Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीलोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

लोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत: वीकेंडमध्ये ही गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवताना दिसू लागला आहे. त्यामुळे ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सायंकाळी पाचनंतर येथे पर्यटकांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटकांची हजेरी आणि खास पसंती ही विशेषत: लोणावळ्याला दिलेली दिसून येते आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद घेता आलेला नाही. पर्यटकांच्या भेटीमुळे ही संख्या वीकेंडला तर लाखोंच्या घरात देखील जाताना दिसून येते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते.

वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -