दीपक परब

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्षमय आयुष्यावरील चित्रपट म्हटलं की, प्रेक्षक अशा चित्रपटांना डोक्यावर उचलून घेतात. नुकताच अभिनेता सुबोध भावे यांचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवरही आपली जादू दाखवली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सव्वा दोन कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट थिएटरमध्ये २५ ऑक्टोबरपासून प्रदर्शित झाला आणि पाच भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. निर्मात्यांनी स्वतः ही चांगली बातमी चाहत्यांसोबत शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘स्वराज्याच्या सुवर्णगाथेला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद’, असे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

तब्बल ५ भाषांमध्ये चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानेही असाच एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट फक्त मराठीतच नाही, तर तब्बल पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी, हिंदी, तमीळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट खास दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रितेश म्हणतो, ‘वेडेपणाला मुहूर्त नसतो पण…’

दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुख याने त्याच्या ‘वेड’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून या पोस्टमध्ये या चित्रपटाचे तीन पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये रितेशसोबतच जेनिलिया देशमुख देखील दिसत आहे. रितेशने ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो; पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय ‘वेड’ चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचे ‘वेड’ तुमच्यापर्यंत येत आहे ३० डिसेंबरला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’, या भावनांसह रितेशने शेअर केलेल्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनयाची कारकीर्द २० वर्षं गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार आहे. तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनिलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलुगू ,तमीळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल पाच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय – अतुल यांनी ‘वेड’ चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान करणार काम

सलमान खान वेड या चित्रपटात काम करणार आहे. काही महिन्यांपूर्वी वेड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो रितेशने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तो सलमानसोबत सेटवर मजा करताना दिसत आहे.