Thursday, March 28, 2024
Homeअध्यात्मईश्वर आणि ऐश्वर्य

ईश्वर आणि ऐश्वर्य

जीवन संगीताचे सातही स्वर म्हणजे जग¸ कुटुंब¸ स्वर. शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमेश्वर आपल्या जीवनात अत्यंत व सारखेच महत्त्वाचे आहेत. यात कुठला अधिक महत्त्वाचा व कुठला कमी महत्त्वाचा असे नाही. कारण संगीतात जसा एखादा स्वर बिघडला की, सर्व गाणे बिघडते. तसे जीवनात कुठलाही एक स्वर बिघडला तरी संबंध जीवन बिघडते. अर्थात हा अनुभव बहुतेक लोकांना आलेलाच असतो. पण तरीही लोकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही. उदाहरणार्थ पौर्वात्य देशांत म्हणजे आपल्याकडे आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व दिले गेले, तर बाहेरील पाश्चिमात्य देशांतील लोकांनी भौतिक प्रगतीला अधिक महत्त्व दिले.

वास्तविक दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. मात्र अाध्यात्म अशी काही गोष्ट आहे हेच त्यांच्या ध्यानांत आले नाही व ज्यांना हे कळले म्हणतात ते त्यांना बहुतांशी कळलेलेच नसते. तसेच अाध्यात्म किंवा परमार्थ हा एक महत्त्वाचा भाग असला तरी पण विशेषतः हिंदुस्थानातल्या अनेक लोकांनी अशी कल्पना करून घेतली की तोच एकच महत्त्वाचा भाग आहे. अशी कल्पना आजही अनेक लोकांची आहे. याला इतके महत्त्व दिले की साधू बैरागी होणे म्हणजे फार मोठे समजले जाते. संन्यास घेणे फार मोठी गोष्ट मानली जाते. असे लोकांना वाटते हेच मुळी चुकीचे आहे. उदाहरण देतो ते म्हणजे सिंहस्थ पर्वणीला लोक जातात तेव्हा अनेक लोक त्यांना पाहायला दुर्तफा उभे असतात. ते जिथून जातील तिथली माती कोण कपाळाला लावतात, तर कोण खातात. आमचे म्हणणे असे आहे की, आध्यात्म¸ परमार्थ हे महत्त्वाचे आहेच. पण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे, तो आपला संसार प्रपंच.

जीवनाला हे दोन्ही तितकेच आवश्यक आहे. परमार्थ पाहिजे व प्रपंचही पाहिजे. संसार पाहिजे व अाध्यात्मही पाहिजे. नाम पाहिजे व दामही पाहिजे. देह पाहिजे व देवही पाहिजे. ईश्वर पाहिजे व एेश्वर्यही पाहिजे, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ आपल्या शरीराला सर्व अवयवांची गरज आहे, कारण त्यातला एक अवयव जरी बिघडला तरी सर्व जीवनच बिघडते. तसेच हे आहे. गुडघेदुखी झाल्यावर आपण पूर्वी कसे चालायचो व आता कसे चालतो हे आपल्याला आठवते व ज्याने गुडघे निर्माण केले, त्याचे कौतुक वाटते व डॉक्टरांना वा विज्ञानाला हा गुडघा तयार करता येत नाही याचे ही आश्चर्य वाटते.सांगायचा मुद्दा ज्याने हे निर्माण केले¸ तुम्ही त्याला देव म्हणा, निसर्ग म्हणा, नाहीतर शक्ती म्हणा हे सर्व शब्द तोकडे आहेत¸ हे ज्याच्याकडून निर्माण झाले तो किती महान असला पाहिजे. हे जे निर्माण झालेले आहे ते जसेच्या तसे विज्ञानाला निर्माण करता येत नाही हे किती आश्चर्यकारक आहे. देवाहून श्रेष्ठ काहीच नाही. विज्ञान हे श्रेष्ठ आहे, पण देवाहून ते श्रेष्ठ नाही, असे आमचे म्हणणे आहे.

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -