Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : कीर्तिकरांनी दिला उद्धव गटाला झटका

अग्रलेख : कीर्तिकरांनी दिला उद्धव गटाला झटका

रोज भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेवर तुटून पडण्याचा आव आणणारे संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन दिल्याने बाहेर आले आहेत. आपण एकशे तीन दिवस तुरुंगात होतो म्हणून विधानसभेवर १०३ आमदार निवडून आणू, अशी फुशारकी ते मारीत आहेत. शिवसेनेला जे पंचावन्न वर्षांत जमले नाही, ते करून दाखविण्याची फुकाची गर्जना ते रोज करीत आहेत. आपण पक्षप्रमुखांशी किती जवळचे आहोत, याचे ते रोज प्रदर्शन करीत आहेत. राऊत यांना जामीन मिळताच उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, मिठाई वाटली. राऊतांनी युद्ध जिंकल्याच्या थाटात मुलाखती सुरू केल्या. पण दोनच दिवसांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातले आणि लोकाधिकार समितीचा आधारवड असलेले खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव गटाला रामराम ठोकला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात जाहीर प्रवेश केला. गजानन कीर्तिकर हे सार्वजनिक जीवनात गजाभाऊ म्हणून ओळखले जातात. दांडगा जनसंपर्क, निष्ठावान शिवसैनिक आणि संघटनेत नियोजन तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उद्धव यांच्या पक्षातून बाहेर पडलेले ते तेरावे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोकसभेवर अठरा खासदार निवडून आले होते. अर्थात शिवसेनेने २०१९ मध्ये भाजपबरोबर युती करून निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या बॅनरवर मोदींचे फोटो लावून मतदारांना आवाहन केले होते. गजाभाऊंचे कार्य जसे मोठे तसेच शिवसेनाप्रमुखांची पुण्याई व मोदींचा करिष्मा यामुळे ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. याच कारणांमुळे सेनेचे तेव्हा १८ खासदार लोकसभेत पोहोचले याचा पक्ष प्रमुखांना विसर पडलेला असावा. उद्धव यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेलेले चाळीस आमदार व आता गजाभाऊंसह तेरा खासदार ही देशातील मोठी राजकीय घटना आहे. या सर्वांच्या सीमोल्लंघनाने उद्धव यांचे मुख्यमंत्रीपद गेलेच, महाआघाडीचे सरकारही कोसळले व शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले गेले.

गजानन कीर्तिकर हे गेले साडेतीन महिने का थांबले, ते कशाची वाट बघत होते, या प्रश्नांचे उत्तर त्यांनीच दिले आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आल्याने पक्षाला ऊर्जा व शक्ती मिळेल अशा थाटात संजय राऊत यांची भाषणे व मुलाखत चालू आहेत. उद्धव सेनेत जल्लोष सुरू झाला, पण कीर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाने त्यावर पाणी पडले. कीर्तिकरांसारखा नेता ही शिवसेनेची संपत्ती होती, उद्धव ठाकरे यांनी आता ती गमावली आहे. कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर उद्धव गटात हडकंप माजला, कालपर्यंत इकडे असलेले कीर्तिकर अचानक तिकडे कसे गेले? पण गेल्या चार महिन्यांत आपण गजानन कीर्तिकर याच्यांशी कसे वागलो, त्यांना किती आदर-सन्मान दिला, त्यांच्याशी किती संपर्क ठेवला, याची उत्तरे उद्धव गटात कोणाकडे आहेत का? कीर्तिकरांना केलेल्या सूचनांवर आपण किती गांभीर्याने विचार केला हे कोणी सांगू शकेल का? आपण त्यांची उपेक्षा करायची व त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवायची, नेमके हेच कीर्तिकरांच्या बाबतीत घडले असावे. त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्याचे शिवसेना भवनमधून जाहीर केले गेले, हे सुद्धा हास्यास्पद आहे. ज्यांना पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाळता येत नाहीत, हे कसले नेतृत्व? तेरा खासदार व चाळीस आमदार यांच्याशी कोणताही संपर्क न ठेवल्यानेच त्यांनी पक्ष नेतृत्वावर अविश्वास दाखवला व जे संपर्क ठेवतात व जे मानसन्मान राखतात, त्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवला. ते चुकीचे वागले असे कसे म्हणता येईल? पक्ष सोडला म्हणून कीर्तिकरांना दोष देण्यापेक्षा आपण किती जबाबदार आहोत, हे मातोश्रीला सांगणार तरी कोण? कीर्तिकरांनी शिंदेंच्या तंबूत प्रवेश केल्यावर पक्षाने त्यांना आजवर काय काय दिले, त्याची यादी उद्धव यांचे निकटवर्तीय वाचून दाखवत आहेत. ते पाच वेळा आमदार होते, दोन वेळा खासदार, दोन वेळा सरकारमध्ये मंत्री होते, वगैरे वगैरे…. पण त्यांच्याकडे कर्तृत्व होते म्हणूनच पक्षाने त्यांना दिले ना.…

कीर्तिकरांनी पक्षासाठी आजवर काय काय केले, हे जुन्या शिवसैनिकांना चांगले ठाऊक आहे. पक्षासाठी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या, हे शिवसेनेत अनेक जणांना माहिती आहे. पण त्याची यादी कोण देणार? कीर्तिकर हे अन्य खासदारांप्रमाणे आज ना उद्या शिंदे गटात जाणार, अशी चर्चा गेले तीन महिने अधूनमधून होत होती, मग या काळात त्यांच्याशी पक्षाने सल्लामसलत किती वेळा केली?ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मुख्यमंत्रीपदासाठी हातमिळवणी केली, त्या क्षणाला शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली मिळाली. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि मराठी माणसाविषयी असलेली तळमळ याचा ठाकरे यांना काँग्रेसशी तडजोड करताना विसर पडला. नेमके हेच पक्षाच्या खासदार – आमदारांना खटकले. एकनाथ शिंदे, कीर्तिकर व अन्य खासदार – आमदारांनी उद्धव यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीची संगत सोडावी, असे अनेकदा सांगून बघितले. पण, उद्धव यांना भाजपपेक्षा काँग्रेस जवळची वाटते, हे स्पष्ट झाले. त्याचाच परिणाम एवढ्या मोठ्या संख्येने आमदार, खासदार यांनी उठाव केला. आता पक्षात थांबून काही उपयोग नाही, हे लक्षात आल्यानेच कीर्तिकर शिंदे गटात गेले. उद्धव यांच्या पक्षात रोज गळती चालूच आहे. कीर्तिकरांना लोक विसरतील म्हणणाऱ्यांना अजूनही लोकभावना समजत नाहीत, हेच पक्षाचे दुर्दैव आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -