Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाकोहलीची एकाकी लढत

कोहलीची एकाकी लढत

कर्णधाराच्या दमदार अर्धशतकानंतरही भारत ८ बाद २१०

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा भारताचा निर्णय फलदायी ठरला नाही. कर्णधार विराट कोहलीने (७९ धावा) दमदार अर्धशतकानंतही तिसऱ्या सत्रात पहिल्या डावात पाहुण्यांची अवस्था ८ बाद २११ धावा अशी झाली.

विराटने २८वे अर्धशतक झळकावले. त्याची कमबॅक खेळी संयमी ठरली. २०१ चेंडूंचा सामना करताना त्याने एक बाजू लावून धरली. कोहलीच्या महत्त्वपूर्ण खेळीत डझनभर चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. विराटने केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर चेतेश्वर पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी ६२ तसेच रिषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करताना भारताला दोनशेपार नेले. पुजाराने ४३ तसेच पंतने २७ धावांचे योगदान दिले. या त्रिकुटाने संयम दाखवला तरी सलामीवीर लोकेश राहुल (१२ धावा) आणि मयांक अगरवालने (१२ धावा) तसेच मधल्या फळीतील अजिंक्य रहाणेने (९ धावा) निराशा केली.

कोहलीच्या नावे विक्रम

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीने उपाहारापर्यंत नाबाद १५ धावांची खेळी केली. यासह त्याच्या दक्षिण आफ्रिकेत कसोटीत ६२६ धावा आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे सोडले. आता तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.

विराटने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत ७ कसोटी सामन्यांच्या १३ डावात ५२ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. त्याने या देशात १५३ धावांची सर्वात मोठी खेळी साकारली आहे. आज आपला ४९वा वाढदिवस साजरा करणाऱ्या राहुल द्रविडने २२ डावात एक शतक आणि २ अर्धशतकांसह ६२४ धावा केल्या. भारताचे फक्त तीन फलंदाज ६०० पेक्षा जास्त धावा करू शकले आहेत. विराटला २ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाज म्हणून कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १५ कसोटी सामन्यांच्या २८ डावात ४६ च्या सरासरीने ११६१ धावा केल्या आहेत. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही भारतीयाला १००० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. सचिनने ५ शतके आणि ३ अर्धशतकेही केली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -