Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडी१८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

१८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पालघर :पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात आज थंडीचा कडाका असल्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला वेग आला नव्हता. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. तथापि, दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी केली होती. सर्वत्र रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.

सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत तलासरीमध्ये ६५ टक्के, मोखाडामध्ये ७१.०५ टक्के व विक्रमगडमध्ये ६० टक्के असे मतदान झाले. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीत १८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. या सर्व उमेदवारांना या निवडणुकीत ‘आपले काय होणार?’ हे १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. तोपर्यंत या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आयोगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना किमान महिनाभर धाकधूक सहन करावी लागणार आहे.

मतदार कुणाला साथ देणार?

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), जिजाऊ संघटना व बहुजन विकास आघाडी (बविआ) या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तलासरी येथे माकप, मोखाडा येथे शिवसेना व विक्रमगड येथे जिजाऊ यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरले होते. पण मतदार कोणाला साथ देतात हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी या तीन नगरपंचायतींच्या मतदारांना तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी
लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -