Thursday, April 25, 2024
HomeदेशIndia China Clash : चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळला

India China Clash : चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळला

असा झाला तवांगमधील संघर्ष!

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा डाव (India China Clash) भारतीय जवानांनी उधळून लावला.

चीनच्या घुसखोरीला रोखताना झालेल्या संघर्षात सहा भारतीय जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर गुवाहाटीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास ६०० चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. ९ डिसेंबर रोजी ही घटना घडली.

भारत आणि चीनदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा अद्याप निश्चित नाही. दोन्ही देशांदरम्यान ३००० किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे ६०० चिनी सैन्याने ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या दरम्यान, हाणामारीचा आवाज, गोंधळ ऐकू आल्यानंतर तातडीने ७० ते ८० जवानांना पाठवण्यात आले. भारत आणि चीनच्या सैन्यात काही तास हाणामारी सुरू होती. या संघर्षात एकही गोळी झाडली गेली नाही. मात्र, लाठी-काठी, दगडांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनने ज्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला, तो भाग समुद्रसपाटीपासून १४ ते १७ हजार फूट उंच आहे. चीनकडून याआधीदेखील घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र, भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला होता. त्यामुळे चिनी सैन्याने रात्रीची वेळ निवडली. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा मध्यरात्रीचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.

भारतीय सैन्यातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्य घुसखोरीसाठी सज्ज होते. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी या भागात बर्फवृष्टी झाली. त्याशिवाय, ढग दाटून आले होते. त्यामुळे भारतीय सॅटेलाइट्सला चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यास अडथळे येत होते. त्यानंतर भारतीय सैन्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जिओलोकेशन इक्पिमेंटचा वापर करून सॅटेलाइट इमेज घेतल्या आहेत.

याआधी १५ जून २०२० रोजी, गलवानमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताच्या २० जवानांनी प्राणाचे बलिदान दिले होते. यापूर्वी १९६७ मध्येही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. १९६७ मध्ये नाथुला येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे ८८ सैनिक हुतात्मा झाले होते. तर, चीनकडून ३०० हून अधिक सैनिक ठार झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -