Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीम्हाडाला हवे ‘झोपू’कडून दोन हजार कोटींचे कर्ज

म्हाडाला हवे ‘झोपू’कडून दोन हजार कोटींचे कर्ज

अवघ्या एक टक्के दराने हवेय कर्ज

मुंबई (प्रतिनिधी) : २०१६ पासून सुरू झालेल्या बीडीडी चाळ प्रकल्पाला विलंब लागत असल्याने म्हाडावरील खर्चाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विक्री करावयाच्या निवासी तसेच अनिवासी सदनिका तयार होण्यास वेळ असल्याने कंत्राटदारांची देयके चुकविण्यासाठी म्हाडाला तात्काळ पैशांची गरज आहे. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून दोन हजार कोटींचे कर्ज एक टक्का दराने म्हाडाला हवे आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या म्हाडाला या प्रकल्पासाठी कर्जरोखे, मुदत कर्जासाठी शासनाची परवानगी हवी आहे.

उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ नोव्हेंबर रोजी तातडीने बोलाविलेल्या बैठकीत बीडीडी चाळ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी म्हाडा अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. वरळी येथे पुनर्वसनातील इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या एका विंगचे काम तिसऱ्या मजल्यापर्यंत झाले आहे तर उर्वरित चार विंगच्या इमारतीच्या पायापर्यंत काम झाले आहे. वरळी येथे पहिल्या टप्प्यात ३४ चाळींतील दोन हजार ५२० रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. नायगाव येथील २३ चाळींतील १८२४ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी फक्त खोदकाम सुरू झाले आहे. तर एन. एम. जोशी मार्ग येथील प्रकल्पात पुनर्वसन इमारतीच्या पाईलिंगचे काम सुरू आहे. सात वर्षांनंतरही म्हणावा तसा वेग या प्रकल्पाने पकडलेला नाही. तरीही नियोजित सात वर्षांत पुनर्वसनाच्या इमारती तयार होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकल्पातील एकूण १३ हजार ५४४ रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी फक्त ३ हजार ११६ संक्रमण सदनिका उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी संक्रमण सदनिका किंवा रहिवाशांना किती भाडे द्यायचे हा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला. या प्रकल्पासाठी म्हाडाला सुरुवातीच्या काळात काही हजार कोटींची गरज आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विक्रीसाठी व्यापारी गाळे तयार होण्याची शक्यता आहे. हे गाळे लिलावाद्वारे वा निविदेद्वारे विकण्याची परवानगीही शासनाकडे मागण्यात आली आहे. बीडीडी चाळ प्रकल्प ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावा यासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जे काही हवे ते सांगा. तसे प्रस्ताव पाठवा, ते तात्काळ मंजूर केले जातील, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -