Thursday, April 25, 2024
Homeताज्या घडामोडीमनसेला खिंडार; तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

मनसेला खिंडार; तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

  • देवा पेरवी

पेण : पेण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून मनसेचे पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील, महिला तालुका अध्यक्ष रेखा तांडेल, महिला शहर अध्यक्ष निकिता पाटील, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष निकेश पाटील, पेण शहर अध्यक्ष आदित्य कदम, तालुका उपाध्यक्ष हनुमान नाईक, सचिन भोईर, तालुका सचिव हिरामण जेधे, हमरापूर विभाग अध्यक्ष साहिल म्हात्रे, पूर्व विभाग अध्यक्ष ओमकार कचरे, वडखळ विभाग अध्यक्ष रोहित पाटील, कासू विभाग अध्यक्ष धनाजी पाटील, वाशी विभाग अध्यक्ष हिरामण पाटील आदी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह असंख्य शाखा प्रमुख, गाव प्रमुख व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश प्रसंगी आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, शे. का. पक्षाचं अस्तित्व संपत चाललं आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत त्याची प्रचिती पाहता आली. येत्या आठवड्यात शे. का. पक्षाचं पेण तालुक्यातील अस्तित्वही संपुष्टात येईल. शिवसेना शिंदे गटांमध्ये जिल्ह्यातील अनेक इतर पक्षातील नेतेमंडळी प्रवेश करायला इच्छुक आहेत. प्रवेश करणाऱ्या सर्वांना सन्माची वागणूक देण्यात येते. रुपेश पाटील सारख्या युवा कर्तुत्वाला जिल्ह्याचं मानाचे पद देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी केली.

तर रुपेश पाटील यांनी बोलताना मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यावर जहरी टीका केली. मनसेतील पक्षांतर्गत राजकारणामुळे कंटाळून अखेर मी राज ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून व कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. यापुढे शिवसेना पक्ष वाढीसाठी पुर्ण ताकदीने काम करणार असून शेवट पर्यंत महेंद्र दळवी यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाही रूपेश पाटील यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई म्हणाले की, आमदार महेंद्र दळवी हे वन मॅन आर्मी प्रमाणे काम करीत आहेत. त्यांनी अलिबाग तालुक्याच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावला आहे. आमदार दळवी यांनी एकट्याने शेकापला खिंडार पाडले. आ.महेंद्र दळवी खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण करीत आहेत. बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना एकनाथ शिंदे यांनी साकारली आहे. आगामी निवडणूकीत जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

रुपेश पाटील यांच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख राजा केणी, पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवळे, राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष महेश पोरे, अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे, युवासेना संजय म्हात्रे, पेण विधासभा संघटक राहूल पाटील, बाळा म्हात्रे, तालुका संपर्क प्रमूख यशवंत मोकल, महिला आघाडीच्या अंजली जोगळेकर, शैलेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -