Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसिंधुदुर्गच्या माई, आमच्या निलमताई

सिंधुदुर्गच्या माई, आमच्या निलमताई

सौ. संजना संदेश सावंत

लहान असताना आई आणि लग्न झाल्यावर पत्नी या दोन भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जर घरची आणि घरातील अवलंबून असलेल्या माणसाची चिंता नसेल, तर पुरुषाच्या जीवनातील एक बाजू भक्कम होते आणि तो यशाच्या पायऱ्या संपूर्ण आत्मविश्वासाने आणि जोशाने चढू शकतो. म्हणून यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असे म्हटले जाते. आई, बहीण, पत्नी अशा प्रत्येक वळणावर स्त्री प्रत्येक पुरुषाच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा आहे. घरातील संपूर्ण वातावरणात आनंदी आनंद पसरवते ती घरातील स्त्री. भविष्यात, पुराणात अशा स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत की, ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रीला लग्न होऊन ज्या घरी जाते त्या घराला स्वर्ग बनवते. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ. निलमताई राणे. आज निलमताईंचा वाढदिवस. सर्वप्रथम ताईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आजच्या संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याची जगात खऱ्या अर्थाने ओळख आहे ती केवळ कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय श्री. नारायणराव राणेसाहेब यांच्यामुळेच. दादांच्या आगमनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख झाली. दादांच्या कार्याचा आलेख नेहमीच चढत राहिलेला आहे. या त्यांच्या यशाचे खरे श्रेय जाते ते निलमताईंना. सुख- दुःखामध्ये निलमताई दादांच्या तसेच सर्व कुटुंबाच्या पाठीशी एखाद्या पहाडासारख्या उभ्या राहतात म्हणूनच आज राणे कुटुंबीय यशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झालेले आपणास पाहावयास मिळते. कणकवली येथील एसएसपीएम इंजिनीअरिंग कॉलेज तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पडवे येथील सुसज्ज रुग्णालय निर्मितीमध्ये निलमताई यांचा सिंहाचा वाटा आहे.

दादांप्रमाणेच निलमताई सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी विचार करत असतात. ओसरगाव येथील सिंधुदुर्ग महिला भवन यांच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो महिला स्वावलंबी जीवन जगून स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत ही समाधानकारक बाब आहे. सिंधुदुर्ग महिला भवन हे सिंधुदुर्गातील महिलांच्या विकासाचे केंद्र बनले आहे. कापड उद्योग, शिलाईकाम, लोणचे, पापड, लाडू उद्योग, फळांवरील प्रक्रिया, घरगुती खाद्यपदार्थ निर्मिती, हस्तकला, अगरबत्ती निर्मिती, मेणबत्ती, उटणे, सुगंधी द्रव्ये याचे उत्पादन व्यवसाय प्रशिक्षण आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना प्रशिक्षित करून खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य निलमताई करताहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उद्योजक व्हाव्यात हे त्यांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न उराशी बाळगून निलमताई आपले योगदान देत आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलांना मार्गदर्शन केले जाते. महिलांना स्वावलंबी बनवून महिला सक्षमीकरण करण्याचे काम निलमताई करताहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीने निलमताईंचे व्यक्तिमत्त्व नियमित प्रसन्न असते. आपल्या दोन्ही मुलांना लहानपणापासून उत्तम संस्कार केल्याने आज माजी खासदार निलेश राणेसाहेब व आमदार श्री. नितेश राणेसाहेब महाराष्ट्रमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. कुटुंबवत्सल असलेल्या निलमताई नेहमीच आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने महिलांना स्वावलंबी बनविले आहे. निलमताई या जरी प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसल्या तरीही पडद्यामागे नारायणराव राणेसाहेब यांच्यासोबत कायमच त्या कार्यरत असतात.

नारायणराव राणेसाहेब यांच्या पत्नी निलमताई यांनी प्रत्येक पावलावर राणेसाहेब यांना साथ दिली. राणेसाहेब यांच्या या राजकीय प्रवासात निलमताई कायम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. निलमताई यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही. पण कठीण काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आजही सिंधुदुर्गच्या सर्व कार्यक्रमांमध्ये नारायणराव राणेसाहेब यांच्यासोबत त्यांचा वावर असतो. म्हणून म्हणावेसे वाटते…

सिंधुदुर्गच्या माई, आमच्या सौ. निलमताई…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -