारण बनले आहे. प्रकाश प्रदूषणामुळे कीटक अकाली मरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here