Friday, April 19, 2024
Homeमहत्वाची बातमीKeshav Upadhyay : लोकशाही नव्हे, ही तर उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची...

Keshav Upadhyay : लोकशाही नव्हे, ही तर उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड!

मुंबई (वार्ताहर) : जनादेशाची पर्वा न करता सत्ता मिळविताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता सत्ता आणि पक्षदेखील हातातून निसटल्यावर लोकशाही वाचविण्याचा साक्षात्कार व्हावा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद आहे, अशी घणाघाती टीका प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, जे हिंसाचार माजवितात आणि ज्यांनी सातत्याने मानवी हक्कांची पायमल्ली करण्याचे उद्योग केले अशांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे लोकशाही वाचवायला निघाले आहेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याखेरीज स्वकर्तृत्वाच्या बळावर ज्यांना पक्ष वाढविता येत नाही असे उद्धव ठाकरे आता लोकशाही वाचविण्याचा बहाणा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मिळेल त्याला हाताशी धरून उरलासुरला पक्ष वाचविण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे, असे उपाध्ये म्हणाले.

हिंसाचार करून गरीबांना वेठीस धरणाऱ्या आणि देशात अस्थिरता माजविणाऱ्या नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्यांच्या साथीने उद्धव ठाकरे लोकशाही वाचविणार की लोकशाही संकटात टाकणार? असा सवालही उपाध्ये यांनी केला. वैचारिक विरोधावर विश्वास नसलेल्या व दहशत माजविण्याचाच इतिहास असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी युती केली. हिंदुत्वाची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या काँग्रेसपुढे गुडघे टेकले आणि सत्तेसाठी राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करून स्वाभिमान खुंटीला टांगला, ते ठाकरे लोकशाही संकटात असल्याचा कांगावा करतात हे हास्यास्पद असल्याचे उपाध्ये म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -