Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाभारत विक्रम करण्याच्या तयारीत

भारत विक्रम करण्याच्या तयारीत

सलग सर्वाधिक ‘टी-२०’ सामने जिंकण्याचा निर्धार

मुंबई (प्रतिनिधी) : ‘आयपीएल’च्या धुमधडाक्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत विवध संघांबरोबर झालेले सलग १२ (एक डझन) ‘टी-२०’ सामने जिंकले आहेत. जर टीम इंडियाने आगामी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर भारतीय संघाचा हा सलग १३ वा विजय असेल आणि तसे झाल्यास भारत सलग सर्वाधिक ‘टी-२०’ सामने जिंकण्याचा विक्रम करेल.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सांगता झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना येत्या ९ जूनला खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुरूवारी दिल्लीला पोहचला असून, भारतीय क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू रविवारी ५ जूनला दिल्लीला रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी अनेक सिनिअर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. असे

असले तरी ‘भारतीय संघाला आम्ही हलक्यात घेणार नाही. भारताकडे केएल राहुल, ऋषभ पंत आणि अन्य सीनिअर खेळाडू आहेत. भारताने अनेक खेळाडूंना विश्रांती दिली असली तरी जे खेळाडू संघात आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत’, अशी प्रतिक्रिया द.आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा याने दिली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या १५व्या हंगामात वेगवान चेंडूने फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करणारा उमरान मलिक हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराह संघात नसताना त्याच्या जागी कर्णधार केएल राहुल ट्रंप कार्ड म्हणून उमरान मलिकला संधी देऊ शकतो. भारतीय संघ उमरानचा कसा वापर करायचा याचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला द. आफ्रिकेच्या संघाला मात्र याची काही चिंता दिसत नाही. भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत द.आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा म्हणाला, आमच्या फलंदाजांना उमरान सारख्या वेगवान चेंडूंना खेळेण्याची सवय आहे.

उमरान मलिकबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावुमा म्हणाला, आमच्याकडे जलद गोलंदाजांचा सामना करण्याचा अनुभव आहे. आम्ही जलद गोलंदाजांचा सामना करत मोठे झालो आहोत. मला वाटत नाही की, आमचा कोणत्याही फलंदाजाला १५० किमी पेक्षा अधिक वेगाच्या चेंडूचा सामना करण्यास आवडत नसेल. आमच्याकडील सर्व फलंदाज अशा गोलंदाजीचा सामना करू शकतील.

 

उमरान भारतीय संघासाठी एक नवा जलद गोलंदाजीतील पर्याय असू शकतो. आयपीएल भारतीय संघासाठी चांगले ठरले. कारण त्यांना गोलंदाजीत एक पर्याय मिळाला. उमरान एक चांगला गोलंदाज आहे आणि मला आशा आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आयपीएल सारखीच कामगिरी करेल.

 

भारतीय टी-२० संघ :

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.

दक्षिण आफ्रिकेचे पारडे नेहमीच जड

विशेष म्हणजे भारताविरुद्ध टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही कधीही टी-२० मालिका गमावलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्यांदाच पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन वेळा भारत दौऱ्यावर आला होता. मात्र, दोन्ही वेळी भारताच्या पदरात निराशा पडली. आता दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आहे. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच देशांतर्गत टी-२० मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दरम्यान, २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आला. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २-० च्या फरकाने मालिका जिंकली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१९ मध्ये भारतात आला होता. त्यावेळी ही मालिका एक-एक अशी बरोबरीने सुटली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -