Thursday, March 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमहाआघाडीला झटका

महाआघाडीला झटका

नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या निकालांमध्ये भाजपने बाजी मारली. नागपूरमध्ये राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अकोल्यामधून वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी अनुक्रमे, काँग्रेसचे मंगेश देशमुख आणि शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना हरवले. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये पराभव पाहावा लागल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. दोन्ही विधान परिषद निवडणुकीत भाजपने आपली मते केवळ राखलीच नाहीत, तर महाविकास आघाडीची ९६ मते आपल्याकडे फिरवली. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ होते.

मात्र, काँग्रेसने चमत्कार घडवण्याचा दावा केला होता. त्यांचा दावा फोल ठरला. मतदानाच्या काही तास आधीच काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढत मंगेश देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीवरूनच गोंधळ असल्याचे चित्र होते. मतदानाच्या काही तासांआधीच उमेदवार बदलण्यात आला. त्यातून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभिन्नता असल्याचे दिसून आले. अकोला मतदारसंघातील बाजोरिया पॅटर्न मोडीत निघाला. या मतदारसंघातून भाजपने अकोल्यातील उद्योगपती तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली होती. अकोला महापालिकेसह अनेक नगर परिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेल्या भाजपने ही निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवली होती.

भाजप-आरएसएसच्या ‘करेक्ट’ नियोजनापुढे बाजोरिया कमी पडले. भाजपने त्यांच्याच पॅटर्नने मात केली. या निवडणुकीत भाजपने आघाडीची तब्बल ८० मते आपल्याकडे वळती केली. कुठलाही पराभव हा अंतिम पराभव नसतो. मात्र पराभवातून बोध घेतला. मागील चुका टाळल्या तरच भविष्यात विजयाची आशा बाळगता येते. अनेक पराभवानंतरही आघाडी सरकार बोध घेत नाही. नागपूर आणि अकोला निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची बाजू मांडली आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता, पण भाजपचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या मजबूत होता. ९० मते जास्त असतानासुद्धा त्यांना सर्व उमेदवार घेऊन पळावे लागले. त्यांचा घोडेबाजार करावा लागला. हाच खऱ्या अर्थाने भाजपचा नैतिक पराभव आहे. निकालाचे आम्ही स्वागत करतो. पण भाजपने जे कृत्य केले त्यातून त्यांचा नैतिक पराभव झाला. लोकांमध्ये निवडून येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकांनी भाजपचा पराभव केला, असे पटोले यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अकलेचे तारे तोडले. विधान परिषद निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर झालेली निवडणूक नव्हती, म्हणून आम्ही हरलो, असा अजब युक्तिवाद त्यांनी केला. नाना पटोले यांना सांगावेसे वाटते की, आपला तो विजय आणि दुसऱ्याने केलेला घोडेबाजार, असे म्हणून तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. वास्तविक पाहता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी होती. मात्र, त्यांनी अंतर्गत बंडाळीकडे दुर्लक्ष करताना, भाजपला लक्ष्य करताना अपयश झाकण्याचा प्रयत्न केला.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला लक्ष्य करताना त्यांच्या मागील १० वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. काँग्रेस पक्ष मागील दशकांत ९० टक्के निवडणुका हरल्या आहे, असे गणित किशोर यांनी मांडले आहे. केंद्रातील भाजप सरकारला पुढील अनेक वर्षे धोका नाही. तरीही भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अंतर्गत कलहामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. पक्ष असो किंवा आघाडीचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने निवडले जावे, अशी भूमिका किशोर यांनी मांडली आहे. एका भक्कम विरोधी पक्षाची कल्पना आणि जागा यांचे प्रतिनिधित्व काँग्रेस करीत आहे; परंतु काँग्रेसचे नेतृत्व करणे हा एका विशिष्ट व्यक्तीचा दैवी हक्क असू शकत नाही, असे सांगताना त्यांनी काँग्रेस पक्षातील नाराज नेत्यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे. राज्यातही काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे काही खरे नाही. राज्यातील महाविकास आघाडीतील एक पक्ष असला तरी सरकारमधील निर्णय प्रक्रियेत काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांना कितपत सामावून घेतले जाते, हे जगजाहीर आहे. तरीही केवळ सत्तेसाठी काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडीशी जुळवून घेतले आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असले तरी राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री आणि त्यांच्यामध्ये समन्वय नाही. मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांचेही तसेच आहे. स्वत:चे पद सांभाळण्यासाठी, वेळ पडल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल, असे ओरडून सांगितले जाते; परंतु त्यांना त्यांचा आवाका ठाऊक आहे. भाई जगताप यांना पक्षांतर्गत विरोध आहे. वांद्रे, पूर्वचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी अनेक वेळा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून मुंबई अध्यक्षांच्या ‘दादा’गिरीची तक्रार केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही आलबेल नसल्याचे नागपूर आणि अकोला विधान परिषद निवडणूक निकालांनी स्पष्ट झाले आहे. तरीही काँग्रेस असो किंवा शिवसेना पक्ष, त्यांच्या चुका मानायला तयार नाही. भाजपला जनाधार आहे. त्यामुळे भविष्यातही त्यांना मोठे यश मिळणार आहे. या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती आली. तीन पक्षांच्या आघाडी सरकारसमोर विधान परिषद निवडणुकांमधील धक्कादायक निकालांनंतर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -