Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीनुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या

नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्या

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यभरात कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करुन शेतकऱ्यांना मदत द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाला दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (२० ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाला अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यास सांगितले आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात विशेष लक्ष घालावे. पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना सरकारतर्फे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक आडवे झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. यावर्षी पीक परिस्थिती अत्यंत चांगली असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला असतानाच परतीच्या पावसामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर ऐन दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्या : राज ठाकरे

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे विनंती केली आहे. “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा,” असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -