Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकोकण टेक्नॉलॉजी सेंटर...!

कोकण टेक्नॉलॉजी सेंटर…!

भारत सरकारने देशात २० ठिकाणी टेक्नॉलॉजी सेंटर उभं करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यातल एक सेंटर कोकणमध्ये होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे सेंटर उभं राहाणार आहे. कोकणातील या सेंटरसाठी केंद्रसरकारने २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सूक्ष्म, लघू, मध्यम विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे सेंटर कोकणामध्ये उभारले जावे, यासाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत. कोकणच्या विकासाच्या दृष्टीने टेक्नॉलॉजी सेंटर ही फार महत्त्वाची बाब आहे. कोकणामध्ये उद्योगविश्वात नव्याने प्रवेश करणाऱ्यांसाठी यातून मार्गदर्शन होणार आहे. कोकणात कोणताही उद्योग यायचा झाला की, पहिला त्या प्रकल्पाला विरोध होतो. हा विरोध का? कशासाठी केला जातोय, हे बऱ्याच वेळा कोकणातील विरोध करणाऱ्यांपैकी अनेकांना माहिती नसते. शेजारचा कुणी किंवा एखादा पुढारी विरोध करतोय म्हणून त्यांचा विरोध कशासाठी हे कुणालाच नीटपणाने सांगता येत नाही. कोकणात याच विरोधामुळे एकही उद्योग उभा राहू शकला नाही. उद्योग उभे राहू शकले नाहीत, याला जितके राज्यकर्ते जबाबदार आहेत, तितकीच इथली जनताही जबाबदार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

कोणीही विरोधाची भाषण ठोकत असतील किंवा काही चुकीची माहिती देत असतील, तर त्याची पडताळणी करणे किंवा त्याची दुसरी बाजू समजून घेण्याची आपली जबाबदारी राहते. ते कधीच घडले नाही. यामुळेच प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना बळ मिळत गेलं. ज्यांनी-ज्यांनी आजवर प्रकल्पांना विरोध केला त्यातल्या कोणीही कधीही कोकणातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केला नाही की, प्रकल्प आणले नाहीत, हे देखील एक वास्तव आहे. विरोध करण्यासाठी फार काही करावं लागत नाही. असत्यावर आधारित वाट्टेल त्या अफवा पसरवायच्या आणि त्या अफवांची चर्चा करून समाजमनामध्ये खोटं बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे यातले सत्य-तथ्य, कोणाचा काय स्वार्थ आहे, हे तपासण्याचा कोणीही कधीही प्रयत्न करीत नाहीत. हेच आजवर घडत आलंय. काहींना याच पुढारपणातून आपली ‘लीडरशिप’ डेव्हलप करायची असते. यामुळेच संघर्ष समित्या उभ्या राहतात. यातला संघर्ष लोकांसाठी किती आणि स्वार्थासाठी किती? असा सारा प्रश्नच असतो.

कोकणात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. आणखी किती वर्षे हा ‘संघर्ष’ करत बसणार? तरुणांचं भविष्यच आपण यातून बिघडवण्याचे काम करतोय. कोकणात कोणी उद्योग आणायला किंवा उद्योजक यायलाही फारसा उत्सुक नसतो. याच कारण त्यांना माहिती झालेलं आहे. कोकणात काही उभं करायचं झालं, तर पहिले संघर्षवाल्यांना सामोरे जावे लागणार आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात किती अफवा पसरविल्या आणि या अफवांची चर्चा करण्यात आली, त्याला काही हिशोबच नाही आणि किती खालच्या पातळीवर चर्चा करण्यात आली? कोणत्याही प्रकल्पाला जेव्हा विरोध होतो तेव्हा नुकसान हे सर्वसामान्य माणसांचेच होत असते. आज कोकणात विविध विभागांत इंजिनीअरिंग पूर्ण केलेले बेरोजगार तरुण-तरुणी आहेत. मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल विभागात पदवी घेतलेले तरुण-तरुणी नाईलाजाने दुसरीकडे नोकरी शोधताना दिसतात. याच तरुणाईकडून ऐकायला मिळतं. जैतापूर प्रकल्प केव्हा होणार? रिफायनरी प्रकल्प व्हायला हवा. सी-वर्ल्डने रोजगाराच्या संधी मिळतील, असं जेव्हा तरुण विचारतात किंवा सांगतात, तेव्हा त्यांना रोजगाराची किती आवश्यकता आहे, हे कळून येते. आज कोकणाबाहेर असणारे तरुण मुंबई, पुणे, नाशिकच्या शहरी वातावरणाला कंटाळले आहेत.

अशांनाही कोकणात उद्योग व्यवसायात संधी शोधत आहेत. यामुळेच कोकणातील विरोधाचे वातावरण बदलल पाहिजे. सकारात्मकतेने विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजवर सुदैवाने कोकणाला कधी कुठल्याच गोष्टींची फार झळ पोहोचली नाही. त्यामुळेच सुखांगी आयुष्य जगणाऱ्यांना दुष्काळ काय असतो, वणवण कशी असते, यातल्या अनेक गोष्टी कधीच समजल्या नाहीत. त्यामुळे त्यासाठीचा जीवनसंघर्ष कसा असतो, तो सोसण्याची मानसिकता असावी लागते. तीच आपल्यात नाही. निसर्गाने आपणाला भरभरून दिलंय. आपणाला अनेक गोष्टी निसर्गानेच दिल्या आहेत. आपण त्यासाठी फार काही केलंय किंवा करतोय, असेही नाही. हे सर्व विस्ताराने सांगण्याचं कारण एकच आहे, कोकणात जे टेक्नॉलॉजी सेंटर उभं राहणार आहे. त्याचा फायदा उठवण्याची आपली तयारी, मानसिकता असली पाहिजे, तर जे उभं राहणार आहे, त्याचा उपयोग आहे, असे म्हणता येईल. नाहीतर ‘देव देता आणि कर्म नेता’ अशी एक मालवणी म्हण आहे. आजवर त्याचाच प्रत्यय येत राहिला. यापुढे तरी हे सर्व थांबलं जावं.

-संतोष वायंगणकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -