Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यबाह्य जगातील चुकीच्या प्रवृत्तींपासून स्वतःला ठेवा दूर

बाह्य जगातील चुकीच्या प्रवृत्तींपासून स्वतःला ठेवा दूर

आपण कितीही चांगले असलो, आपले विचार, आचार, ध्येय, उद्देश कितीही योग्य असला, आपल्याला कितीही चांगले करण्याची इच्छा असली, इतरांप्रति कितीही कळकळीची भावना आपल्याला असली, तरीही आपल्याला अनेकदा मानसिक, भावनिक त्रास होतो. आपण विचार करतो, मी इतके चांगले वागतोय, मी कोणाचं कधी वाईट केलेले नाही, माझ्यामुळे कोणाला कधी त्रास झाला नाही. मग मलाच लोक त्रास का देतात, मलाच अशी वागणूक का मिळते, मला कायम चुकीचे शब्द का ऐकून घ्यावे लागतात? मलाच लोक दोष का देतात? माझ्याबद्दल कायम वाईट का बोलले जाते, माझा अपमान का केला जातोय, मला चुकीची वागणूक का मिळते आणि माझा नेहमीच अपेक्षाभंग का होतोय? कोणीच माझ्या मनासारखे का वागत नाही? माझ्या मनाचा कोणीच विचार का करत नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला दररोज भेडसावत असतात.

यावरील साधे-सोपे उत्तर म्हणजेच आपण कसे आहोत याहीपेक्षा आपल्या आजूबाजूच्या जगात, समाजात, कुटुंबात, कार्यालयात, व्यवसायात जे जे आपल्याशी संबंधित आहेत ते सगळेच आपल्यासारखे नाहीत. आपल्या संबंधित अनेक जण विकृत मानसिकतेचे, नकारात्मक विचार शैलीचे, दुसऱ्याला मानसिक त्रास देऊन आनंद मानणारे, दुसऱ्याला खलनायक ठरवणारे, दुसऱ्याला बदनाम करणारे, दुसऱ्याची फजिती, दुःख, त्रास याची मजा घेणारे असतात. म्हणायला ती माणसे असतात. पण माणुसकीचा त्यांच्यात लवलेशपण नसतो.

आपल्या आयुष्यात आपल्याशी जोडली गेलेली सगळीच माणसे आपण निवडलेली नसतात. नात्यांमार्फत, कामानिमित्त, ओळखीतून, कुटुंबामार्फत, व्यवहारामार्फत, देवाण-घेवाणीतून, दैनंदिन जीवनात वाटचाल करताना आपल्याशी अनेक प्रकारची माणसे जोडली जातात. खूप कमी नाती अथवा व्यक्ती अशा असतात ज्या आपण स्वतःहून जवळ करतो पण त्या सुद्धा आधी जशा वाटल्या होत्या तशाच शेवटपर्यंत असतील असं नाही. माणसं सतत बदलत असतात, माणसांचे हेतू, मूड, वागणूक, स्वभाव, विचार, मतं सातत्याने बदलतात. कोणी परिस्थितीमुळे बदलतो, कोणी स्वतः ठरवून बदलतो, कोणी अनुभवावरून बदलतो, तर कोणी गरज संपली की बदलतो. आपण प्रत्येक वेळी प्रत्येकात झालेला बदल स्वीकारून त्यांच्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. आपण सगळ्यांच्या अपेक्षाही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे लोकांना आपण चुकीचे वाटतो, लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागत नसलो की आपल्याला वाईट ठरवले जाते. आपल्याला बदनाम केले जात, आपण त्यांच्यासाठी जे केले ते सोयीस्करपणे विसरलं जातं आणि जे आपण करू शकलो नाही ते आवर्जून लक्षात ठेवलं जातं. लोकांना आपला फायदा व्हायचा बंद झाला की आपण त्यांना शत्रू वाटू लागतो. लोकांना आपल्यामार्फत जे हेतू साध्य करून घ्यायचे असतात ते झाले नाहीत तर लोक आपल्याला चुकीचे ठरवायला लागतात.

आपण आपल्याशी संबंधित प्रत्येकाला कधीच खूश ठेऊ शकत नाही. स्वतःचे सर्वस्व विसरून जरी तसे करायचे ठरवले तरीही ते अशक्य आहे. माणसाच्या अपेक्षेचा कुठेच अंत नसतो, समाधानाची कोणतीच अंतिम रेषा नसते. त्यामुळे आपण कितीही झोकून देऊन कोणासाठी काहीही केलं तरी त्याच्या लेखी त्याची किंमत शून्य असू शकते. आपल्यासाठी आपण जे केले, जे करतोय ते महत्त्वाचे असू शकते. पण इतरांना त्याची किंमत नसते; त्यांना त्या गोष्टीचे महत्त्वच नसते, त्यांना भलतंच अपेक्षित असते.

मुळात हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आपण जे वागतोय, जे करतोय, जे सांगतोय ते आपल्या दृष्टीने कितीही खरं, कितीही बरोबर आणि योग्य असलं तरी ते इतरांच्या दृष्टिकोनातून तितकंच महत्त्वाचं आहे का? आपल्यासाठी खूप प्राधान्य असलेली गोष्ट इतरांच्या खिजगणतीत पण नसू शकते. आपली अपेक्षा, आपली स्वप्न इतरांसाठी तुच्छ असू शकतात. त्यामुळे आपल्याला विरोध होत असेल, तर त्यात फार काही वाईट वाटण्यासारखं नाही. अनेकदा आपण जीव तोडून सांगत असलेली गोष्ट लोकांना पटत नाही, ती स्वीकारली जात नाही, कारण लोकांना सत्य आणि खरं पचत नसतं, लोकांना खरं ऐकायचं नसतं, खोट्या माहितीवर, खोट्या समजुतीवर, स्वतःच्या मनाची समजूत काढून जगणारे अनेक जण या जगात आहेत.

आपल्या बोलण्याला किंमत नाही, कदर नाही, आपला सल्ला कोणी ऐकत नाही, आपलं सांगणं कोणी मनावर घेत नाही, आपल्या भावनांना कोणी जुमानत नाही, याचा अर्थ त्या व्यक्ती आपल्या जवळच्या नाहीत, मुळात त्या आपल्या नाहीतच. त्यामुळे अशा ठिकाणी डोकं लावून, स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. या गोष्टीचं आकलन आपल्याला जितक्या लवकर होईल तितके लवकर आपण सुखी होऊ.

जे आपल्या मताशी सहमत नाहीत, ज्यांना आपले विचार पटत नाहीत, त्यांना एकदा, दोनदा, दहा वेळा सांगण्याच्या प्रयत्न करून पाहिल्यावर विषय सोडून देणं उचित असतं. सतत त्याच त्याच मुद्द्यावर जर आपण कोणाशीपण डोकं लावत राहिलो तर आपणच आपली किंमत कमी करून घेत आहोत हे लक्षात ठेवणे उचित आहे. जो आपल्याला मानतो, ज्याला आपला आदर आहे, ज्याला आपली गरज आहे तो कोणतीही शंका न घेता, काहीही प्रतिउत्तर न देता आपल्या म्हणण्याला दुजोरा देऊन मोकळा होतो. ज्याला आपलं ऐकायचं नाही त्याच्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी आपण अपयशी होतो. त्यामुळे कोणावर जबरदस्तीने आपली मतं, आपले विचार लादू नका आणि स्वतःवरही लादून घेऊ नका.

आपल्याला स्वतःचा त्रास, स्वतःपासून त्रास फार व आपली उमेद, ध्येय, जिद्द, आपली स्वप्नं, याचा विचार कोणीतरी करावा,आपली दखल घ्यावी, आपली प्रशंसा करावी, आपल्याला मोठेपणा द्यावा, मान द्यावा या फाजील अपेक्षाच आपले नुकसान करत असतात. त्यामुळे बाह्य जगापासून वेगळं असं आपलं अंतर्मन आणि आपली आंतरिक शक्ती कायम क्रियाशील राहणे गरजेचे आहे. स्वतःवर असलेला विश्वास सदैव दृढ राहणे, बाह्य घटकांमुळे, गोष्टीमुळे न डगमगण्याचे धैर्य आपल्यात असणे गरजेचे आहे. कोणीही कितीही कसेही चुकीचे प्रयत्न केले, आपल्याला काहीही बोलले, काहीही केलं, कसेही वागले, फक्त आपल्या अंतर्रमनाशी प्रामाणिक असलो तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही. आपण जे करतोय, वागतोय, जे बोलतोय ते जर सत्याला धरून असेल तर त्यासाठी इतरांच्या शाबासकीची वाट पाहण्याची गरज नाही. सगळ्यात मोठा सल्लागार आपले मन आहे. आपल्याला हसवणारे, रडवणारे, दुसरे कोणी नसून आपले मन आहे. त्यामुळे या मनात बाह्य घटकांना किती जागा द्यायची, किती गोष्टी मनात साठवून ठेवयाच्या; हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. इतरांमुळे आपल्या मनाला सतत चिंताग्रस्त, दुःखी, कष्टी ठेऊन कुढत जगण्यापेक्षा आपले अंतर्मन जागृत ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला आपले मन कधीच फसवू शकत नाही, त्यामुळे आपल्या मनाशी प्रामाणिक राहून आयुष्याला सामोरे जाणे म्हणजेच आयुष्य जगणे होय.

-मीनाक्षी जगदाळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -