Wednesday, April 24, 2024

माणुसकी

  • प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
अचानक बस बर्फावरून घसरली. काही कळायच्या आत सगळ्यांनी टाहो फोडला. बस हमरस्त्यालगतच असलेल्या खोल खड्ड्यात आडवी पडली होती.

अजूनही माझे मन काश्मीरमध्येच भरकटत आहे. कारगील युद्धाच्या बरोबर तीन महिने आधी आमच्या सोसायटीमधील सत्तावीसजण वैष्णोदेवीचे दर्शन करून काश्मीरला गेलो होतो. थंडीचे दिवस होते. काश्मीरबद्दल फक्त ऐकून होतो. थोडेफार वाचलेलेही होते. कधीतरी टीव्ही मालिकांमधून वा सिनेमांमधून काश्मीर पाहिलाही होता, पण प्रत्यक्ष काश्मीरला ‘स्वर्ग’ का म्हटले जाते, याचा प्रत्यय आम्हाला प्रत्यक्ष जाण्यामुळेच आला. काश्मीरला जून-जुलै महिन्यात जायचे असते, असे बरेच जण म्हणाले होते. त्या काळात दूरदूरपर्यंत केशराचा सुगंध वातावरणात पसरलेला असतो आणि अनेक इंद्रधनू रंगातील फुलांची उधळण या महिन्यांमध्ये अनुभवायला मिळते! ते खरं असेलही; परंतु आम्ही भर हिवाळ्यात काश्मीरमध्ये होतो तेव्हा चारी बाजूंनी काश्मीर बर्फाच्या डोंगरांनी आच्छादलेला होता. ते सौंदर्यही वेगळे आणि मनभावन असेच होते. इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ पाहणे आणि प्रत्यक्ष त्याच्यासोबत खेळणे, हे मात्र आम्ही सर्वजण प्रथमच अनुभवात होतो.

दल सरोवरात मारलेला फेरफटका, तिथे काश्मिरी ड्रेस घालून फुलांची परडी हातात घेऊन काढलेला फोटो, तिकीट काढून हाऊसबोटमध्ये मारलेली फेरी आणि एका बोटीतून फिरताना बाजूला आलेल्या दुसऱ्या बोटीतून केलेले शॉपिंग, किती वेड्यासारखे काढलेले फोटो! अजूनही ते फोटो पाहतानाही ते आनंदक्षण साक्षात डोळ्यांसमोर उभे राहतात.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही जम्मू-काश्मीर टुरिझमच्या बसने ‘गुलमर्ग’ येथे पोहोचलो. तेथे चौदा-पंधरा फूट बर्फ जमलेला होता. रोपवेने एका हिमाच्छादित पर्वतावरून दुसऱ्या हिमाच्छादित पर्वतावर गेलो. स्लेश गाडीने दोन-तीन किलोमीटरची राऊंड मारली. हे सगळं करताना आमच्या अंगावर भाड्याने घेतलेला ऊबदार अंगरखा होता. प्रचंड थंडीमुळे आम्ही तेथून लवकरच पळ काढला आणि बसमध्ये येऊन बसलो. भाड्याने घेतलेले ऊबदार कपडेही परत केले असल्यामुळे थंडीने प्रचंड गारठलो होतो. कधी एकदा श्रीनगरला पोहोचतो आणि हीटरसमोर बसतो असे होऊन गेले होते. अचानक बस बर्फावरून घसरली. काही कळायच्या आत सगळ्यांनी टाहो फोडला. बस हमरस्त्यालगतच असलेल्या खोल खड्ड्यात आडवी पडली होती. त्या खड्ड्यात प्रचंड साठलेल्या बर्फामुळे बसचे दोन्ही आरसे त्याच्यात व्यवस्थित अडकले होते. ते जर अडकले नसते, तर त्याच्या बाजूच्या मोठ्या दरीत आम्ही कोसळलो असतो! प्रसंग बाका होता. बस एका बाजूला कलंडल्यामुळे एकमेव दार बंद झाले होते.

सामान, माणसे एकमेकांवर आदळली होती. आजूबाजूच्या झोपड्यासम घरात राहणारे चार-पाच मुसलमान बांधव धावत आले. कोणीतरी बसची खिडकीकडील काच उघडली. बसच्या बाजूला शिडी आणली आणि त्या खिडकीतून खेचून एकेकाला खाली उतरवले. थोड्या वेळातच आर्मिवाले, त्यांचे डॉक्टर, पोलीस आले. कोणालाही खरचटणे आणि मुका मार यापेक्षा फारसे जास्त लागले नव्हते; परंतु सगळे घाबरून रडत होते. त्या मुसलमान बांधवांनी आम्हाला त्यांच्या घरी नेले. थंडीने आमची परिस्थिती बिकट झाली होती. त्यांनी कांगडी (गळ्यातील शेगड्या) दिल्या. काहवा (काश्मिरी चहा) दिला. तोपर्यंत त्यांच्यातल्याच काहींनी आमचे विखुरलेले सामान पर्स, शाली, कॅमेरे बसमध्ये उतरून आम्हाला आणून दिले. कोणाचे काहीही हरवले नव्हते ही गोष्ट मला खास अधोरेखित करायला आवडेल! तोपर्यंत आर्मिवाल्यांनी पर्यायी बसची व्यवस्था केली. त्या काळात काश्मीरमध्ये टुरिस्ट (प्रवासी) खूपच कमी झाल्यामुळे त्या लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली होती. निघताना आम्ही त्यांना काही पैसे देऊ केले – ‘ये बच्चो के लिए!’ असे म्हणत पण त्यांनी ते घेतले नाही. नम्रपणाने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले, ‘अल्ला की दुवाँसे ये मौका मिला है… सेवा का मोल नही किया जाता!’

त्या क्षणी त्यांनी केलेल्या मदतीला मोल नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेली मदत अतिशय नि:स्पृह भावनेने ती केली होती. आताही कुठेही प्रवास करताना जेव्हा गाडी वळणावरून पुढे जाते तेव्हा तो काश्मीरमधला प्रसंग, ती माणसे, त्यांचे प्रसंगवधान आणि त्यांच्यातील माणुसकी आठवते आणि मन काश्मीरपर्यंत क्षणात पोहोचते! यातून प्रत्येकाने खूप काही बोध घेण्यासारखा आहे, असे मला वाटते!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -