Thursday, April 25, 2024
Homeअध्यात्महत्तीचा मद जिरविला

हत्तीचा मद जिरविला

विलास खानोलकर

अक्कलकोटी महिपालांचे मंदिरानजीक हत्ती बांधण्याचे स्थळ होते. हल्ली त्या जागेवर शाळा आहे. त्या जागी राजाचा गव्हार नामक हत्ती बांधीत असत. तो इतका मत्त झाला की, कोणत्याही मनुष्यास त्या रस्त्याने जाण्याची भीती वाटू लागली. त्याच्या चारही पायांस साखळदंड बांधले असताही (तो) सोंडेने दगडांचा वर्षाव करू लागला. गाई-म्हशी त्या रस्त्याने जाण्याच्या बंद झाल्या. गावातील लोकांस भीती वाटू लागली, कारण तो केव्हा सुटून कोणाचा प्राण घेईल, याचा नेम नव्हता. राजाने त्या हत्तीच्या आजूबाजूला सशस्त्र शिपाई, सशस्त्र घोडेस्वार, लोकांचे रक्षणास ठेवून राजा श्री समर्थाच्या दर्शनास येऊन, प्रार्थना करू लागला की, ‘महाराज, आमचा हत्ती मत्त होऊन, फारच बेफाम झाला आहे. लोकांना मोठी भीती वाटू लागली आहे. तर गोळी घालून ठार मारावं की काय?’

‘अरे, त्याला मारू नकोस,’ असे म्हणून महाराज सेवेकऱ्यांसह हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत लोक सांगू लागले की, महाराज या रस्त्याने जाऊ नका, हत्ती सोंडेने मोठमोठे दगडसारखा फेकीत आहे. हे ऐकून सर्व सेवेकरी मागे फिरले. सर्व सेवकांवर ज्याची दया, जो जगाचे अन्याय सहन करणारा, ज्याचे चिंतन दुर्लभ, जो प्रत्यक्ष काळाच्याही तोंडातून सोडविणारा, असे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ बरोबर उभे असता जे भक्त सेवक म्हणविणारे, ते देहबुद्धी धरून पळून गेले. हतभागी तेवढे प्रभू सद्गुरुस सोडून गेले आणि सत् शिष्य चोळप्पा, बाबा यादव एवढेच श्रींजवळ राहिले. स्वामींनी हत्तीच्या पुढ्यात जाऊन दम मारला आणि हत्ती लगेच शांत झाला.

प्रत्येक प्राण्यात स्वामींचा अंश
प्रत्येक प्राण्यात ईश्वरी अंश
स्वामींना केले नाही कोणी दंश
स्वामींची शिकवण
मानवतेचा सारांश ।। १।।

स्वामींचे साऱ्या प्राण्यांवर प्रेम
स्वामींचा सर्व जातींवर रहेम
स्वामींचा कधी चुकत
नाही नेम तुमचे-आमचे
स्वामींवर प्रेम।। २।।

राजा रंक (गरीब) स्वामी भक्तीत दंग
स्वामीं भक्तीत प्रेमळ सतरंग
चंदनासारखे हातपाय, चंदनाचे अंग
स्वामीं प्रेमाचे सर्वत्र,
चंदन सुगंध ।। ३।।

राजघराण्यातला भडकला हत्ती
स्वामींची सर्वत्र प्रेमळ नजर
यक्ष (दक्ष) (भूत) राक्षस
स्वामींपुढे हजर
भक्ताला वाचविण्यास स्वामींना ज्वर
स्वामी स्वत: ईश्वर,
अमर अजर ।। ४।।

माहुतालाही फटके सोंडेची सरबत्ती
राजाचा हुकूम घाला गोळी करा जप्ती
स्वामीं हुकूम देताच राजा
झाला हत्ती।। ५।।

– स्वामी समर्थ महाराज की जय

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -