Thursday, March 28, 2024
Homeक्रीडामहामुंबई कबड्डी लीगचा दम पुन्हा घुमणार

महामुंबई कबड्डी लीगचा दम पुन्हा घुमणार

मुंबई : मुंबई उपनगरातील खेळाडूंना आपली गुणवत्ता आणि आपला दमदार खेळ दाखवता यावा म्हणून त्यांची हक्काची असलेली महामुंबई कबड्डी लीग पुन्हा एकदा आपला दम घुमविण्यासाठी सज्ज होतेय. 2 ते 16 जुलैदरम्यान इनडोअर रंगणाऱ्या या लीगच्या संघबांधणीसाठी खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून ती येत्या 15 मेपर्यंत सुरू राहिल आणि या ऑनलाईन नोंदणीत उपनगरातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धेचे आयोजक आणि अभिनव कला क्रीडा मंडळाचे सर्वेसर्वा अंकुश मोरे यांनी केले आहे.

गेली दोन वर्षे करोनाच्या महाभयंकर संकटामुळे ही लीग वारंवार लांबणीवर पडत होती. मात्र यंदा नव्या जोशात आणि जोमात आयोजित केली जाणार आहे. या लीगचे भव्य आणि दिव्य आयोजन करता यावे. तसेच ही लीग उपनगरातील प्रो कबड्डी लीग म्हणून नावारूपाला यावी म्हणून प्रथमच ही लीग इनडोअर स्टेडियममध्ये खेळविली जाणार आहे. या लीगसाठी अभिनव कला क्रीडा मंडळ आणि स्पोर्टवोट हे डिजीटल माध्यम एकत्र आले आहे. या लीगच्या माध्यमातून उपनगरातील गुणवत्तेला संधी मिळावी, हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे स्पोर्टवोटचे सीईओ आणि संस्थापक सिद्धांत अगरवाल म्हणाले.

एकंदर सहा विविध गटात पार पडणाऱ्या या लीगमध्ये 42 संघ निवडले जाणार आहेत. त्यासाठी किमान 550 खेळाडूंची निवड केली जाणार असून सध्या खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी उपनगरातील खेळाडूंना http:it.ly/MMKL_Registrations या लिंकवर क्लिक करून आपली माहिती नोंदवता येईल.

या लीगमध्ये पुरूष गट, ज्यूनियर मुले, सबज्यूनियर मुले या तीन गटांचे प्रत्येकी दहा संघ खेळतील तर महिला गट, ज्यूनियर मुली आणि सबज्यूनियर मुली या तीन गटात प्रत्येकी चार-चार संघ खेळविले जाणार आहेत. या लीगच्या नोंदणीसाठी सर्व वयोगटातील खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असल्यामुळे आयोजकांनी यात जास्तीत जास्त खेळाडूंना आपले नाव नोंदविता यावे म्हणून 15 मेपर्यंत ऑनलाईन नोंदणी ठेवली आहे. नोंदणीनंतर 20 ते 25 मेदरम्यान या हजारो खेळाडूंची चाचणी घेतली जाईल आणि त्यातून संघबांधणीसाठी विविध गटांसाठी खेळाडूंची अंतिम निवड केली जाईल. नोंदणीला लाभत असलेला प्रतिसाद पाहून महामुंबई कबड्डी लीगचे पुनरागमन संस्मरणीय होणार, असा विश्वास आयोजक अंकुश मोरे यांनी बोलून दाखविला.

या लीगच्या अधिक माहितीसाठी 9819362690 / 9819362992 या मोबाईलवर संपर्क साधावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -