Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाजॉनी बेअर्स्टोचे नाबाद शतक

जॉनी बेअर्स्टोचे नाबाद शतक

सिडनी : मधल्या फळीतील जॉनी बेअर्स्टोच्या (खेळत आहे १०३) नाबाद शतकाच्या जोरावर अॅशेस क्रिकेट मालिकेतील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी इंग्लंडने ७० षटकांत ७ बाद २५८ धावांची मजल मारली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाहता पाहुणे पहिल्या डावात अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर आहेत.

दुसऱ्या दिवशी मैदान ओले असल्याने उशिराने खेळ सुरू झाला. त्यामुळे दिवसभरात ७० षटके टाकली गेली. त्यात बिनबाद १३ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने ७ विकेटच्या बदल्यात आणखी २५५ धावांची भर घातली. त्याचे क्रेडिट बेअर्स्टोसह बेन स्टोक्सला जाते. या जोडीने इंग्लंडला सावरले. तिसऱ्या दिवशी इंग्लंडला सुरुवातीला मोठे धक्के बसले. हसीब हमीद (६) आणि जॅक क्रावली (१८) या इंग्लंडच्या सलामीवीरांपाठोपाठ कर्णधार जो रूट शून्यावर माघारी परतला. तसेच डॅविन मलानही ३ धावा करू शकला.

आघाडी फळी कोसळल्यानंतर (४ बाद ३६ धावा) बेन स्टोक्स आणि जॉनी बेअर्स्टोने पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करताना इंग्लंडला सुस्थितीत आणले. खेळपट्टीवर स्थिर झाला असे वाटतानाच स्टोक्सला ऑफस्पिनर नॅथन लियॉनने पायचीत केले. स्टोक्सने ९१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्याच्या जोस बटलरही लगेचच बाद झाला. बटलरला भोपळाही फोडता आला नाही.

बेअर्स्टोला मार्क वुडचांगली साथ दिली. त्यांनी सातव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत इंग्लंडला दोनशेपार नेले. वुडला ३९ धावांवर बाद करत पॅट कमिन्सने जोडी फोडली. तिसऱ्या दिवसातील शेवटच्या षटकात बेअर्स्टोने चौकार लगावत शतक पूर्ण केले. त्याचे हे सातवे कसोटी शतक आहे. बेअर्स्टो हा १०३ धावांवर खेळत आहे. १४० चेंडू खेळताना त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत.

बेअर्स्टोचे अॅशेसमधील दुसरे शतक आहे. त्याच्या शतकाने इंग्लंडला पहिल्या डावात पुनरागमन करता आले. जॅक लीच ४ धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसअखेरील ७ बाद २५८ धावांनंतरही पाहुणे पहिल्या डावात अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंडने प्रत्येकी २ तसेच मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला आहे. उस्मान ख्वाजाने १३७ धावांची शतकी खेळी केली. स्टीव्ह स्मिथने ६७ धावा केल्यात. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या.

स्टम्पला चेंडू लागूनही स्टोक्स नाबाद; तेंडुलकर म्हणतो, नवा नियम बनवा

तिसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीनने टाकलेला एक चेंडू ऑफस्टंपवर आदळल्यानंतरही स्टोक्सला नाबाद ठरवण्यात आले. ग्रीनचा चेंडू ऑफ-स्टंपला लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. शेन वॉर्न त्यावेळी कॉमेंट्री करत होता. तो म्हणाला की, त्याला बाद म्हणून घोषित केले होते का? हे किती आश्चर्यकारक आहे? ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही यावर विश्वास बसला नाही, म्हणून त्यांनी चक्क स्टंप्स हलवून पाहिले.

सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर या घटनेची खिल्ली उडवली आहे. ‘चेंडू स्टंप्सवर आदळल्यानंतर आणि बेल्स पडल्या नाहीत, तर नवा नियम आणायला पाहिजे का ‘हिटिंग द स्टंप’? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? यावेळी सचिनने शेन वॉर्नलाही टॅग केले आहे.
दुसरीकडे, जेव्हा तुमचा तुमच्या ऑफ-स्टंपवर विश्वास असतो आणि ऑफ-स्टंपचा तुमच्यावर विश्वास असतो, असे दिनेश कार्तिकने एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -