Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईसह कोकणात दमदार पाऊस

मुंबईसह कोकणात दमदार पाऊस

येत्या चार दिवसांत जोर वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई परिसरात रविवारी पहाटेपासून पावसाला दमदार सुरुवात झाली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान मुंबई शहर, उपनगरांत तसेच कोकणातही रविवारी पावसाने हजेरी लावल्याने लांबणीवर पडलेल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेने काहीसा नि:श्वास सोडला.

दरम्यान, येत्या ४ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या ३ दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रविवारी मुंबईबरोबरच औरंगाबाद, वैजापूर, पालघर, कर्जत, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात पाऊस पडला. यावर्षी राज्यात लवकर पाऊस येण्याचे हवामान विभागाचे संकेत असताना पावसाने जवळपास हुलकावणी दिली. यामुळे उकाडा तसेच पावसामुळे लांबणीवर पडलेली पेरणी तसेच पाण्याचा जाणवणारा तुटवडा पाहता रविवारी पडलेला पाऊस पाहता राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील पोखरी गावात पावसाने हजेरी लावली आहे.

तळकोकणात रिमझिम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात रिमझिम पाऊस पडला. दोन ते तीन तास रिमझिम पावसाने हजेरी लावली.

रत्नागिरीत जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सध्याचा हा पाऊस शेतीसाठी पूरक असणार आहे. भात लावणीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरड कोसळून २ जण जखमी

चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारतनगर डोंगराळ झोपडपट्टीमध्ये रविवारी दरड कोसळल्याची घटना घडली. मोठा दगड एका झोपडीवर कोसळला. या घटनेत अरविंद प्रजापती आणि आशीष प्रजापती हे जखमी झाले आहेत.

वीज पडून चिमुकल्याचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील येंबूर (टोकेपाडा) गावात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना वीज पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यश सचिन घाटाल असे मृत मुलाचे नाव आहे.

शेतकरी वर्गात समाधान

अलिबागमध्ये जिल्ह्याच्या सर्वच भागांत मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे आणि खतसाठा उपलब्ध असून त्याची टंचाई जाणवणार नाही. जिल्ह्यात १७ जूनअखेर सरासरीच्या ८ टक्के पाऊस झाला आहे. भात, नाचणी, वरी या प्रमुख तीन पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सध्या शेतकरी नांगरणीच्या कामात व्यस्त आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -