Narayan Rane: नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election) मतदानाला (vote) उद्यापासून सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून अनेक दिवस चर्चा सुरु होती. आता त्या चर्चेचे निवारण झाले आहे. भाजपाकडून नारायण राणे (Narayan Rane) यांचे एकमेव नाव चर्चेत होतं. तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर अखेर भाजपाने झेंडा रोवत नारायण राणे यांना मैदानात उतरवलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजपाकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपाकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. त्यामुळे महायुतीकडून नारायण राणे हे उमेदवार असणार आहेत. तर नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.

महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी त्या जागेसाठी इच्छुक असणारे किरण सामंत यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी उदय सामंत यांनी उमेदवारीवरून असलेला तिढा सुटल्याचं सांगत राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणत भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे उमेदवार असले तरी किरण सामंत त्यांचं काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उदय सामंतांनी दिली आहे. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील,असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाची माघार

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून निवडणूक लढवायची होती, असा शिवसेनेचा दावा मागे घेण्यात आला. आता या जागेतील भाजपाचे उमेदवार नारायण राणे असल्यामुळे शिंदे गटातील किरण सामंत यांनी माघार घेतली आहे.

सामंत बंधूंनी सामंजस्याची भूमिका दाखवली

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी जवळपास नारायण राणेंचे नाव निश्चित होते. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत देखील या जागेसाठी इच्छुक होते. रत्नागिरीत सध्या उदय सामंत आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ताकत आहे. उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत सामंत बंधूंनी सामंजस्याची भूमिका दाखवली आहे. सध्या महायुतीमध्ये नितेश राणे हे कणकवलीचे आमदार आहेत, तर सावंतवाडीचे दिपक केसरकर आमदार आहेत. उद्या नारायण राणे हे अर्ज दाखल करणार आहेत.

viral video: कर्ज मिळण्यासाठी महिलेने केले ‘हे’ थरारक कृत्य!

नेटकरी व्हिडिओ पाहून थक्क; व्यक्त केला संताप

ब्राझीलीया : बँकेतून कर्ज घेण्याची गरज प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी भासते. तर काहीजण त्यातून पळवाट काढण्याचा मार्ग शोधतात. असाच एक प्रकार ब्राझीलमध्ये उघडकीस आला आहे. ब्राझीलमधील रिओ डी जानेरिओ येथील एका महिलेने कर्ज मिळवण्यासाठी चक्क मृत व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून बँकेमध्ये आणलं होत. इतकंच नव्हे तर त्याच्याकडून आपल्या नावे कर्ज मिळवण्याचा प्रयत्नही तिने केला. महिला ही मृत व्यक्तीची पुतणी असल्याचं समजलं.

बँकेत मृतदेह आणल्यानंतर महिला त्याच्याशी गप्पा मारत होती. मृतदेहाचं डोकं वारंवार खाली पडत असल्याने ती ते पकडून उभी राहिली होती. तसंच ‘काका तुम्ही ऐकताय का? तुम्हाला यावर स्वाक्षरी करायची आहे. मी तुमच्यासाठी सही करु शकत नाही,’ असं मृतदेहाला सांगत होती. बँक कर्मचाऱ्यांना या गोष्टीची शंका आल्याने त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. तसेच नंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला.

दरम्यान, डॉक्टरांनी व्हिलचेअरवर बसलेल्या व्यक्तीची तपासणी केली. त्याचा काही तासांपूर्वी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मिळालेल्या महितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव पॉल रॉबर्टो ब्रागा (वय ६८) आहे. महिलेचे नाव इरिका डीसुझा असल्याचं कळतंय. ती मृत व्यक्तीची पुतणी असून केअरटेकर म्हणून ती काम करायची. तपासानंतर महिलेला घटनास्थळावरुन अटक करण्यात आली आहे. आपण त्याचे नातेवाईक असल्याचा महिलेचा दावा आहे. अधिकारी बँकेच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. हा एखादा मोठा घोटाळा आहे का याचाही तपास करत आहेत.

महिलेला तिच्या काकाच्या बँक खात्यातून कर्ज मंजूर करुन घ्यायचे होते. मृत व्यक्ती हा पेंशनर होता. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी महिला धडपडत होती. बँक कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तीबाबत विचारणा केली, पण महिलेने उडवाउडवीचे उत्तरं दिली. माझं डोकं खाऊ नको, गप स्वाक्षरी कर असं ती मृत व्यक्तीला म्हणत होती. या कारणांनी बँक कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी सदर प्रकाराचा व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी महिलेच्या निर्दयीपणावर टीका केली आहे.

रे रोड येथील भीषण आगीत गोदाम जळून खाक

मुंबई : दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरातील दारुखाना येथील गोदामाला गुरूवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्तीच्या प्रयत्नांवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रे रोड परिसरातील दारुखाना, ब्रिटानिया कंपनी शेजारी असलेल्या देवीदयाळ कंपाऊंड येथे तळमजला आणि एकमजली गोदाम होते. या गोदामाला अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग छोटी होती. पण काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण दारुखाना परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यानंतर या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

या आगीची माहिती मिळताच आग भीषण स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलासोबत स्थानिक पोलीस, महापालिका वार्ड स्तरावरील यंत्रणा, बेस्ट उपक्रम आदी यंत्रणा आणि रुग्णवाहिका यांची व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी व जवान हे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे समजते.

या गोदामाला नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलासोबत स्थानिक पोलीस या आगीचा तपास करत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात गोदामाचे नुकसान झाले आहे.

Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, यात दररोज मिळणार २.५GB डेटा

मुंबई: Jioच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचा पर्याय मिळतो. कंपनी डेली डेटासाठीचे विविध प्लान्स ऑफर करत असते. यात तुम्हाला इतरही फायदे मिळतात.

डेली डेटावाले प्लान्स

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दररोज २.५ जीबी डेटाचे अनेक प्लान्स आहेत. या आर्टिकलमध्ये आम्ही कंपनीच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल बोलत आहोत.

२.५ जीबी डेटा देणारा जिओचा सगळ्यात स्वस्त प्लान ३४९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये कंपनी ३० दिवसांची व्हॅलिडिटी देते.

जिओच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा वापरासाठी दिला जातो. तसेच यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा असते. तसेच दररोज १०० एसएमएस दिले जातात.

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ७५ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेसही देते.

या रिचार्ज प्लानसोबत कंपनी अनलिमिटेड ५ जी डेटा ऑफर करत आहे. मात्र यासोबत जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळत नाही.

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये दोन आणखी प्लान्स आहेत जे दररोज २.५ जीबी डेटा ऑफर करतात. यातील एक प्लान २,९९९ रूपयांचा आहे आणि दुसऱा ३६६२ रूपयांचा आहे.

हे दोन्ही प्लान्स ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी दिवसाला २.५ जीबी डेटा , अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसह अनेक फायदे मिळतात.

काय आहे दोन्ही प्लान्समध्ये अंतर

३६६३ रूपयांच्या प्लानमध्ये कंपनी सोनी लिव आणि झी५चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये देते.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या रागी सूप, आरोग्यदायीही आणि स्वादिष्टही…

मुंबई: वजन कमी(weight loss) कऱण्यासाठी आपण विविध प्रकारचे डाएट फॉलो करत असतो मात्र या डाएटिंगमुळे बऱ्याचदा थकवाही जाणवतो. अशातच जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत आहात तसेच तुम्हाला स्वत:ला निरोगी ठेवायचे आहे तर ही शानदार रेसिपी तुमच्यासाठी आहे. जे पिऊन तुम्ही स्वत:ला हेल्दी ठेवाल आणि वजन कमी करण्यात मदत होईल. या पदार्थाचे नाव आहे रागी सूप.

रागी सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप नाचणीचे पीठ
१ कांदा बारीक चिरलेला
अर्धा कप गाजर बारीक चिरलेला
अर्धा कप पालक बारीक चिरलेला
अर्धा कप बीन्स बारीक चिरलेला
अर्धा कप मटार
अर्धा कप किसलेला कोबी
अर्धा कप स्वीटकॉर्न
एक इंच आले किसलेले
२ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला
४ कप पाणी
२ मोठे चमचे लिंबाचा रस
तेल अथवा तूप
मीठ चवीनुसार
काळी मिरी पावडर
कोथिंबीर बारीक चिरलेली

कसे बनवाल?t l

एक मोठे भांडे घ्या. त्यात थोडेसे तूप अथवा तेल टाका. यात किसलेले आले आणि कापलेली लसूण टाका. लसणीचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत ढवळा. या पॅनमध्ये आता कापलेल्या भाज्या- कांदा, मटार, गाजर, पालक, बीन्स, कोबी आणि स्वीट कॉर्न टाका. ५ मिनिटे ढवळत राहा. तसेच खूप शिजूही देऊ नका.

भाज्या थोड्याफार शिजल्यानंतर त्यात ४ कप पाणी टाका. सर्व मिश्रण नीट ढवळा आणि यात मीठ आणि काळी मिरी टाका.

दुसऱ्या वाटीत नाचणीचे पीठ घ्या. त्यात पाणी मिसळा. नाचणीच्या पिठाचा घोळ बनवा. मात्र घोळ खूप पातळ अथवा खूप जाड करू नका.

नाचणीचा घोळ त्या मिश्रणात घालण्याआधी ते मिश्रण चांगले उकळून घ्या. चांगले मिक्स करा. नाचणी शिजेपर्यंत सर्व मिश्रण ४-५ मिनिटे उकळा.

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राम नवमीच्या दिवशी गोंधळ, शोभायात्रेदरम्यान दगडफेक

कोलकाता: पश्चिम बंगालच्या(west bengal) मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या(ram navmi) उत्साहादरम्यान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या रेजीनगर स्थित शक्तिपूर भागात बुधवारी संध्याकाळी राम नवमीनिमित्त शोभायात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. यात काही लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असाही दावा केला जात आहे की जेव्हा राम नवमीची शोभायात्रा काढली जात होती तेव्हा या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोकांना छतावरून दगड फेकताना पाहिले गेले. दरम्यान, पोलिसांना हे रोखण्यासाठी लाठी चार्जही करावा लागला. भाजपचा आरोप आहे की रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले.

मुशिर्दाबाग जिल्ह्यातील शक्तिपूरमध्ये बुधवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान स्फोटही झाला. यात एक महिलाही जखमी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार या जखमी महिलेला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बुधवारी संध्याकाळी झाला. यात एक महिला जखमी झाली. या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले नाही की हा स्फोट बॉम्बमुळे झाला की इतर कारणांनी.

 

अशीही माहिती आहे की ही घटना बुधवारी संध्याकाळी शक्तिपूर भागात झाली. या ठिकाणी एक समूह राम नवमीनिमित्त जल्लोष करत होता. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात या भागात लोक आपल्या छतावरून शोभायात्रेवर दगडफेक करताना दिसत आहे. यावेळी गोंधळ झाल्याने तो आवरम्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत आरोप केला की मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना राम नवमीच्या उत्सवादरम्यान निशाणा बनवण्यात आले. अमित मालवीय म्हणाले, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालसाठी कलंक आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रामनवमीच्या शोभायात्रेच्या सुरक्षेत विघ्न आणले. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले. या भागात हिंदू अल्पसंख्यांक आहेत.

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या धमाकेदार विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

मुंबई: आयपीएल २०२४चा ३२ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरातला त्यांच्यात घरात एकतर्फी ६ विकेटनी हरवले. दिल्लीच्या सर्व खेळाडूंनी छोटी मात्र महत्त्वाच्या खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले. दिल्लीने हा सामना ६७ चेंडू राखत जिंकला. यामुळे त्यांना रनरेटमध्ये मोठा फायदा झाला.

मोठ्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे आता ६ गुण झाले आहेत आणि संघ -0.074 नेट रनरेटसोबत नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आली आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सला या पराभवामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातचे ६ गुण आहेत मात्र त्यांचा रनरेट -1.303 वर पोहोचला आहे.

आयपीएल २०२४मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने आतापर्यंत सर्व ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला. मात्र रनरेटमुळे दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातपेक्षा एका स्थानाने वर आहे.

हे आहेत टॉप ४ संघ

पॉईंट्स टेबलमध्ये १२ गुणांसह राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचेही ८ गुण आहे. मात्र कोलकात्याचा रनरेट चेन्नईपेक्षा चांगला आहे. सनरायजर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचेही ८ गुण आहेत.

बाकी संघांची स्थिती

लखनऊ सुपर जायंट्सचे ६ गुण आहेत आणि हा संघ पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली बुधवारचा सामना जिंकल्यावर सहाव्या तर गुजरातचा पराभव झाल्याने सातव्या स्थानावर ढकलली गेली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या ३ संघांबाबत बोलायचे झाल्यास पंजाब किंग्स ८व्या स्थानावर आहे. नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे त्यांचे ४ गुण आहेत. तर शेवटच्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. त्यांचे केवळ २ गुण आहेत.

श्रीकृष्ण – अर्जुन नात्यातील रसमय नाट्य

कृष्ण-अर्जुन नातं हा अवीट गोडी असलेला, कधीही न संपणारा विषय! कृष्ण-अर्जुन यांच्या नात्यात भक्ती आहे, प्रेम आहे. पण याचबरोबर त्यांच्या नात्यात मोकळेपणा आहे. ते खरे गुरू शिष्य आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील हे नाट्य ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’त रसमय करून मांडले आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

मागच्या भागात आपण पाहिलं की, श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील पैलू माऊली किती सुंदरतेने साकारतात! श्रीकृष्ण-अर्जुन नातं हा अवीट गोडी असलेला, कधीही न संपणारा विषय! आज आपण त्याचाच पुढील भाग पाहूया.

देवांना शंका विचारून ते बोलत असताना, पार्थ आनंदात निमग्न होऊन गेला. तेव्हा सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनाला देवांनी वर काढलं. त्यांनी अर्जुनाला भानावर येण्यास सांगितलं. याचं उत्कट वर्णन माऊली करतात. पुढे अर्जुनाच्या तोंडी अप्रतिम संवाद घालतात. ‘तुम्ही माझं प्रेमाने कौतुक करत असाल तर (पुन्हा) जीवदशेस का आणता? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की, ‘‘अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही की, चंद्र आणि प्रभा यांचा कधी वियोग घडतो का?’’ ही ओवी अशी की,

तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें। अद्यपि नाहीं मा ठाउकें।
वेड्या, चंद्रा आणि चंद्रिके। न मिळणें आहे?॥ ओवी क्र. २९३.

‘‘आणि असेच बोलून तुला आम्ही जी भीती दाखवतो, तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रीतीस जास्त बळ येते, अशी ही प्रीती होय.’’ ओवी क्र.२९९

श्रीकृष्ण-अर्जुन नात्यातील हे नाट्य ज्ञानदेव किती रसमय करून मांडतात! श्रीकृष्ण-अर्जुन हे मुळात देव-भक्त, गुरू-शिष्य आहेत. इथे ते प्रियकर रूपात साकार होतात. अर्जुनाला इच्छा आहे की, आपण श्रीकृष्णांशी एकरूप होऊन जावं. पण श्रीकृष्ण त्याला पुन्हा भानावर आणतात. का? त्याचंही उत्तर ज्ञानदेवांच्या प्रतिभेने देऊन ठेवलं आहे. हे घडतं प्रीती अर्थात प्रेमामुळे! प्रेमात असलेल्या दोन व्यक्ती. कधी त्यातील एक रुसते. मग दुसरी तो रुसवा पाहते, तो दूर करण्याचा प्रयत्न करते. त्या रुसणाऱ्या व्यक्तीला पाहणं यातसुद्धा किती आनंद मिळत असतो दुसऱ्याला! या झाल्या मानवी नात्यातील गोष्टी!

कृष्णार्जुन नात्यातही ज्ञानदेव प्रेमाचं हेच रूप पाहतात. म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’त रुसलेल्या अर्जुनाचं चित्र येतं. त्या रुसणाऱ्या अर्जुनाला पाहून, श्रीकृष्णांच्या प्रेमाला अधिकच बहर येतो. जसं इथे घडलं आहे.

या नात्यासाठी, प्रेमासाठी माऊलींनी इथे दाखला दिला आहे. कोणता? चंद्र आणि प्रभा यांचा. चंद्र आहे तिथे त्याची प्रभा असणारच. त्या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या कशा होणार? श्रीकृष्ण हे जणू चंद्र आणि अर्जुन हा त्यांची प्रभा होय. या दाखल्यात किती समर्पकता आहे! चंद्र हा सर्व जगाला शीतलता देणारा, तेजस्वी. श्रीकृष्ण हे चंद्राप्रमाणे – त्यांच्या ठिकाणीही तेज आहे. पण ते कसं? तर थंडावा देणारं. अर्जुनाच्या तापलेल्या मनाला शांत करणारे ते जणू चंद्र.

अर्जुन हा जणू त्यांची प्रभा. कारण त्याच्या भक्तीने, ज्ञानाने तोही एक टप्पा गाठतो आहे, त्यांच्याजवळ येऊन पोहोचला आहे. चंद्राची प्रभा जशी त्याच्यासोबत असते, त्याप्रमाणे.

म्हणून तो देवांना पुढील प्रश्न करतो. ‘आत्म्याचा कर्माशी संबंध नाही. कर्माला कारणीभूत पाच गोष्टी सांगण्याची तुम्ही प्रतिज्ञा केली. ते माझे देणे मला द्या.’ या बोलण्याने श्रीकृष्ण संतोष पावतात. ते म्हणतात ‘याविषयी तू धरणे घेऊन बसलास. असा विचारणारा आम्हांला कोठे मिळतो आहे?’

इथे आपल्याला कळतं की, यात भक्ती आहे, प्रेम आहे. पण त्याचबरोबर या नात्यात एकदम मोकळेपणा आहे. ते सच्चे गुरू-शिष्य आहेत. म्हणून अर्जुन शंका विचारण्यास कचरत नाही. तसेच श्रीकृष्णही शंकेचं निवारण करण्यासाठी आतुर आहेत. असं हे नातं आदर्श गुरू-शिष्य, प्रियकर, सखा, मार्गदर्शक असं अनेकरंगी! अशा संवादातून म्हणूनच ‘ज्ञानेश्वरी’ जीवंत होते. ही किमया ज्ञानदेवांच्या प्रज्ञेची, प्रतिभेची! म्हणूनच आज ७२५ वर्षं उलटली तरी ‘ज्ञानेश्वरी’ रसाळ वाटते. त्याचबरोबर त्यातील तत्त्वज्ञानाने ती तितकीच ताजीही वाटते. आजही!

manisharaorane196@gmail.com

देवाशी समरस…

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

देवावर प्रेम करणे म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे काय? जो देवापासून विभक्त झालेला नाही, ज्याची देवाशी युती झालेली आहे, जे देवाशी समरस झाले आहेत, तो भक्त. भक्तीची व्याख्या ही प्रेमाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. प्रेम ही एकच गोष्ट अशी आहे की, त्याने तुम्ही समरस होऊ शकता. समरस होणे महत्त्वाचे आहे. मीठ पाण्यात टाकले की, ते समरस होते म्हणजे मीठरूपाने ते राहत नाही, पण ते खारट रूपाने उरते. साखर पाण्यात टाकली की, ती ही विरघळते व समरस होते. विरघळते याचा अर्थ काय? ती साखररूपाने उरत नाही, तर गोडी रूपाने उरते. तसेच सद्गुरू आणि शिष्य, देव आणि भक्त. खरे तर दोन्हींचा अर्थ एकच आहे. हे दोन्ही समरस जेव्हा होतात, तेव्हा तो भक्त राहत नाही, तर तो भगवंतच होतो. शिष्य हा शिष्य राहत नाही, तर सद्गुरूच होऊन जातो आणि उरतो काय? उरतो फक्त आनंद. तुका म्हणे ‘आता’ आता हे अधोरेखित करायचे.

“तुका म्हणे आता आनंदी आनंद, गावू परमानंद मनासंगे” “अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता”, कधी? “चरणी जगन्नाथा चित्त ठेले”.

आता हे महत्त्वाचे आहे. आता म्हणजे केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले. डोके म्हटलेले नाही. चित्त का म्हटले? देवाच्या चरणावर चित्त ठेवतो आणि तिथे जेव्हा ते स्थिर होते, तेव्हा ते चित्त उरतच नाही. चित्ताचे चैतन्य होते. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.

ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया
तेथे बोला कैचि उरे, माझा मीपण झाला हरी

पुढे काय म्हणतात,
चित्तचैतन्य पडता मिठी, दिसे हरीरूप अवघी सृष्टी
तुका म्हणे सांगो काय, एकाएकी सृष्टी हरीमय

सांगायचा मुद्दा हा की, चित्त आपण देवाच्या चरणावर ठेवले पाहिजे व मग तिथेच स्थिर झालं पाहिजे. मग चित्ताचे चैतन्य होते. हे चित्ताचे चैतन्य होणे म्हणजेच साक्षात्कार. लोकांना साक्षात्कार म्हणजे काय हे कळतच नाही. खरा साक्षात्कार म्हणजे चित्ताचे चैतन्य झाले पाहिजे. एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटलेले आहे. चित्त परतोनि पाठीमोरे ठाके आणि आपणाते आपण देखे.

देखत म्हणे ते हो म्हणे तत्त्व ते मी, इथे ओळखी ऐसे
सुखाच्या साम्राज्यी बैसे, चित्त समरसे विरोनि जाय

किती सुंदर सांगितलेले आहे. हे चित्त जेव्हा ज्या वेळेला देवाच्या दिशेने प्रवाहित होते, तेव्हा ते चित्त राहतच नाही. ते चैतन्यच होऊन जाते. ते चित्त जेव्हा जगाच्या दिशेने वाहते, जगदाकार होते, तेव्हा चांगले होते किंवा वाईट होते. चांगले केव्हा होते? विश्वामध्ये विश्वंभर पाहायला लागलात, विश्वामध्ये विश्वनाथ पाहू लागलात, जगामध्ये जगदीश पाहू लागलात, जनामध्ये जनार्दन पाहू लागलात की, ते चांगले होते.

संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

प्रत्येक जण भक्ती करतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, नि:स्वार्थी परमात्मस्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वत:ला विसरणे, देहबुद्धी विलगीत होणे ही होय. देहरक्षण परमात्म प्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट?

विविध उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर, ज्याच्यावर प्रेम असते, त्याला आपण जो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दु:खच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले, तर ते स्वत:करिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे?

संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे, वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली, म्हणून आम्हाला जिकडे-तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. १३ कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ, १३ कोटी जप व्हायला रोज १०-१२ तास या प्रमाणात जवळजवळ १२ वर्षे लागतात, इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही, तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषयप्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे.

तात्पर्य : नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे.