Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपालघररासायनिक सांडपाण्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात

रासायनिक सांडपाण्यामुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात

किनाऱ्यालगत गावांतील पारंपरिक मासेमारी संकटात

बोईसर (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून खाडीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे खाडीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे खाडीतील माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाडीतील पाण्यात गाळ साचत असल्याचा परिणाम खाडीतील जैवविविधतेवर होत असून खाडी किनाऱ्याच्या तिवरांसाठी प्रदूषण हानिकारक ठरत आहे. त्यामुळे प्रदूषणविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणीची मागणी जोर धरत आहे.

कुंभवली, कोळवडे ७० बंगलामार्गे मुरबे, खारेकुरण, दापोली वाढत्या शहरीकरणाचा परिणाम खाडीवर होत आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखानदार छुप्या मार्गाने रासायनिक पाणी खाडीत सोडतात. हा प्रकार स्थानिक नागरिकांनी एमपीसीबीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकारी कंपनीवर तात्पुरत्या स्वरूपात बंदीची कारवाई करतात. पुन्हा येरे माझ्या मागल्याचा प्रकार सुरू राहतो. त्यामुळे खाडीकिनारच्या गावांतील नागरिकांचा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय संकटात आला आहे. कारखानदार प्रशासकीय अधिकारी आणि प्रदूषणाचा पुळका घेऊन मिरवणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये होणाऱ्या सौदेबाजीमुळे खाडी आणि खाडीवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत.

मासेमारी व्यवसाय संकटात आल्यानंतर शासनाकडून भरपाई मिळवून देण्यात तसेच पर्यायी रोजगार करून देण्यास येथील लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. खाडी दूषित झाल्यामुळे माशांची संख्या कमी झाली. त्यामुळे मासेमारीसाठी जीव धोक्यात घालून खोलवर जावे लागते. प्रदूषणामुळे खाडीतील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. प्रदूषणामुळे खाडीत दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांतील पारंपरिक मासेमारी हा व्यवसाय संकटात सापडला आहे.

खाडीलगतच्या गावातील शेकडो मच्छीमार महिला वाड्या, शिंपल्या, बोय, कोळंबी, कालवे आदी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. तसेच, मुरबे सातपाटी खाडीत मोठ्या मच्छीमार नौकांचे दळणवळण होत असते. मच्छीमार बोटीवरील खलाशांना पाण्यात उतरवून बोटीतून मासे बंदरात उतरवले जातात. प्रदूषित पाण्यामुळे खलाशांचे काम धोक्याचे झाले आहे.

खाडीतील मासे, पक्षी, खारफुटी आदी जैवविविधतेचे दर्शन घडावे यासाठी खाडी दूषित होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. स्वच्छ खाडी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जलचरांना मोकळा श्वास घेण्यासाठी निसर्गाचे नियम पाळण्याची गरज आहे. – सिध्दनाथ देव, मच्छीमार

रसायनमिश्रित पाण्यामुळे समुद्रातील मासे खाडीकिनारी येत नाहीत. तसेच, भरतीच्या पाण्याबरोबर आलेले मासे माघारी जात असल्याने पारंपरिक मासेमारी संकटात आली आहे. – राकेश तरे, उपसरपंच ग्रामपंचायत, मुरबे

मासेफेको आंदोलनाचा इशारा

खाडीतील प्रदूषित पाण्यामुळे मासेमारांना त्वचारोग जडत आहेत. याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाला तक्रार दिल्यानंतरही मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. रोजगारावर परिणाम होत असल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीच्या प्रदूषणास जबाबदार औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर मच्छीमार बांधवांच्या वतीने मासेफेको आंदोलन करण्याचा इशारा मुरबे गावचे सरपंच राकेश तरे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -