Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअर्भकांचे मृत्यू, महापालिकेची बेपर्वाई

अर्भकांचे मृत्यू, महापालिकेची बेपर्वाई

ठाकरे सरकारला राज्याचे आरोग्य मंत्रालय नीट संभाळता येत नाही आणि गेली तीस वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेवर असूनही महापालिकेची इस्पितळे आणि तेथील आरोग्य व्यवस्था चांगली राखता येत नाही. केवळ दलाली, कंत्राटे आणि टक्केवारीत रस असल्यामुळे प्रशासकीय कारभार आणि सेवा-सुविधांकडे महापालिकेला व ठाकरे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठी व श्रीमंत महापालिका आहे. पस्तीस-चाळीस हजार कोटी रुपयांचे या महापालिकेचे बजेट आहे. म्हणूनच शिवसेनेचे मुंबई महापालिकेवर आटोकाट प्रेम आहे. हे प्रेम काही मुंबईकर जनतेच्या सेवेसाठी नव्हे, तर कंत्राटे व दलालीतून मिळणाऱ्या कमिशनपोटी आहे. मुंबईतील पूर्व उपनगरातील भांडुप येथील महापालिका प्रसूतिगृहात चार अर्भकांचा झालेला मृत्यू हे महापालिकेच्या बेपर्वाईचे ताजे उदाहरण आहे.

भांडुप येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात एका आठवड्यात चार अर्भकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य खात्याची लक्तरे मुंबईच्या वेशीवर टांगली गेली. या घटनेचे पडसाद राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नांची तड लावून धरली, तेव्हा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा करणे भाग पडले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे कार्यक्षम मंत्री ओळखले जातात. ठाणे जिल्ह्यातील ते कुशल संघटक आहेत. मग त्यांना निलंबनाची कारवाई करायला एवढा वेळ का लागला?

मुंबई महापालिकेच्या गैरकारभारासंबंधीचे निर्णय घेण्याचे त्यांनाही सरकारमध्ये स्वातंत्र्य नाही का? सावित्रीबाई फुले यांचे नाव भांडुप येथील प्रसूतिगृहाला आहे, निदान त्यांच्या नावाचे व त्यांच्या कार्याचे भान ठेऊन तरी आरोग्य खात्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने काम करायला हवे. पण कुणाचे नियंत्रण नसल्यासारखे हे खाते काम करीत आहे. कोणाच्या वक्तव्यामुळे कोणाचा अवमान झाला, याचेच महत्त्व सत्ताधारी पक्षाला वाटते आहे, ज्या चार अर्भकांचे जीव गेले त्याचे गांभीर्य सरकारला व प्रशासनाला असते, तर तत्काळ कारवाई झाली असती.

सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अतिदक्षता कक्षातील चार अर्भकांचा जंतुसंसर्गाने मृत्यू होतो, हे मुळातच गंभीर आहे. या कक्षामध्ये पंधरा अर्भके होती, पैकी सात अर्भके उपचारासाठी बाहेरच्या प्रसूतिगृहातून आली होती. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. नवजात अर्भकांवर अतिदक्षता विभागात जंतुसंसर्ग झाला या मागचे कारण काय, हे कोण सांगणार? अतिदक्षता विभागातील दुरवस्थेमुळेच अर्भकांचे मृत्यू झाले, असा आरोप मरण पावलेल्या अर्भकांच्या पालकांनी केला आहे. प्रसूतिगृहात अतिदक्षता विभाग याच वर्षी पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला. त्याच्या व्यवस्थापनाचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले. या खासगी कंपनीच्या कारभाराविषयी भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण त्याकडे कोणी गांभीर्याने बघितले नाही. म्हणूनच चार अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर भाजपच्या नगरसेविकांनी महापालिकेत धरणे धरून निषेध केला. या खासगी कंपनीचा रुग्णालय व्यवस्थापनाचा वैद्यकीय परवाना रद्द करावा व त्यांच्याकडून काम काढून घ्यावे, अशी मागणी केली आहे. संबंधित डाॅक्टर व खासगी संस्थेचे चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. पण तेवढी हिम्मत शिवसेना व सरकार दाखवेल का?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने आरोग्य समिती काय करते, आरोग्य समितीच्या अध्यक्षांची काय जबाबदारी आहे, यावरही आता उघड चर्चा सुरू झाली आहे. महापालिका रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आम्हाला विचारले होते काय, असा प्रश्न अध्यक्षांकडून विचारला जात असेल, तर त्यांच्याकडून काही अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. झालेल्या घटनेविषयी दिलगिरी व्यक्त करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे हे या समितीकडून अपेक्षित असताना उद्धटपणे पालकांना प्रश्न विचारणे, हा सत्तेचा माज असल्याचे लक्षण आहे. मृत अर्भकांच्या पालकांनी दोषींवर कारवाई करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. त्यांना सहानुभूती दाखविण्याऐवजी बालरोग तज्ज्ञ मिळत नाहीत, अशी उत्तरे देणे म्हणजे त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखे आहे.

अतिदक्षता विभागातील वातानुकूलित यंत्रणा बंद कशी पडली, त्याला जबाबदार कोण, नियमित दुरुस्ती-देखभाल होत नव्हती काय, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग येथील गरीब लोकांच्या सोयीसाठी महिलांच्या प्रसूतिसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने बारा वर्षांपूर्वी भांडुप येथे प्रसूतिगृह सुरू केले. महापालिकेची सेवा असूनही तेथे दाखल होणाऱ्या महिलांना व उपचारासाठी येणाऱ्यांना औषधे, प्रसूतिसाठी लागणारे साहित्य विकत आणायला सांगतात. ही वेळ का यावी? याची माहिती आरोग्य समितीच्या सदस्यांना आहे काय? कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन महिन्यांपूर्वीच याच ठिकाणी आगीची घटना घडली होती, पण त्याची माहिती तत्काळ तेथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली नव्हती.

भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाचा कारभार खासगी कंपनीकडे सोपवल्यापासून आपली काहीच जबाबदारी नाही, अशा थाटात महापालिकेचे आरोग्य खाते वागत असेल, तर ते चुकीचे आहे. महापालिकेला आपली जबाबदारी झटकता येणार नाही तसेच ज्या खासगी कंपनीकडे सेवा सोपवली आहे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्या सेवेचे वेळोवेळी निरीक्षण करणे हे महापालिकेचे कामच आहे. केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय कुरघोडी करता येईल. पण गोरगरिबांच्या आरोग्य सेवेशी खेळ होत असेल, तर निष्पाप लोक भरडले जातील. चार अर्भकांचा मृत्यू हा महापालिकेच्या बेपर्वाईमुळे झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -