Thursday, April 18, 2024
Homeक्रीडाफलंदाजीचा क्रम जुळवण्यास भारत सज्ज

फलंदाजीचा क्रम जुळवण्यास भारत सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना आज

अबुधाबी (वृत्तसंस्था): भारताचा संघ दुसऱ्या सराव सामन्यात बुधवारी (२० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाशी झुंजेल. या लढतीद्वारे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या सराव लढती जिंकल्या. भारताने इंग्लंडवर सात विकेटनी मात केली. माजी विजेत्यांकडून फलंदाजीत ईशान किशन, लोकेश राहुल आणि रिषभ पंत तसेच गोलंदाजीत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने छाप पाडली. मुख्य स्पर्धेत लोकेशसह उपकर्णधार रोहित शर्मा ओपनरच्या भूमिकेत असतील. तसेच कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरणार असल्याचे भारताच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध राहुलसह डावाची सुरुवात करताना यष्टिरक्षक, फलंदाज ईशानने मोठी खेळी उभारली. त्यामुळे त्याचे अंतिम संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. सूर्यकुमार यादवच्या आधी संधी मिळालेला नियोजित विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने बॅटिंगमध्ये चमक दाखवली.

इंग्लंडविरुद्ध न खेळलेला रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने फटकेबाजी केली तरी तो कम्फर्टेबल वाटला नाही. त्याच्याकडून गोलंदाजीही करवून घेतली गेली नाही. पहिल्या सराव लढतीत शमीनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तसेच ऑफस्पिनर आर. अश्विनने प्रभावी मारा केला तरी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि लेगस्पिनर राहुल चहरला प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजासह वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि वरुण चक्रवर्तीला संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियानेही सराव सामन्यांत न्यूझीलंडला तीन विकेटनी हरवून विजयी सुरुवात केली. जोश इंग्लिसने शेवटच्या षटकात दोन चौकार ठोकल्याने त्यांचा विजय सुकर झाला. मात्र, अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला खाते उघडता आले नाही. परंतु, आघाडी फळीत माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसह कर्णधार आरोन फिंच, मिचेल मार्श तसेच मधल्या फळीत अॅश्टन अॅगरने थोडा फार फलंदाजीचा सराव केला. गोलंदाजीत लेगस्पिनर अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसनने छाप पाडली. परंतु, मिचेल मार्श महागडा ठरला. भारताविरुद्ध कांगारू संघ व्यवस्थापन अन्य क्रिकेटपटूंना संधी देताना मुख्य फेरीत योग्य संघ निवडण्यादृष्टीने प्रयत्न करेल.

वेळ : दु. ३.३० वा.

इंग्लंडसह न्यूझीलंड चुका सुधारण्यास उत्सुक

सराव लढतींमध्ये बुधवारी होणाऱ्या आणखी एका सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने दोन्ही संघ चुका सुधारण्यास उत्सुक आहेत. सोमवारी इंग्लंडला भारताविरुद्ध तसेच ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पाहावा लागला. इंग्लंडची फलंदाजी बहरली तरी गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडची ढेपाळलेली बॅटिंग ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली. किवींच्या गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली तरी तुलनेत कमी आव्हानामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

पाकिस्तान-द. आफ्रिका आमनेसामने

वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी

सराव सामन्यांच्या सायंकाळच्या लढतींमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने चांगला सराव करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ७ विकेटनी हरवले. द. आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. दोन्ही लढतीत गोलंदाजांनी छाप पाडली. त्यामुळे बुधवारी पाकिस्तान आणि द. आफ्रिकेतील फलंदाजांच्या सरावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात अपेक्षित सराव न झाल्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज निराश झालेत. त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -