Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमाथेरानला सोनकीचा साज

माथेरानला सोनकीचा साज

पिवळ्या सोनकीने लखलखले माथेरान, पर्यटकांसाठी पर्वणी

कर्जत (वार्ताहर) : माथ्यावरचे रान अशी बिरुदावली माथेरानला लाभली आहे. ती काही उगीच नाही. इथला निसर्ग, ऑक्सिजनचा खजिना, वातावरणीय बदल, ऊन पावसाचा खेळ या सगळ्या गोष्टी पर्यटकांना भुरळ घालत असतात. अशातच पावसाचा जोर कमी होऊन शिरशिरी आणणारा हिवाळा सुरू होताना येथे वेगवेगळी फुले बहरत असतात. त्यातच माथेरानच्या डोगरांवर पसरलेली सोनकी फुले यामुळे माथेरानच्या सौंदर्याला सोनकीच्या साज चढत असून माथेरान सोन्यासारखे लखलखत असते. निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी असते.

मुंबई-पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर समुद्रसपाटीपासून ८०० मीटर अंतरावर माथेरान वसले आहे. सन १८५०मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला होता. आज जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आवर्जून भेट देतात. माथेरानने आजही आपले वेगळे अस्तित्व जपले आहे. पर्यावरण संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये आजही वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोड्यांची रपेट, मिनी ट्रेनचा रंजक प्रवास, लालमातीचा हळुवार स्पर्श घरी जाईपर्यंत आपल्या सोबत राहतो. येथे असलेल्या पॉईंटची स्वतःची वेगळी खासियत असून हवेतील गारवा पर्यटकांना या जगाचा विसर पाडतो. या ठिकाणी पर्यटकांना ऑक्सिजनचा अफाट खजिना मिळतो. यासोबत येथे वेगवेगळॆ वन्यजीव, आणि वनसंपदा यात पर्यटक गुरफटून जात इथलाच होऊन जातो.

जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात माथेरानमध्ये २०० ते ३०० मिमी एवढा पाऊस पडतो. त्यासोबत पाऊस जाताना सुरू होणाऱ्या हिवाळ्यात येथील डोंगर-दऱ्या बहरतात ते सोनकीच्या पिवळ्या फुलांनी. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात असलेल्या कासपठारावर या दिवसांत फुले बहरत असतात. अशीच परिस्थिती माथेरानमध्ये असते. या सोनकीच्या फुलांनी माथेरानचे डोंगर सोन्यासारखे लखलखत असतात. अनेकदा ही सोनकीची फुले नवरात्रीत देवीला वाहण्याचीदेखील परंपरा आहे. सोनकीची ही फुले रानटी असली तरी ती सूर्यफुलाप्रमाणे भासतात. मात्र, ती लहान असतात. वर्षातून एकदा बहरणाऱ्या या फुलांमध्ये रमण्याची ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. माथेरानमध्ये येणारे पर्यटक विविध पॉईंट फिरत असताना ही फुले त्यांनाही टवटवीत करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -