Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यनिर्देशांकात बनला तेजीचा ‘हेड अँड शोल्डर’

निर्देशांकात बनला तेजीचा ‘हेड अँड शोल्डर’

शेअर बाजारात या आठवड्यात देखील तेजी पाहावयास मिळाली. आपण मागील लेखात निर्देशांक १८४०० ते १८५०० या पातळीपर्यंत जाऊ शकते, हे सांगितलेले होते. आपण सांगितलेला टप्पा निफ्टीने या आठवड्यात गाठलेला आहे. पुढील आठवड्याचा विचार करता १८१०० ही निफ्टीची अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत ही तेजी अशीच कायम राहील. निफ्टीची तेजी अशीच टिकून राहिली, तर निफ्टी १८६५० ते १८७०० या पातळीपर्यंत वाढ दाखवू शकते. निफ्टीमध्ये मध्यम मुदतीच्या आलेखानुसार तेजीचा हेड अँड शोल्डर यापूर्वीच तयार झालेला आहे. पुढील काळात निफ्टीने १८६०५ ही पातळी बंदभाव तत्त्वावर तोडली, तर निर्देशांक निफ्टीमध्ये जवळपास १२०० ते १५०० अंकांची आणखी वाढ होईल.

शेअर बाजारात या आठवड्यात देखील मर्यादित तेजी झाली. सध्या निर्देशांकात मध्यम मुदतीच्या चार्टसोबत अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकात तेजीचा “कप अँड हँडल” ही रचना तयार झालेली आहे. या रचनेनुसार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अल्पमुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र फंडामेंटल बाबींकडे पाहता निर्देशांक उच्चांकाला आलेले आहेत. त्यामुळे सावधानता आवश्यक आहे. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होत असते त्यावेळी निर्देशांकासोबतच घसरणारे शेअर्सचे भाव बघून आपल्याला भीती वाटायला लागते. आपण अशा घसरणीमध्ये घाबरून जाऊन आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे दीर्घमुदतीसाठी घेतलेले शेअर्स देखील मिळेल त्या किमतीला विकून टाकत असतो. त्यामुळे उत्तम आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शेअर्समध्ये देखील आपण नियोजन आणि अभ्यासाच्या अभावामुळे काही कारण नसताना नुकसान सहन करतो. दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते.

अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी. शेअर बाजारात बऱ्याच वेळा गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा उपयोग करताना दिसून येत नाही. परिणामी होत असलेल्या तोट्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. पुढील काळात स्टॉपलॉसचा वापर टाळणे ही मोठी चूक ठरू शकते. याला कारण ज्यावेळी फंडामेंटल बाबतीत निर्देशांक महाग झालेले असतात. त्यावेळी निर्देशांकात होणाऱ्या घसरणीच्या तुलनेत शेअर्समध्ये होणारी घसरण ही फार मोठी असते. त्यामुळे गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस अत्यंत आवश्यक आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करीत असताना टेक्निकल आणि फंडामेंटल अशा दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करणे आवश्यक असते. शेअर बाजारामध्ये निर्देशांकांची असणारी मुख्य दिशा आणि त्यानंतर त्या मुख्य दिशेच्या विपरीत असणारी दिशा अर्थात करेक्शन या दोन्ही गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करावी लागते. शेअर बाजाराची मुख्य दिशा तेजीची असेल, तर येणारे करेक्शन ही खरेदीची संधी असते. याउलट शेअर बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल, तर येणारे करेक्शन अर्थात बाऊन्स ही शेअर्स विक्रीची संधी असते. सध्या शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे, मात्र टेक्निकल आणि फंडामेंटल बाबतीत निर्देशांक हे उच्चांकाला असल्याने शेअर्स खरेदी करण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापुढे काही काळ कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस लावून केवळ अल्पमुदतीच्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल.

कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ६७०० या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी घसरण होऊ शकते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

शेअर बाजारात गेले काही महिने नीच्चांकापासून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली, तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे, म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही. शुक्रवारी निफ्टी १८५१२ अंकांना बंद झाली. सध्या निर्देशांक “नो ट्रेड झोन”मध्ये आलेले आहेत. आता जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची दिशा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत “होल्ड कॅश इन हँड” हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करावा.

-डॉ. सर्वेश सोमण

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -