Friday, April 19, 2024
Homeदेशउत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने १६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने १६ जणांचा मृत्यू

डेहराडूनः उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवरून नद्या वाहत असल्याचे चित्र आहे. तर नद्यांना मोठा पूर आला आहे. उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.

चंपावत जिल्ह्यात एक घर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नदीला पूर आल्याने बांधकाम सुरू असलेला पूलही वाहून गेला आहे. नैनी तलाव ओव्हर फ्लो झाला असून त्याचे पाणी आता रस्त्यांवरून वेगाने वाहत असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नैनी तलाव तुडूंब भरून वाहत आहे. रस्ते बंद आणि वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. मुसळधार पावसामुळे नैनीताल, रानीखेत, अल्मोडा ते हल्द्वानी आणि काठगोदामपर्यंत रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकल्याचं सांगण्यात येतंय. एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांनी जानकी चट्टी येथून भाविकांना रात्री उशिरा सुरक्षित गौरीकुंडमध्ये पोहोचवण्यात आलं. केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना हे भाविक अडकले होते. पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला होता. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर मंदाकिनी नदीच्या पलिकडे अडकलेल्या अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. मुसळधार पावसात एसडीआरएफने आतापर्यंत २२ भाविकांना वाचवले आहे. चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडच्या ७ जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. डेहराडून, अल्मोडा, पिथोरागढ, हरिद्वार यांच्यासह इतर जिल्ह्यांमध्ये या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या ४ हजार भाविकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भाविकांना सहकार्य करण्याच्या सूचना संबिधत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -