Friday, March 29, 2024
Homeदेशवैयक्तिक कर्ज घेणे झाले सोपे

वैयक्तिक कर्ज घेणे झाले सोपे

व्याजदर घटल्याने ग्राहकांचा फायदा

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात कर्ज घेणे सोपे झाले आहे. गृहकर्जावरील व्याजदरांनी नीचांकी पातळी गाठली असताना आता वैयक्तिक कर्ज घेणेही स्वस्त झाले आहे. घरे तसेच गाडी घेण्याची लोकांची स्वप्ने पूर्ण होत असताना आणि वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून घराची सजावटही आवाक्यात आली आहे. आजघडीला वैयक्तिक कर्ज ८.१५ टक्के व्याजदराने मिळत असून हा वैयक्तिक कर्जावरील व्याजदराचा आजवरचा नीचांकी आकडा आहे. वैयक्तिक कर्ज असुरक्षित असल्यामुळे त्यावर २० ते २५ टक्के दराने व्याज आकारले जात होते. मात्र आता परिस्थिती बदलली असून त्यावरील व्याजदरही घटले आहेत. अनेक बँकांनी वैयक्तिक कर्जावरील व्याजदर घटवल्याचे दिसून येत आहे.

सध्या आयडीबीआय बँक सर्वात कमी दराने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत असून कर्जाच्या कालावधीनुसार व्याजदर ठरत आहेत. आयडीबीआय बँक ८.१५ टक्के दराने वैयक्तिक कर्ज देत असून काही प्रसंगी १४ टक्के दरानेही कर्ज दिले जात आहे. वैयक्तिक कर्ज १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाते. २५ हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियातल्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरांची सुरूवात ९.६ टक्क्कांपासून होते. हे दर कालावधीनुसार १५.६५ टक्क्यांपर्यंत असतात. ही बँक २५ हजार रुपयांपासून २० लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. युनियन बँक ५ ते १५ लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत असून त्यांचे व्याजदर ८.९० ते १३ टक्क्यांपर्यंत आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचे दर ८.९० ते १४.४५ टक्क्यांपर्यंत आहेत. इंडियन बँक ९.५ ते १३.६५ टक्के दराने वैयक्तिक कर्ज देते. पंजाब अँड सिंध बँकेचे व्याजदर ९.३५ ते ११.५० टक्के असून बँक ऑफ महाराष्ट्र ९.४५ ते १२.८० टक्के दराने कर्ज देते. बँक ऑफ बडोदा ९.७५ ते १५.६० टक्के दराने कर्ज देते. यासोबतच खाजगी क्षेत्रातल्या बँकाही वैयक्तिक कर्ज देत असून प्रत्येकाने आपापले व्याजदर ठरवले आहेत.

वैयक्तिक कर्ज मिळवण्याचे नियम फारसे जाचक नाहीत. बँकांसोबतच वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. वैयक्तिक कर्ज घेऊन स्मार्टफोनपासून घरगुती उपयोगाच्या वस्तूंपर्यंत अगदी काहीही घेता येते. परदेशवारी किंवा देशांतर्गत प्रवासासाठीही वैयक्तिक कर्ज घेता येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -